Paralympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा काही दिवसांपूर्वीच पार पडली. यानंतर आता पॅरिसमध्ये पॅरालिम्पिक स्पर्धा सुरु झाली आहे. पॅरालिम्पिक स्पर्धा २८ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत असणार आहे. दरम्यान, या स्पर्धेमध्ये तब्बल १८४ देशांतील तब्बल ४ हजारांहून अधिक खेळाडू सहभागी झाले आहेत. या पॅरालिम्पिक स्पर्धेत खेळाडू अंपगत्वानुसार वेगवेगळ्या खेळांमध्ये सहभागी होत असतात. खरं तर अंपगत्वावर मात करत स्वत:ला सिद्ध करणाऱ्या खेळाडूंची ही स्पर्धा असते. या स्पर्धेत अनेक खेळाडू बाजी लावून अनेक पदके जिंकतात. आता पॅरालिम्पिक स्पर्धा सुरु आहे. मात्र, तुम्हाला या पॅरालिम्पिक स्पर्धेतील ‘पॅरा’ या शब्दाचा अर्थ काय आहे? माहिती आहे का? याबाबतची माहिती आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘पॅरा’ शब्दाचा अर्थ काय?

पॅरालिम्पिक या शब्दातील ‘पॅरा’ या शब्दाचा अर्थ ग्रीकमध्ये (शेजारी किंवा बाजूने) असा होतो. पॅरालिंपिक म्हणजे पॅरा आणि ऑलिम्पिक. म्हणजे या शब्दांमध्ये पॅरलल अर्थात समांतर हा शब्द दडलेला आहे. ऑलिंपिकच्या धर्तीवर पॅरालिम्पिक समांतर खेळ, किंवा ऑलिंपिकच्या पातळीवर त्यासारखी आयोजित केली जाणारी स्पर्धा म्हणजेच पॅरालिम्पिक होय.

हेही वाचा : Paralympics 2024 : पॅरालिम्पिक लोगोचा नेमका अर्थ काय? जाणून घ्या, काळानुसार लोगो कसा बदलला?

दरम्यान, ऑलिम्पिक स्पर्धेप्रमाणे पॅरालिम्पिक ही स्पर्धा दर चार वर्षांनी आयोजित केली जाते. या स्पर्धेचं आयोजनही इंटरनॅशनल पॅरालिम्पिक कमिटीद्वारे केलं जातं. पहिली पॅरालिम्पिक स्पर्धा ही १९४८ साली ब्रिटनमध्ये झाली होती. त्यावेळी या स्पर्धेचं नाव स्टोक मँडव्हिले गेम्स असं होतं. मात्र, पुढे १९६० साली ही स्पर्धा रोममध्ये झाली आणि या स्पर्धेने व्यापक रुप घेतलं. यावेळी या स्पर्धेत जवळपास ४०० खेळाडू सहभागी झाले होते.

पॅरालिम्पिक स्पर्धेच्या माध्यमातून जगभरातील पॅरालिम्पिकपटूंना एकत्र आणणारं हे एक व्यासपीठ आहे. या स्पर्धेमध्ये अपंगत्वानुसार पॅरालिंपिकपटू सहभागी होत असतात. यामध्ये काही खेळ असे असतात की ते सर्व प्रकारच्या अपंगत्व असलेल्या खेळाडूंना खेळता येतात. मात्र. काही खेळ विशिष्ट अपंगत्व असलेल्या खेळाडूंसाठीच राखीव असतात. या पॅरालिम्पिक स्पर्धे पॅरालिम्पिकपटू सहभागी होत अनेक पदके जिंकतात.

पॅरालिम्पिक लोगोचा अर्थ माहिती आहे का?

पॅरालिम्पिक लोगोला एजिटोस असेही म्हणतात. हा लोगो पॅरालिम्पिकसाठी केलेल्या चळवळीचे प्रतिनिधित्व करतो. पॅरालिम्पिक लोगोमध्ये लाल, निळा आणि हिरवा या तीन रंगांचा समावेश आहे. हे तीनही रंग जगातील जास्तीत जास्त राष्ट्रीय ध्वजांमध्ये आहेत. हा लोगो आपली ओळख, धैर्य, दृढनिश्चयीपणा, प्रेरणा आणि समानता या पॅरालिम्पिक मूल्यांचे प्रतीक आहे.

एजिटोस हा शब्द लॅटिन भाषेतील असून त्याचा अर्थ ‘मी एका जागेवरून पुढे जातो’ असा होतो. या लोगोमध्ये तुम्हाला तीन रंग दिसतील, ते केंद्रस्थानी असलेल्या बिंदूभोवती फिरताना दिसताहेत. म्हणजेच जगाच्या कानाकोपऱ्यातून खेळाडू पॅरालिम्पिक स्पर्धेसाठी एकत्र येतात, असा याचा अर्थ होतो. पॅरालिम्पिक खेळाडू नेहमी पुढे जातात, ते हार मानत नाही, असे या लोगोतून दर्शवण्यात आले आहे.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Paralympics 2024 what is the meaning of the word para in paralympics do you know gkt