भारतातील सर्वांत श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा प्री-वेडिंग सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यासाठी भारतातीलच नव्हे, तर जगभरातील अनेक सेलिब्रिटी, उद्योजक उपस्थित होते. त्यामुळे अंबानींच्या भव्य सोहळ्यातील प्रत्येक गोष्टीवर चर्चा रंगली. त्यात विशेष चर्चा रंगली ती अनंत अंबानी यांच्या हातातील घड्याळाची. मेटाचे संस्थापक व सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी आणि त्यांच्या पत्नीने अनंत अंबानींच्या घड्याळाचे खूप कौतुक केले. अनंत अंबानी यांनी स्विस ब्रॅण्ड रिचर्ड मिलचे स्पेशल एडिशन घड्याळ घातले होते; ज्याची किंमतच १६.५० कोटी रुपयांपासून सुरू होते. परंतु, तुम्हाला माहीत आहे का की, जगभरात घड्याळांचे असे ब्रॅण्ड आहेत; ज्यांची किंमत समजल्यावर तुम्हीही चकित व्हाल.
जगातील पाच सर्वांत महागडी घड्याळे खालीलप्रमाणे :
१) Graff Diamonds Hallucination
हे घड्याळ जगातील सर्वांत महागडे घड्याळ आहे. त्यामध्ये ११० कॅरेटचे रंगीत हिरे जडवलेले आहेत. हे घड्याळ घड्याळापेक्षा ब्रेसलेट घातल्यासारखेच वाटते. ‘ग्रॅफ डायमंड्स’चे अध्यक्ष लॉरेन्स ग्रॅफ यांनी हे घड्याळ डिझाइन केले आहे. हे घड्याळ खरेदी करण्यासाठी ४५८ कोटी रुपये मोजावे लागतील. त्यामुळे इतके महागडे घड्याळ क्वचितच एखाद्याकडे असणे शक्य आहे.
२) Graff Diamonds The Fascination
जगातील सर्वांत महागड्या घड्याळांच्या यादीत हे घड्याळ दुसऱ्या स्थानावर आहे. Graff Diamonds या प्रसिद्ध ब्रिटिश ज्वेलरी ब्रॅण्डचे हे घड्याळ आहे. या घड्याळाचाही ब्रेसलेटची स्टाईल म्हणूनही वापर करता येतो. त्यात १५२.९६ कॅरेटचा पांढरा हिरा आणि मध्यभागी डायल म्हणून दुर्मीळ असा ३८.१३ कॅरेटचा हिरा आहे. त्यातून एक हिरा वेगळा करून तुम्ही तो अंगठी म्हणूनही परिधान करू शकता. या घड्याळाची किंमत ३३३ कोटी रुपये इतकी आहे.
३) Patek Philippe Grandmaster Chime Ref. 6300A-010
ग्रॅण्डमास्टर चाइम हे पाटेकचे आतापर्यंत विकले गेलेले सर्वांत महागडे घड्याळ आहे. हे घड्याळ २०१४ मध्ये ब्रॅण्डच्या १७५ व्या वर्धापन दिनानिमित्त तयार करण्यात आले होते. ड्युअल डायल सिस्टीममुळे हे घड्याळ इतर घड्याळांपेक्षा वेगळे ठरते. दोन्ही डायल निळ्या ओपलाइनने सुशोभित केलेल्या आहेत; ज्यात सोन्याचे नंबर्स आणि 18K सॉलिड गोल्ड डायल प्लेट्स आहेत. चायमिंग मोड, साउंड अलार्म व डेट रिपीटर यांच्या समावेशामुळे ते या घड्याळाचे आणखी एक वैशिष्ट्य ठरले आहे. व्हाइट गोल्डपासून बनविलेली केस आणि नेव्ही ब्ल्यू ॲलिगेटर चामड्याचा पट्टा असलेले हे घड्याळ आहे. या घड्याळाची किंमत २५८ कोटी रुपये आहे.
४) Breguet Grande Complication Marie Antoinette
फ्रेंच राणी मेरी अँटोइनेटिला हिला हे घड्याळ तिच्या प्रियकराने भेट दिले होते, असे सांगितले जाते. या घड्याळाच्या निर्मितीसाठी ४० वर्षे लागल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या घड्याळाशी भावनिक नातेसंबंध आणि रहस्यमय गूढ जोडले गेले आहे.
हे घड्याळ अब्राहम-लुईस ब्रेग्वेट यांनी डिझाइन केले होते आणि त्याला पोयम इन क्लॉकवर्क म्हटले जाते. सोन्यापासून निर्मित केलेले हे घड्याळ कॅलेंडरपासून थर्मामीटरपर्यंत सर्व गोष्टी दर्शविते. या घड्याळाची किंमत २५८ कोटी रुपये इतकी आहे.
५) Jaeger-LeCoultre Joaillerie 101 Manchette
Jaeger-LeCoultre हा आपल्या कारागिरीसाठी प्रसिद्ध असलेला एक प्रसिद्ध ब्रॅण्ड आहे. या ब्रॅण्डने राणी एलिझाबेथ II साठी भेट म्हणून Jaeger-LeCoultre Joaillerie 101 Manchette हे घड्याळ तयार केले. तिच्या कारकिर्दीला ६० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ते तयार करण्यात आले. व्हाइट गोल्डपासून बनविलेल्या या घड्याळावर ५७७ हिरे बसविलेले आहेत. त्यामुळे हे घड्याळ खूपच लक्झरियस वाटते. या घड्याळाची किंमत तब्बल २१६ कोटी रुपये इतकी आहे.