भारतात अनेक नद्या आहेत. या नद्या फक्त आपल्याला पिण्यासाठीच पाणी देत नाहीत, तर पिकांनाही त्यांच्याद्वारे पाणी दिले जाते. अनेक लोक नद्यांच्या काठावर अंघोळ आणि कपडे धुण्याचे काम करतात. नदीच्या काठावर कुंभ आणि महाकुंभ देखील आयोजित केले जातात. आपल्या देशात नद्यांना माता म्हणतात. सणासुदीलाही नद्यांची पूजा केली जाते. पण भारतात एक नदी आहे जिला शापित म्हटलं जातं. या नदीबाबत लोकांच्या मनात इतकी भीती आहे की ते नदीच्या पाण्याला हातही लावत नाहीत. या नदीच्या पाण्याला स्पर्श करणे अशुभ असल्याची लोकांची श्रद्धा आहे.
ही नदी कुठे आहे?
या नदीचे नाव कर्मनाशा नदी आहे. ही नदी उत्तर प्रदेश राज्यात आहे. ही नदी उत्तर प्रदेश आणि बिहारमधून वाहते, परंतु तिचा बहुतांश भाग यूपीमध्ये येतो. उत्तर प्रदेशात ती सोनभद्र, चंदौली, वाराणसी आणि गाझीपूरमध्ये वाहते आणि बक्सरजवळ पोहोचते आणि गंगेला मिळते. नदीचे नाव कर्म आणि नशा या दोन शब्दांनी बनलेले आहे. जर त्याचा शाब्दिक अर्थ काढला तर त्याचा अर्थ हा काम बिघडवणारी नदी असा होतो.
या नदीबाबत लोकांचीही अशीच विचारसरणी आहे. कर्मनाशा नदीच्या पाण्याला स्पर्श केल्याने कामे बिघडतात, अशी लोकांची श्रद्धा आहे. या कारणास्तव लोक त्याच्या पाण्याला स्पर्श करण्यास टाळतात. त्याचे पाणी ते कोणत्याही कारणासाठी वापरत नाहीत.
कर्मनाशा नदीची आख्यायिका
कर्मनाशा नदीच्या शापित होण्यामागे एक आख्यायिका सांगितली जाते. असे म्हणतात की, राजा हरिश्चंद्राचे वडील सत्यव्रत यांनी एकदा आपले गुरू वशिष्ठ यांच्याकडे शरीरासह स्वर्गात जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. गुरूंनी त्यांची इच्छा पूर्ण करण्यास नकार दिला होता. तेव्हा राजा सत्यव्रत यांनी गुरु विश्वामित्र यांना हीच विनंती केली. विश्वामित्राचे वशिष्ठाशी वैर होते, त्यामुळे त्यांनी सत्यव्रताला आपल्या तपश्चर्येच्या बळावर प्रत्यक्ष स्वर्गात पाठवले.
( हे ही वाचा: ‘या’ देशात फक्त ४० मिनिटांची रात्र असते; ठिकाणाचे नाव वाचून तुम्हीही थक्क व्हाल)
हे पाहून इंद्रदेवाला राग आला आणि त्याने राजाचे मस्तक उलटे करून पृथ्वीवर पाठवले. यानंतर विश्वामित्रांनी आपल्या तपश्चर्येने राजाला स्वर्ग आणि पृथ्वीच्या मध्ये थांबवले आणि नंतर देवांशी युद्ध केले. राजा सत्यव्रत आकाशात उलटे लटकले होते, त्यामुळे त्याच्या तोंडातून लाळ टपकू लागली. लाळ पडल्याने नदी तयार झाली. तेव्हा गुरु वशिष्ठ यांनी राजा सत्यव्रताला चांडाल होण्याचा शाप दिला. लाळेपासून नदी तयार झाल्याने आणि राजाला मिळालेल्या शापामुळे नदी शापित आहे, अशी लोकांची समजूत आहे.
(बातमीत दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. लोकसत्ता हे सत्य असल्याचा दावा करत नाही.)