बिस्किट हा पदार्थ असा आहे, जो लहान, मोठे, वृद्ध सर्वांनाच आवडतो. सकाळी वाफाळत्या चहासोबत बिस्किट (Biscuits) मिळालं की चहा घेण्याचा आनंद द्विगुणीत होऊन जातो आणि बिस्किट म्हटलं की पहिलं नाव येतं ते पारले-जी केवळ भारतातच नाही, तर जगभरात या बिस्किटचे चाहते आहेत. पारले-जी हे भारतातील सर्वात जास्त विकले जाणारे बिस्कीट आहे. भारतात तुम्हाला एकंही असं घर आढळणार नाही, जिथं पारले-जी आणलं गेलं नसेल. अनेकांची तर सकाळ पारले-जी सोबत होते. हे बिस्किट अतिशय स्वस्त असून त्याची चवं तेवढीच निराळी आहे. चला तर जाणून घेऊया या पारले-जी बिस्किटांचा इतिहास.
पारले-जी ८२ वर्ष जुना ब्रँड आहे. याची सुरुवात मुंबईतील विले-पार्ले भागातील एका बंद पडलेल्या जुन्या कारखान्यातून झाली. १९२९ मध्ये मोहनलाल द्याल नावाच्या एका व्यापाऱ्यानं हा कारखाना विकत घेतला. तिथं त्यांनी कन्फेक्शनरी बनवण्याचं काम सुरू केलं. भारताच्या या पहिल्या कन्फेक्शनरी ब्रँडचं नाव त्या ठिकाणावरून पडलं. हा कारखाना सुरू झाला तेव्हा तिथं केवळ घरातील लोकच काम करत होती. कारखाना सुरू झाल्यानंतर १० वर्षांनी म्हणजेच १९३९ साली इथं बिस्किट बनवण्याचं काम सुरू झालं. त्याच वर्षी या बिझनेसला अधिकृत नाव देण्यात आलं. पारले प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या नावाने इथं बिस्किट बनू लागले. कमी किंमत आणि चांगल्या क्वालिटीमुळे अल्पावधीतच ही कंपनी लोकप्रिय झाली.
पार्ले बिस्किटांवर असलेली ती छोटी मुलगी म्हणजे प्रख्यात लेखिका सुधा मूर्ती यांचा लहानपणीचा फोटो असल्याच्या अफवाही मध्यंतरी रंगल्या होत्या. तसंच, पार्ले जी मधील G चा नेमका अर्थ काय? आज आपण या दोन्ही प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया.
पार्ले जी नाव कुठून आले?
पार्ले जीमधील G म्हणजे जिनीअस असंच सर्व लोकांच्या तोंडी असायचे. पण तुम्हाला माहितीये का हा त्याचा खरा अर्थ नाहीये. सुरुवातीला या बिस्किटाचे नाव ग्लुको बिस्किट होते. त्यावेळी या पारले बिस्किटचं नाव पारले ग्लुको होतं. दुसऱ्या महायुद्धात भारतीय आणि ब्रिटिश सैनिकांचे ते आवडते बिस्किट होते. पण स्वातंत्र्यानंतर या बिस्किटांचे उत्पादन अचानक थांबवण्यात आले. कारण हे बिस्किट तयार करण्यासाठी गव्हाचा वापर करण्यात यायचा आणि त्याचवेळी देशात अन्नाचे संकट निर्माण झाले होते.
हेही वाचा – लग्नात नवरीच्या हातावर मेहंदी का काढतात माहितीये? ९९% लोकांना माहिती नाही खरं कारण
बिस्किटांवर असलेली ती छोटी मुलगी कोण ?
बिस्किटांच्या पॅकेटवर दिसणारी लहान मुलगी कोण आहे असा प्रश्न अनेकांना पडतो. सोशल मीडियावर अनेक नावेदेखील चर्चेत आली. यात सुधा मूर्ती यांचे नावही आघाडीवर होते. तर, नागपूरच्या नीरु देशपांडे यांचेही नाव पुढे येत होते. मात्र कंपनीने या सर्व अफवा फेटाळल्या आहेत. पार्ले प्रॉडक्ट्स ग्रुपचे मॅनेजर मयंक शाह यांनी हे दावे फेटाळले आहेत. पार्ले जीच्या पॅकेटवर दिसणारे मुल हे एक काल्पनिक असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. त्यावेळेचे लोकप्रिय कलाकार मगनलाल दइया यांनी हे चित्र रेखाटलेले होते.