ब्रिटनच्या दिवंगत राजकुमारी डायना यांनी परिधान केलेल्या एका स्वेटरचा नुकताच लिला व करण्यात आला. पांढऱ्या मेंढ्या आणि त्यांच्यामध्ये एका काळ्या मेंढीचं चित्र असलेला हा स्वेटर लिलावात मोठ्या किंमतीत विकला गेला आहे. हा ब्लॅक शीप स्वेटर तब्बल १.१ मिलियन डॉलर्स (९ कोटी रुपयांहून अधिक) इतक्या किंमतीत विकला गेला आहे. न्यूयॉर्कमध्ये हा लिलाव पार पडला. लिलावकर्त्यांनी याची माहिती ट्विटरवर जाहीर केली आहे. सोथबीज या कला, लग्झरी, लिलाव आणि खासगी खरेदी विक्री करणाऱ्या कंपनीने हा लिलाव आयोजित केली होता.
सोथबीजने दिलेल्या माहितीनुसार प्रिन्सेस डायना यांनी हा स्वेटर १९८१ मध्ये प्रिन्स चार्ल्स यांच्या पोलो सामन्यादरम्यान परिधान केला होता. या स्वेटरसाठी ३१ ऑगस्ट २०२३ रोजी लिलाव सुरू करण्यात आला होता. लिलावाच्या शेवटच्या क्षणापर्यंत झालेली शेवटची बोली ही २ लाख डॉलर्सपेक्षा कमी होती. नंतर काहींनी बोली लावण्यास सुरुवात केल्याने लिलावाची वेळ वाढवण्यात आली. सोथबीजने या स्वेटरची किंमत ५०,००० डॉलर्स ते ८०,००० डॉलर्सच्या दरम्यान ठेवली होती.
सोथबीजने प्रिन्सेस डायनाच्या इतरही अनेक वस्तू लिलावात मांडल्या होत्या. त्यापैकी या स्वेटरलाच मोठी किंमत मिळाली आहे. हा स्वेटर खरेदी करणाऱ्याची माहिती सोथबीजने उघड केलेली नाही. प्रिन्सेस डायना या ब्रिटीश राजघराण्यातील सर्वात लोकप्रिय राजकुमारी होत्या. २४ फेब्रुवारी १९८१ रोजी प्रिन्स चार्ल्स यांच्याशी डायना यांचा साखरपुडा झाला आणि पाच महिन्यांनी दोघांनी विवाह केला.
हे ही वाचा >> स्टेट बँक ऑफ इंडिया ग्राहकांना पाठवणार चॉकलेट, कारण ऐकून बसेल धक्का
ब्रिटीश राजघराण्याच्या चालीरीती, वेगवेगळ्या पद्धती आणि महालातल्या वातावरणामुळे डायना यांना गुदमरल्यासारखं वाटायचं. त्यामुळेच त्या नेहमी अस्वस्थ असायच्या. त्यामुळे लग्नाच्या ११ वर्षांनंतर त्या प्रिन्स चार्ल्सपासून विभक्त झाल्या. ३१ ऑगस्ट १९९७ रोजी त्यांचा पॅरिसमध्ये एका रस्ते अपघातात मृत्यू झाला.