PF Account Transfer Process : खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) नोकरी बदलणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी भविष्य निर्वाह निधी (PF) खाते ट्रान्स्फर करण्याची प्रक्रिया आणखी सोपी केली आहे. ईपीएफओने बुधवारी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, काही प्रकरणांमध्ये पीएफ खाते हस्तांतरासाठी जुन्या किंवा नवीन कंपनीकडून ऑनलाइन अर्ज पाठविण्याची गरज भासणार नाही. ईपीएफ खात्यासाठी खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या मूळ वेतनातील १२ टक्के रक्कम दिली जाते. त्याचबरोबर कंपनीही कर्मचाऱ्याच्या पीएफ खात्यात तेवढीच रक्कम जमा करते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ईपीएफओने १५ जानेवारी २०२५ रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, पीएफ खाते ट्रान्स्फरसाठी जुन्या किंवा नवीन कंपनीकडून ऑनलाइन अर्ज पाठविण्याची गरज भासणार नाही. म्हणजेच ग्राहक स्वत: अकाउंट ट्रान्स्फरसाठी क्लेम करू शकतील. ईपीएफ खात्यांमधून पैसे एकाच खात्यात ट्रान्स्फर करा. हे काम करणे अवघड नाही. ईपीएफओ खात्यातून ऑनलाइन पैसे ट्रान्स्फर करण्याची सुविधादेखील देते. अशा परिस्थितीत तुम्ही हे काम घरी बसून करू शकता. त्याची प्रक्रिया आपण जाणून घेऊ.

  • कोणाला होणार फायदा
  • ज्या कर्मचाऱ्याचा UAN (०१/१०/२०१७ नंतर दिलेला) असेल आणि तो UAN आधार क्रमांकाशी जोडलेला असेल, त्याला फायदा होणार आहे.
  • वेगवेगळे UAN क्रमांक असतील; परंतु एक क्रमांक आधारशी जोडलेला असेल, त्या क्रमांकासाठी ही सुविधा घेता येणार आहे.
  • UAN मध्ये खाते ट्रान्स्फर करताना UAN आधारसोबत जोडलेले हवेत. तसेच सदस्याचे ID नाव, जन्मतारीख ही माहितीपण बरोबर हवी.
  • कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या परिपत्रकानुसार वरील प्रकरणांमध्ये आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ट्रान्स्फरसाठी थेट दावा करू शकतात. म्हणजेच जर UAN आधारशी लिंक असेल आणि जर ग्राहकांनी दिलेले वैयक्तिक तपशील सर्वत्र तंतोतंत जुळत असतील, तर भविष्य निर्वाह निधी नियोक्त्याकडून पडताळणीची गरज भासणार नाही.

ईपीएफओ पोर्टलवर ईपीएफ यूएएनला आधारसोबत कसे लिंक करावे?

  1. सर्वप्रथम EPFO वेबसाइटला भेट द्या आणि UAN लॉगिन क्रेडेन्शियल्स वापरून तुमच्या EPF खात्यात लॉग इन करा.
  2. त्यानंतर ‘मॅनेज’ मेनूमधील KYC पर्यायावर क्लिक करा.
  3. आधार निवडा आणि तुमचा आधार तपशील प्रविष्ट करा.
  4. त्यानंतर UIDAI डेटा वापरून तुमचा आधार सत्यापित करा.
  5. केवायसी पूर्ण झाल्यानंतर, आधार ईपीएफ खात्याशी जोडला जाईल.

नोकरी बदलताच EPF खाते मर्ज करा

पगारवाढ आणि चांगल्या संधी मिळण्यासाठी अनेक लोक दर दोन-तीन वर्षांनी नोकरी बदलतात. पण, नोकरी बदलताना आणि वाढलेल्या पगाराचा आनंद लुटताना लोक अनेकदा एक महत्त्वाची गोष्ट करायला विसरतात; ज्याचा दुष्परिणाम त्यांना नंतर भोगावा लागतो. खासगी क्षेत्रात काम करणारे लोक वेळोवेळी नोकरी बदलतात. नोकऱ्या बदलताना कर्मचाऱ्यासाठी नियोक्त्याकडून (कंपनी) नवीन EPF खाते उघडले जाते. मात्र, नवीन खाते उघडताना जुना UAN क्रमांक वापरला जातो. अशा परिस्थितीत बर्‍याच कर्मचार्‍यांचा गैरसमज होतो की, जर जुनाच UAN असेल, तर त्या UAN क्रमांकावरून चालणारे EPF खातेही एकच असेल; परंतु तसे होत नाही. बदलत्या कंपन्यांसह तुमचे EPF खातेदेखील स्वतंत्रपणे उघडले जाते, जे तुम्हाला EPFO वेबसाइटला भेट देऊन मर्ज करावे लागेल.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pf account transfer process a major change in epfo rules and you will be able to transfer your pf account yourself srk