IAS Pooja Khedkar पुण्यातल्या वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar ) यांची वाशिमला बदली (Pooja Khedkar Transfer to Washim) करण्यात आली आहे. त्यांनी त्यांच्या खासगी ऑडी कारवर अंबर दिवा (Ambar Light On Car) लावल्याचं प्रकरणही वादग्रस्त ठरलं आहे. तसंच त्यांनी व्हॉट्स अॅपवरुन त्यांनी नियुक्तीचं पत्र मिळताच केलेल्या ऑर्डरही चर्चेत आहेत. तसंच केबीनचा शोध घेणं, त्यांच्या वडिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अरेरावी करणं या सगळ्या गोष्टीही चर्चेत आल्या आहेत. खासगी कारवर लावलेला अंबर दिवा म्हणजे काय? (What is Ambar Light?) त्यासाठीचे नियम काय आहेत? (What Are The Rules For It?) ते आपण समजून घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लाल, निळ्या दिव्यांच्या कारची चर्चा (Ambar Diva in Discussion)

देशात आयएएस अधिकाऱ्यांना (IAS Officers) दिल्या जाणाऱ्या सुविधा आणि लाल-निळ्या दिव्यांबाबत (Red and Blue Ambar Light) पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. पूजा खेडकर यांची बदली आणि व्हिआयपी कारला लाल-निळा दिवा लावणं हे प्रकरण वादात अडकलं आहे. पूजा खेडकर यांनी परीक्षा नेमकी कशी दिली? त्यात त्यांनी दिव्यांग असल्याचं सांगून गुण कसे वाढवले? हे देखील चर्चेत आहे. लाल दिव्याची कार असणं ही एकेकाळी शान मानली जायची. मंत्र्यांच्या कारवर लाल दिवा असे. त्या दिव्याला अंबर दिवा असं म्हटलं जातं. याचं कारण आहे तो कारच्या टपावर समोरच्या दिशेला दर्शनी भागात अगदी मधोमध लावला जातो.

वादग्रस्त ट्रेनी आयएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या खासगी कारवरही अंबर दिवा होता. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. (फोटो सौजन्य- पूजा खेडकर twitter)

हे पण वाचा- पूजा खेडकरांच्या आईची पोलिसांना आणि माध्यमांना दमदाटी, म्हणाल्या, “मी सगळ्यांना…”

लाल निळ्या अंबर दिव्याचं वाहन वापरण्याचा अधिकार कुणाला? (Who Have Right to Use Ambar Light Car?)

लाल निळे दिवे आयएस रँकचे अधिकारी त्यांच्या सरकारी वाहनांवर वापरु शकतात.

आयएएस अधिकारी पदावर असतानाच त्यांना लाल-निळा अंबर दिवा असलेली सरकारी कार वापरता येते.

अंबर दिवा किंवा लाल निळा दिवा असलेल्या कारमध्ये सरकारी अधिकारी नसल्यास ते दिवे विशिष्ट आच्छादनाने झाकण्यात येतात.

कोणताही आयएएस अधिकारी खासगी कारवर, व्यक्तिगत मालकीच्या कारवर लाल-निळा अंबर दिवा वापरू शकत नाही.

लाल-निळा अंबर दिवा आयएएस अधिकाऱ्याने त्याच्या खासगी कारवर लावला तर वाहतूक पोलीस संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करु शकतात.

हे पण वाचा- IAS पूजा खेडकर सर्व आरोपांना उत्तर देणार; माध्यमांना म्हणाल्या, “मी समितीकडे…”

लाल-निळ्या अंबर दिव्याबाबतचे नियम काय सांगतात? (What Are the Rules For Amber Light? )

१ मे २०१७ या दिवसापासून देशात लाल-निळ्या अंबर दिव्याचं कल्चर संपुष्टात आलं आहे. नियमांनुसार रुग्णवाहिका, अग्निशमन दलाच्या गाड्या, अत्यावश्यक सेवांमध्ये तैनात असलेल्या वाहनांसाठी अंबर दिवे वापरता येतात. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी मोदी सरकारने २०१७ मध्ये वाहन कायदा १९८९ यामध्ये दुरुस्ती केली होती. या कायद्यातील नियम १०८ (१), (३) मधल्या तरतुदींनुसार हे अंबर दिवे कुठल्या वाहनांवर असावेत हे ठरवण्याचा अधिकार केंद्र आणि राज्य सरकारला असतो.

अंबर दिव्याचे किती प्रकार? (How Many Types are Ambar Diva?)

लाल फ्लॅशरसह गोल फिरणारा अंबर दिवा : या प्रकरणाचा दिवा कारवर लावण्याचे अधिकार हे राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, विधान परिषद सभापती, विधानसभा अध्यक्ष, कॅबिनेट मंत्री, विधीमंडळाचे विरोधी पक्ष नेते यांना आहे. त्यांच्या शासकीय वाहनावर फ्लॅशरसह फिरणारा गोल दिवा ते वापरु शकतात.

लाल दिवा, फ्लॅशर नसलेला आणि गोल न फिरणारा : आपल्या शासकीय वाहनांवर या प्रकारातला अंबर दिवा लावण्याचे अधिकार विधान परिषदेचे उपपसभापती, विधान सभेचे उपाध्यक्ष, राज्य मंत्री, राज्य नियोजन आयोगाचे कार्यकारी अध्यक्ष, मुख्य सचिव, महाधिवक्ता, राज्य निवडणूक आयोग आयुक्त, लोकायुक्त, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरणाचे अध्यक्ष, राज्य अर्थ आयोगाचे अध्यक्ष, वैधनिक विकास मंडळाचे अध्यक्ष मुख्य माहिती आयुक्त आदी मान्यवर अधिकारी हे त्यांच्या शासकीय वाहनांवर फ्लॅशरविना फिरणारा गोल दिवा लावू शकतात.

केशरी रंगाचा अंबर दिवा फ्लॅशरविना आणि गोल न फिरणारा : प्रधान सचिव, अप्पर मुख्य सचिव, अप्पर मुख्य सचिव पदाच्या समांतर असणारे अधिकारी, पोलीस महासंचालक, महासंचालक पदाला समकक्ष असणारे अधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष, अ आणि ब वर्ग महापालिकांचे महापौर, प्रधान मुख्य वरसंरक्षक, विभागीय आयुक्त, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, अ आणि ब वर्ग महापालिकांचे आयुक्त हे मान्यवर गोल न फिरणारा आणि फ्लॅशर नसलेल्या केशरी रंगाचा अंबर दिवा वापरु शकतात.

निळ्या रंगाचा अंबर दिवा : जिल्हाधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी, तालुका दंडाधिकारी किंवा तहसीलदार, या अधिकाऱ्यांच्या शासकीय वाहनांवर आणि पोलिसांच्या वाहनांवर फ्लॅशरविना असलेला आणि गोल न फिरणारा निळा दिवा लावता येतो. हा निळा अंबर दिवा कायम सुरु असणारा असेल तो चालू-बंद होणार नाही.

जांभळ्या रंगाचा, आतील दिव्याचा लाल प्रकाश पडणारा, चालू-बंद होणारा दिवा : रुग्णवाहिका, अग्निशमन वाहनं, जांभळ्या काचेत, आतील दिव्याचा लाल प्रकाश पडणारा आणि चालू बंद होणारा दिवा वापरु शकतात.

फ्लॅशरसह असलेला अंबर दिवा किंवा स्थिर निळा-लाल अथवा निळा-पांढरा अंबर दिवा : अति महत्त्वाच्या व्यक्तींचा (VIP) एस्कॉर्ट करणारी शासकीय वाहने, अति महत्त्वाच्या व्यक्तींचा (व्हिआयपी) पायलट असणारी शासकीय वाहने, फ्लॅशरसह अंबर दिवा किंवा स्थिर सुरु निळा-लाल, निळा पांढरा असा अंबर दिवा वापरु शकतात. maharashtracivilservice.org या वेबसाईटवर ही माहिती दिली.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pooja khedkar car ambar light news in discussion do you know what is ambar light and what are the rules for it scj
Show comments