Pune History: १७४७ साली पुण्यामध्ये एका नोंदीनुसार जवळपास ३७ बागबगीचे होते. त्यामधील रमण बाग, हिरा बाग ही नावे पटकन आपल्याला सांगता येतील. पण पुण्यात अशीही एक बाग होती, जी बाग वसवली एकाने होती; पण कालांतराने दुसऱ्याच्याच नावाने ओळखली जाऊ लागली.
नाना फडणवीस हे पेशवाईच्या उत्तरार्धाच्या काळातील महत्त्वाचे व्यक्ती होते. नाना फडणवीस यांच्याकडे पेशवाईचे कारभारी हे पददेखील होते. नानांनी पुण्यातील जनाईचा मळा ही जागा विकत घेतली आणि त्या ठिकाणी बेल बाग वसवली. ही गोष्ट बहुतांश पुणेकरांना माहीत नाही. नाना फडणवीस यांनी पुण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये म्हणजे शुक्रवार पेठेत ही भव्य बाग उभारली होती.
पूर्वी शुक्रवार पेठेत होती ही बाग
सध्याच्या शुक्रवार पेठेतील हा भाग पूर्वीच्या काळी काळे वावर म्हणून ओळखला जायचा. नाना फडणवीस यांनी या काळ्या वावरातील जागा विकत घेऊन तिथे एक प्रशस्त बाग उभारली होती. हे काळे वावर म्हणजे आताच्या बाजीराव रस्त्यापलीकडील राजा केळकर संग्रहालय, सरस्वती मंदिर, वीरकर हायस्कूल असा थेट मामलेदार कचेरीपर्यंतचा भाग आहे.
नाना फडणवीस यांनी वसवलेल्या या बागेबद्दल सांगायचे झाल्यास या बागेचे एक प्रवेशद्वार हे आताच्या राजा केळकर संग्रहालयाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या तोंडाशी होते; तर दुसरे प्रवेशद्वार हे चिंचेच्या तालमीमागे होते. बागेची रचना चौरस होती आणि त्याचे चार भाग पडले होते. बागेमध्ये एका बाजूला विश्रामगृह होते आणि दुसऱ्या बाजूला कारंजे होते. या बागेतील रस्ते फरसबंदी असून, बागेत विविध प्रकारची फुलझाडे होती.
शनिवार वाड्यातूनही तीन पट मोठी बाग (Pune History)
एका तत्कालीन नोंदीनुसार, ही बाग १८ एकरांची होते. १८ एकर म्हणजे पुण्यातील सध्याचा शनिवार वाडा हा सहा एकरांचा आहे म्हणजे जवळपास शनिवार वाड्याच्या तिप्पट ही बाग मोठी होती. पेशवाईच्या अखेरीस पुण्याचे राजकारण बदलले होते. इंग्रजांचा अंमल सुरू झाला होता आणि त्यावेळी इंग्रजांच्या दरबारी बाळाजीपंत नातू नावाचे एक सरदार व इंग्रजांचे सल्लागार होते. १८३० साली इंग्रजांनी बाळाजीपंत नातू यांनी ही नाना फडणवीस यांच्या बागेची जागा इनाम म्हणून दिली. परंतु, या बागेची रचना काही प्रमाणात खराब झालेली होती. ही बाग बाळाजीपंतांनी पुन्हा वसवली, त्या जागेवर फुलझाडे लावली. पुढे त्यांच्या निधनानंतर बाळाजीपंतांचे चिरंजीव रावसाहेब नातू यांनी १८५६ साली तिथे एक महादेवाचे मंदिर उभारले. त्यानंतर पुन्हा एकदा नाना फडणवीस यांच्या बागेचा भाग पुन्हा गजबजू लागला. कालांतराने नाना फडणवीस यांच्या बागेला नातूंची बाग म्हणून ओळखले जाऊ लागले.
पाहा व्हिडीओ:
परंतु, नंतरच्या काळात नातूंच्या पुढच्या पिढीला एवढी मोठी बाग राखणे अवघड वाटू लागले. नातू बागेतील परिसरात मोठ्या प्रमाणात वर्दळही वाढू लागली. नगररचनेचे निमित्त साधून बाजीराव रस्ता हा टिळक रोडपर्यंत वाढवण्यात आला आणि नातू बागेतील त्या परिसराचे दोन भाग करण्यात आले. आता अनेक वर्षांनंतर आता हा भाग पुण्याचा मध्यवर्ती भाग म्हणून ओळखला जातो. इथे मोठमोठ्या इमारती उभारण्यात आल्या. सध्या अनेक मोठमोठ्या इमारती असणाऱ्या या जागेवर कधी काळी १८ एकरांची मोठी बाग होती, असा विश्वास ठेवणे अवघड जाईल.