The Agitos Logo Paralympic Symbol : ऑलिम्पिकनंतर आता पॅरिसमध्ये २८ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत पॅरालिम्पिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत १८४ देशांचे चार हजारांहून अधिक खेळाडू सहभागी झाले आहेत. या पॅरालिम्पिक स्पर्धेत खेळाडू अंपगत्वानुसार वेगवेगळ्या खेळांमध्ये सहभागी होतात. विकलांगतेवर मात करून स्वत:ला सिद्ध करणाऱ्या खेळाडूंची ही स्पर्धा असते. तुम्हाला माहीत आहे का, पॅरालिम्पिक लोगोमागची कहाणी अन् या लोगोचा अर्थ काय आहे? आज आपण त्याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. (Paralympics 2024 what is the meaning of The Agitos Logo Paralympic Symbol)
पॅरालिम्पिक लोगोचा अर्थ (what is the meaning of The Agitos Logo Paralympic Symbol)
पॅरालिम्पिक लोगोला एजिटोस (Agitos) असेही म्हणतात. हा लोगो पॅरालिम्पिकसाठी केलेल्या चळवळीचे प्रतिनिधित्व करतो. पॅरालिम्पिक लोगोमध्ये लाल, निळा आणि हिरवा या तीन रंगांचा समावेश आहे. हे तीनही रंग जगातील जास्तीत जास्त राष्ट्रीय ध्वजांमध्ये आहेत. हा लोगो आपली ओळख, धैर्य, दृढनिश्चयीपणा, प्रेरणा आणि समानता या पॅरालिम्पिक मूल्यांचे प्रतीक आहे.
एजिटोस हा शब्द लॅटिन भाषेतील असून त्याचा अर्थ ‘मी एका जागेवरून पुढे जातो’ असा होतो. या लोगोमध्ये तुम्हाला तीन रंग दिसतील, ते केंद्रस्थानी असलेल्या बिंदूभोवती फिरताना दिसताहेत. म्हणजेच जगाच्या कानाकोपऱ्यातून खेळाडू पॅरालिम्पिक स्पर्धेसाठी एकत्र येतात, असा याचा अर्थ होतो. पॅरालिम्पिक खेळाडू नेहमी पुढे जातात, ते हार मानत नाही, असे या लोगोतून दर्शवण्यात आले आहे.
पॅरालिम्पिक लोगो कसे बदलले?
१९९४ – २००४
१९९४ रोजी जागतिक स्तरावर पॅरालिम्पिक लोगो अधिकृतपणे “माइंड, बॉडी, स्पिरिट” या ब्रीदवाक्यासह लाँच करण्यात आला. २००४ च्या पॅरालिम्पिक स्पर्धेपर्यंत हा लोगो होता.
२००४ – २०१९
२००३ रोजी ‘पब्लिक रिलेशन फर्म स्कोल्ज़ अँड फ्रेंड्स’नी या लोगोवर काम केले आणि नवीन लोगो तयार केला. यामध्ये त्यांनी हा लोगो गोलाकार शैलीमध्ये बदलला. लाल, निळा आणि हिरवा हे रंग तसेच ठेवले. त्यात कोणताही बदल केला नाही.
२०१९ – सध्या
पुढे आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समितीने लंडन येथील डिझाइन एजन्सी नॉर्थबरोबर काम केले आणि लोगोला आणखी आकर्षक करण्याचा प्रयत्न केला. त्यात थोडे फेरबदल केले. हा लोगो पुन्हा तयार करण्यात आला, जेणेकरून तीन रंग एकसारखे समान दिसतील. या तीन रंगांचे अंतर आणि जागासुद्धा पुन्हा रेखाटण्यात आल्या, जेणेकरून हे तीनही रंग मध्यभागी असलेल्या बिंदूकडे समान अंतरावर फिरत असल्याचे दिसेल. मूळ स्वरूप न बदलता या तीन रंगांच्या छटांमध्ये थोडे बदल करण्यात आले.
सध्या अधिकृतरित्या पॅरालिम्पिक लोगोचे तीन व्हर्जन दिसून येतात. या तीन व्हर्जनमध्ये लोगोचे स्वरूप एकसारखे असून फक्त रंगांमध्ये फरक आहे.
१. लाल, निळा आणि हिरवा या तीन रंगांचा लोगो
२. पांढऱ्या बॅकग्राउंडवर काळ्या रंगाचा लोगो
३. काळ्या बॅकग्राउंडवर पांढऱ्या रंगाचा लोगो
याशिवाय WeThe15 campaign दरम्यान जांभळ्या रंगाचा लोगोसुद्धा तयार करण्यात आला होता.