Public toilets in Indian trains: भारतीय रेल्वे अनेकांसाठी जीवनदायनी आहे. या सेवेचा वापर दररोज लाखो भारतीय करत असतात. देशभरामध्ये भारतीय रेल्वेचे जाळे पसरले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये या विभागाने हायटेक सोयीसुविधांचा वापर करायला सुरुवात केली आहे. वंदे भारत एक्सप्रेस हे याचे प्रत्यक्ष उदाहरण मानले जाऊ शकते. गेल्या काही वर्षांमध्ये देशातील रेल्वे विभागामध्ये खूप सुधारणा झाल्या आहेत. लोकांचा प्रवास सुखकर व्हावा याकरिता रेल्वे मंत्रालय नवनवीन गोष्टींचा अवंलब करत आहे.
भारतातील ट्रेन्समध्ये सध्या अनेक अत्याधुनिक सुविधा असल्या तरी तरी एक काळ असा होता जेव्हा रेल्वेमध्ये शौचालयासारखी सामान्य व्यवस्था नव्हती. यामुळे लोकांना प्रवास करताना खूप त्रास सहन करावा लागत असे. पुरुषांपेक्षा महिलांना या गोष्टीमुळे अधिक मनस्ताप होत असे. १८५३ मध्ये पहिली ट्रेन धावल्यानंतर तब्बल ५६ वर्षांनी १९०९ मध्ये रेल्वेत सार्वजनिक शौचालय बांधण्यात आले. ओखिल चंद्र सेन या बंगाली माणसाच्या पत्रामुळे तेव्हाच्या ब्रिटीश सरकारने रेल्वेमध्ये शौचालय सुरु करण्याचा निर्णय घेतला.
रेल्वेने प्रवास करताना ओखिल चंद्र सेन यांच्या पोटात कळ आली होती. ते रेल्वेरुळाच्या शेजारी जाऊन मोकळे होण्याचा प्रयत्न करत होते. तेवढ्यात त्यांची ट्रेन निघून जाते. ट्रेनमध्ये शौचालय नसल्याने त्यांच्या प्रवासामध्ये अडथळा आल्याने त्यांनी रेल्वे विभागाला पत्र लिहितात. या पत्रामध्ये ते म्हणतात, ट्रेनने प्रवास करत असताना माझ्या पोटात दुखू लागले. ट्रेनमध्ये शौचालयची व्यवस्था नसल्याने अहमदपूर स्थानक आल्यावर शौच करण्यासाठी मी ट्रेनच्या बाहेर पडलो. रुळाशेजारी मोकळा होत असताना ट्रेन सुटण्याचा आवाज आला. तेव्हा मी एका हातात लोटा आणि दुसऱ्या हातात धोतर पकडून धावू लागलो. मी गार्डला ट्रेन थांबवण्याची विनंती केली. पण त्याने माझं ऐकलं नाही. धावताना मी पडलो आणि आजूबाजूचे लोक माझ्यावर हसू लागले. तेथे महिला प्रवासी देखील होत्या.
२ जुलै १९०९ रोजी ओखिल चंद्र सेन यांनी लिहिलेले पत्र रेल्वे विभागाच्या साहिबगंज रेल्वे डिव्हिजनमधील अधिकाऱ्यांना मिळाले. ही गोष्ट ऐकून त्यांना रेल्वेमध्ये शौचालय असणे किती आवश्यक आहे याची जाणीव झाली. त्यानंतर या विभागाद्वारे ट्रेनच्या आतमध्ये शौचालय बांधले गेले. पुढे कालांतराने रेल्वे स्थानकांवरही सार्वजनिक शौचालयाची सुविधा सुरु करण्यात आली.