World Most Venomous Snakes : साप विषारी असो वा नसो, पण तो पृथ्वीवरील सर्वात भयानक प्राण्यांपैकी एक आहे. थंड रक्ताचा, अवयव नसलेला हा सरपटणारा प्राणी एका दंशाने माणसाला मृत्यूची वाट दाखवू शकतो. विषारी सापांमध्ये विष असते, ज्यात असे काही विषारी पदार्थ असतात जे तो दातांच्या मदतीने शिकारी व्यक्ती किंवा प्राण्याच्या शरीरात टोचतो. अशा सापांच्या एका दंशाने व्यक्तीला अर्धांगवायू, अंतर्गत रक्तस्त्राव, अवयव निकामी होणे, हृदयविकाराचा झटका आणि मृत्यूदेखील येऊ शकतो.

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिलेल्या माहितीनुसार, दरवर्षी जगभरात सुमारे ५.४ दशलक्ष लोकांना विषारी साप दंश करतात, ज्यात अंदाजे ८१,००० ते १,३८,००० लोकांचा मृत्यू होतो. पण, तुम्हाला माहितेय का, साप फक्त स्वसंरक्षणार्थ व्यक्ती किंवा प्राण्याला दंश करतात, पण त्यांना पाहून आपण जितके घाबरतो, त्यापेक्षा ते आपल्याला पाहून जास्त घाबरलेले असतात.

टेरिटरी वाइल्डलाइफ पार्क, NT चे क्युरेटर डायन वेड यांनी ऑस्ट्रेलिया जिओग्राफिकला सांगितले की, साप मानवांना संभाव्य खाद्य म्हणून पहात नाहीत किंवा द्वेषाने ते आक्रमकपणे दंश करत नाहीत. ते त्यांच्या विषाचा वापर अशा भक्ष्याला स्थिर करण्यासाठी करतात, जे त्यांच्यासाठी खाणे खूप कठीण असते.

तरीही कोणत्याही प्राण्याच्या हल्ल्याने किंवा दंशाने होणाऱ्या मानवी मृत्यूंमध्ये सापाच्या दंशाने होणाऱ्या मानवी मृत्यूंची संख्या सर्वात मोठी म्हणजे दुसऱ्या क्रमांकाची आहे.

फार कमी विषारी साप आहेत, ज्यांच्या दंशानंतर योग्य वेळी उपचार न केल्यास माणसाचा मृत्यू होई शकतो. परंतु, अँटीव्हेनमच्या विकासापासून सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण कमी झाले आहे. परंतु, सर्पदंशाची समस्या अजूनही कायम आहे, विशेषतः विकसनशील देशांमध्ये जिथे अँटीव्हेनम सहज उपलब्ध नाही; तिथे ही संख्या जास्त आहे. अशावेळी जगभरातील सहा सर्वात विषारी सापांविषयी जाणून घेऊ, ज्यांच्या एका दंशानेही माणसाचा मृत्यू होऊ शकतो.

जगातील ‘हे’ आहेत ६ सर्वात विषारी साप

१) इनलँड तायपन

इंटरनॅशनल जर्नल ऑफ न्यूरोफार्माकोलॉजीनुसार, इनलँड तायपन हा जगातील सर्वात विषारी साप आहे, असे लाईव्ह सायन्सने नमूद केले आहे. याचा अर्थ असा की, या सापाच्या एका दंशात एकावेळी १०० व्यक्तींचा जीव घेण्याची शक्ती असते. या सापाचे विष कोबरा सापाच्या तुलनेत ५० टक्के अधिक घातक ठरते.

बीबीसी वाइल्डलाइफनुसार, हे साप बहुतेकदा क्वीन्सलँड, मध्य पूर्व आणि दक्षिण ऑस्ट्रेलियातील मातीच्या भेगांमध्ये लपलेले आढळतात. त्यांचे अशा जागांत लपण्याच्या स्वभावामुळे सुदैवाने ते मानवांच्या संपर्कात क्वचितच येतात. शत्रूची किंवा धोक्याची चाहूल लागताच हा साप शरीराला एस आकारात गुंडाळतो आणि हल्ला करतो.

लाईव्ह सायन्सनुसार, इनलँड तायपनच्या विषामध्ये हायलुरोनिडेस एंझाइम हा एक मुख्य घटक असतो़. हा एंझाइम पीडिताच्या शरीरात विषारी पदार्थाप्रमाणे वेग पसरतो.

२) कोस्टल तायपन

समशीतोष्ण आणि उष्णकटिबंधीय किनारी प्रदेशातील ओल्या जंगलात आढळणारा, कोस्टल तायपन हा एक अत्यंत विषारी साप आहे.

ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड, न्यू साउथ वेल्ससारख्या काही भागांत या उपप्रजाती आढळतात. ऑस्ट्रेलियन संग्रहालयाच्या मते, या सापाचा एखाद्या प्राणी किंवा व्यक्तीला दंश करण्याचा वेग अतिशय जास्त आहे. ऑस्ट्रेलियन जिओग्राफिकनुसार, प्रभावी अँटीव्हेनम तयार होण्यापूर्वी या सापाचा दंश नेहमीच घातक होता.

३) ब्लॅक मांबा

काळ्या तोंडासाठी ओळखला जाणारा ब्लॅक मांबा हा अत्यंत आक्रमक साप आहे. आफ्रिका खंडातील उप-सहारा आफ्रिकेत आढळणारा हा सर्वात भयंकर साप आहे. बहुतेक सापांप्रमाणे ब्लॅक मांबादेखील माणसाला शोधत नाही, परंतु जर त्याला काही धोका जाणवत असेल तर तो हल्ला करतो.

बीबीसीच्या मते, जर एखाद्या व्यक्तीला ब्लॅक मांबाने दंश केला तर १० मिनिटांत व्यक्तीला बोलण्यात अडचणी येतात, स्नायूंना मुरगळ येणे अशी लक्षणे दिसू लागतात. तसेच अर्ध्या तासात मृत्यू होण्याची शक्यता असते.

४) रसेल वाइपर्स

रसेल वाइपर्स या सापाचा दंश हा सर्वात वेदनादायक असतो. हे साप खूपच आक्रमक असतात आणि इंडियन कोब्रा, कॉमन क्रेट आणि सॉ-स्केल्ड वाइपरसह “बिग फोर”पैकी एक असतात. बीबीसीच्या मते, भारतातील एकूण सर्पदंशांपैकी ४३ टक्के सर्पदंशास हे साप जबाबदार आहेत.

परंतु, आता या विषावर एक अँटीव्हेनम विकसित करण्यात आले आहे, ज्यामुळे अनेक जीव वाचले आहेत.

५) इंडियन कोब्रा

नॅचरल हिस्ट्री म्युझियमनुसार, इंडियन किंग कोब्रा हा जगातील सर्वात लांब विषारी साप आहे. जर एखाद्या व्यक्ती किंवा प्राण्यापासून या सापाला धोका आहे असे जर वाटले तर हा साप त्याच्या शरीराच्या लांबीचा एक तृतीयांश भाग जमिनीवरून वर उचलू शकतो.

भारतात आढळणारा हा सर्वात प्राणघातक साप आहे. भारतात विशेषतः ग्रामीण भागात पावसाळ्यात त्याचा मानवांशी संपर्क वारंवार येतो. आण्विक जीवशास्त्रज्ञ शॉन कॅरोल यांनी न्यूयॉर्क टाईम्समध्ये लिहिले आहे की, या सापाच्या एका दंशाने व्यक्तीचा १५ मिनिटांत आणि प्रौढ हत्तीचा काही तासांत मृत्यू होऊ शकतो.

६) सॉ-स्केल्ड वाइपर

बिग फोरचा भाग असलेला सॉ स्केल्ड वाइपर हा साप मध्य पूर्व, दक्षिण आशिया आणि मध्य आशियामध्ये आढळतो. हे साप सामान्यतः आक्रमक असतात, जे जीवाला धोका असल्यास अतिशय “तीव्र” आवाज करतात, त्यामुळे त्यांच्या आवाजावरूनही ते ओळखले जाऊ शकतात.

बीबीसी वाइल्डलाइफनुसार, केवळ भारतात दरवर्षी अंदाजे ५,००० मानवी मृत्यूंसाठी सॉ-स्केल्ड वाइपर साप जबाबदार आहेत. एका व्यक्तीच्या मृत्यूसाठी या सापाचे पाच मिलिग्राम विष पुरेसे असते.