गणपती विसर्जनानंतर लगेचच पितृपंधरवडा सुरु होतो हे आपल्याला माहित आहे. भाद्रपद महिन्यातील कृष्णपक्ष हा पितृपक्ष म्हणून ओळखला जातो. आपल्या पूर्वजांच्या नावे श्राद्ध करून पितरं जेवायला घातले म्हणजे त्यांच्या आत्म्याला शांती मिळते, हा यामागील समज आहे. यंदा २ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर दरम्यान पितृपक्ष आहे. या कालावधीत केले जाणारे पींडदान हे सर्वात श्रेष्ठ दान असून ते स्वर्गात असलेल्या पूर्वजापर्यंत पोहोचते. हे पिंडदान सकाळी किंवा रात्री करत नाहीत तर ते मध्यान्येला करणे योग्य मानले जाते. याचे कारण म्हणजे या वेळात सावली मागच्या बाजूला पडते. या काळात ब्राह्मणांना दिले जाणारे भोजन हेही चांगले दान समजले जाते.
पितृपंधरवड्यात आपले पूर्वज आपल्या आसपास असतात आणि ते आपल्या सोबत अदृश्यपणे राहत असतात असेही म्हटले जाते. यावेळी करण्याचे सर्व विधी दक्षिण दिशेला तोंड करुन केले जातात. यामागेही शास्त्रीय कारण असल्याचे दिसते. दक्षिणायन आणि उत्तरायण अशी सूर्याभोवतीच्या पृथ्वी प्रदक्षिणेचे चक्र आपल्याला माहित आहे. पृथ्वीवरील एक दिवस हा चोवीस तासांचा मानला गेला आहे, पण जे मृत झाले, त्या जिवांचा वर्षभराचा कालावधी म्हणजे एक दिवस असे मानले जाते. उत्तरायणाचा काळ हा देवांचा दिवस आणि दक्षिणायनाचा काळ ही देवांची रात्र, तसेच दक्षिणायन हा पितरांचा दिवस आणि उत्तरायण ही पितरांची रात्र असते असे म्हटले जाते.
पितृपक्ष म्हणजे काय?
पितृपक्षास हिंदू धर्मात विशेष महत्त्व देण्यात आले आहे. विक्रम संवत्सरानुसार भाद्रपद महिन्यातील कृष्णपक्षास पितृपक्ष या नावाने संबोधण्यात येते. या पंधरवडय़ात लोक दिवंगत पितरांच्या आत्म्याच्या शांततेसाठी श्राद्ध तर्पण विधी करतात ज्यात गाय आणि कावळा यांना विविध पदार्थ खाऊ घालण्याची प्रथा आहे. त्यांना खाऊ घालण्यात आलेले पदार्थ पितरांपर्यंत पोचतात आणि आत्म्याची तृप्ती झाल्याने त्यांना विविध प्रकारे शांती मिळते, असा समज आहे. पितरांच्या मृत्युतिथीनुसार प्रतिपदा ते अमावास्या या दरम्यान श्राद्ध कर्म करण्यात येते. जर एखाद्या पितराची मृत्युतिथी माहीत नसली तर पितृपक्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे सर्वपित्री अमावास्येस तर्पण करता येते. त्या दिवशी सर्व पितरांचे श्राद्धकर्म होऊ शकते. मृत्यूनंतर ज्या पितरांचे नियमानुसार श्राद्धकर्म होत नाही त्यांच्या आत्म्यास शांती मिळत नाही, असा समज आहे.