How Do Female Astronauts Manage Menstruation In Space : आठ दिवसांच्या मोहिमेसाठी गेलेल्या नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे नऊ महिने अंतराळात अडकले होते. नुकतेच नासाने दोघेही अंतराळवीर सुरक्षितपणे पृथ्वीवर परतले आहेत. दीर्घ काळ अंतराळात राहिल्यामुळे त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. दरम्यान, अंतराळामध्ये अंतराळवीर कसे राहतात याबाबत अनेकांना उत्सुकता वाटत असून, त्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. अंतराळामध्ये ते अन्न कसे खातात, त्या अन्नातून पुरेसे कॅल्शियम कसे मिळवतात, त्यांची रोजची दैनंदिन दिनचर्या कशी असते, असे अनेक प्रश्न लोकांना पडतात. त्यापैकी एका विषयाची महिलांना विशेष उत्सुकता आहे आणि तो म्हणजे “महिला अंतराळवीर सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात मासिक पाळी कशी व्यवस्थापित करतात?”

अंतराळात मासिक पाळी वेगळ्या पद्धतीने कार्य करते का? (Does Menstruation Work Differently in Space?)

ऐतिहासिकदृष्ट्या सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात ते नैसर्गिक मासिक चक्र कसे कार्य करेल याबाबतची समज नसल्यामुळे मासिक पाळी हे अंतराळ मोहिमांमधून महिलांना वगळण्याचे कारण म्हणून उद्धृत केले गेले होते. सुरुवातीला सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात मासिक पाळीदरम्यान रक्त उलट दिशेने वाहू लागेल अशी चिंता व्यक्त केली जात होती. त्यामुळे वैद्यकीय गुंतागुंत होऊ शकते; पण संशोधन व अनुभवावरून असे दिसून आले, “मानवी शरीर सूक्ष्म गुरुत्वाकर्षणातही सामान्यपणे कार्य करत राहते.”

जेव्हा महिला अंतराळवीरांना अंतराळात मासिक पाळी येते तेव्हा पृथ्वीवर जे घडते, त्यापेक्षा ही प्रक्रिया मोठ्या प्रमाणात बदललेली नसते. पृष्ठभागावरील ताण आणि capillary action मुळे रक्त अप्रत्याशितपणे ‘तरंगत’ नाही, ज्यामुळे द्रवपदार्थ नियंत्रित राहतात. (capillary action म्हणजे दबाव किंवा बाह्य शक्तीची आवश्यकता नसताना वाहिनीसारख्या अरुंद जागेतून द्रव प्रवाहित होण्याची क्षमता.) गर्भाशय नेहमीप्रमाणे आकुंचन पावते, ज्यामुळे मासिक पाळीमध्ये रक्तस्राव नैसर्गिकरीत्या शरीराबाहेर पडतो.

अंतराळवीर अंतराळात त्यांच्या मासिक पाळीचे व्यवस्थापन कसे करतात? (How Do Astronauts Manage Their Periods in Space?)
सामान्य मासिक पाळीचा अनुभव घेणे किंवा मासिक पाळी रोखण्यासाठी वैद्यकीय पद्धतीचा वापर करणे, असे दोन प्राथमिक पर्याय महिला अंतराळवीरांकडे असतात. नासा अंतराळवीरांना मासिक पाळी व्यवस्थापित करण्यासाठी विविध पर्याय प्रदान करते आणि हा निर्णय पूर्णपणे वैयक्तिक असतो. पण, कचरा विल्हेवाट आणि स्वच्छतेच्या अडचणी यांसारख्या लॉजिस्टिक चिंता अनेकांसाठी एक व्यावहारिक पर्याय निवडण्यास भाग पाडतात.

मासिक पाळी थांबवणे (Menstrual Suppression)

  • बहुतेक महिला अंतराळवीर सतत तोंडाद्वारे घेतल्या जाणाऱ्या गर्भनिरोधक गोळ्या किंवा गर्भाशयात वापरले जाणारे उपकरण (IUD) किंवा हार्मोनल इम्प्लांट यांसारख्या दीर्घकाळ कार्य करणाऱ्य गर्भनिरोधकांचा वापर करून मासिक पाळी थांबविण्याचा पर्याय निवडतात.
  • गर्भनिरोधक गोळ्यांचा सततचा वापर मासिक पाळी पूर्णपणे बंद करतो, स्वच्छता उत्पादनांची गरज कमी करतो आणि कचरा कमी करतो.
  • ही पद्धत सुरक्षित आणि प्रभावी मानली गेली आहे आणि त्यामुळे दीर्घकालीन आरोग्य धोके नाहीत.

मासिक पाळी येणे न थांबवता मासिक पाळी व्यवस्थापित करणे (Managing Menstruation Without Suppression)

  • काही महिला अंतराळवीर सामान्यपणे मासिक पाळी सुरू ठेवण्याचा पर्याय निवडतात. ते पृथ्वीवर वापरल्या जाणाऱ्या स्वच्छता उत्पादनांसारखीच स्वच्छता उत्पादने वापरतात, ज्यात टॅम्पॉन आणि पॅड यांचा समावेश आहे.
  • मर्यादित पाणीपुरवठा आणि काळजीपूर्वक कचरा विल्हेवाट लावण्याची गरज यांमुळे तेथे स्वच्छता व्यवस्थापन अधिक आव्हानात्मक असू शकते. वापरलेली स्वच्छता उत्पादने साठवली जातात आणि नंतर इतर कचऱ्यासह टाकून दिली जातात.

अंतराळात मासिक पाळीची आव्हाने (Challenges of Menstruation in Space)

अवकाशात मासिक पाळी ही वैद्यकीय चिंता नसली तरी व्यावहारिक आव्हाने आहेत. ती खालीलप्रमाणे :

  • कचरा व्यवस्थापन : आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (ISS) मूत्र पुनर्वापरासाठी प्रणाली आहेत; परंतु त्या मूलतः मासिक पाळीच्या रक्तावर प्रक्रिया करण्यासाठी डिझाइन केलेल्या नव्हत्या. म्हणून विल्हेवाट लावण्याच्या पद्धती काळजीपूर्वक नियोजित केल्या पाहिजेत.
  • स्वच्छतेचे बंधन : पाण्याची मर्यादित उपलब्धता असल्याने, स्वच्छता राखणे हे एक आव्हान असू शकते, ज्यामुळे मासिक पाळी थांबवणे हा एक सोईस्कर पर्याय ठरतो.
  • पुरवठ्याचे अतिरिक्त वजन : मासिक पाळीच्या काळात स्वच्छता उत्पादनांचा वापर केल्याने अंतराळयानाच्या पेलोडवर भार वाढतो, हा एक असा घटक आहे, जो नासा मोहिमेच्या नियोजनात विचारात घेतला जातो.

१९६३ मध्ये व्हॅलेंटिना तेरेश्कोवा अंतराळात जाणारी पहिली महिला ठरली आणि तेव्हापासून १०० हून अधिक महिला अंतराळात गेल्या आहेत. सुरुवातीला मासिक पाळीच्या अनिश्चिततेमुळे आणि सूक्ष्म गुरुत्वाकर्षणातील हार्मोनल चढ-उतारामुळे अंतराळ संस्था महिलांचा समावेश करण्यास कचरत होत्या; पण त्यानंतर या चिंता दूर करण्यात आल्या. त्यायोगे अंतराळ मोहिमांमध्ये आता महिला अंतराळवीरांना योग्य वैद्यकीय आणि स्वच्छता साहित्य दिले जाते.