Pune Video : पुणे हे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते. येथील ऐतिहासिक वास्तू आणि मंदिरे या शहराचा इतिहास सांगतात. आज आपण अशाच एका मंदिराविषयी जाणून घेणार आहोत. या मंदिराला पुण्याचे पंढरपूर म्हणून मान मिळाला आहे. या मंदिराला पुण्याचे पंढरपूर का म्हणतात आणि या मंदिराचा इतिहास काय आहे, याविषयी आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मंदिरांचे शहर म्हणजे पुणे आणि पुण्यात एका मंदिराला पुण्याचे पंढरपूर म्हणतात. पुण्यातील नाना पेठ येथे हे मंदिर असून या मंदिराचे नाव आहे श्री निवडुंगा विठोबा देवस्थान. या विठोबाला बोली भाषेत निवडुंग्या विठोबा असेसुद्धा म्हणतात.

या मंदिराला पुण्याचे पंढरपूर का म्हणतात? जाणून घ्या इतिहास

‘गोष्ट पुण्याची’ या मालिकेत लोकसत्ताने या मंदिराचा इतिहास जाणून घेतला. पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मूर्तीप्रमाणे या मंदिरातील विठ्ठलाचीसुद्धा स्वयंभू मूर्ती आहे. त्यामुळे या मंदिराला एक वेगळे महत्त्व आहे. जेव्हापासून पालखी सोहळा सुरू झाला, तेव्हापासून संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपूरला जाण्यापूर्वी या मंदिरात विसावा घ्यायची. त्यानंतर वारकरी समाज झपाट्याने वाढला, त्यामुळे मंदिरातील जागा अपुरी पडली. त्यामुळे आता तुकाराम महाराजांची पालखी या मंदिरात मुक्काम घेते, तर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी भवानी पेठेतल्या ‘पालखी विठोबा’ मंदिरात मुक्कामास असते. जेव्हा पालखी सोहळा असतो तेव्हा मोठ्या संख्येने भाविक या मंदिराला भेट देतात.

हेही वाचा : VIDEO : पुण्यामधील ‘या’ भागात होतं पांडवांचं वास्तव्य! थेट पांडवकाळाशी संबंध

या विठोबाला निवडुंगा हे नाव कसे पडले?

लेखक सुप्रसाद पुराणिक ‘नावामागे दडलंय काय?’ या पुस्तकात निवडुंगा विठोबाच्या मंदिराविषयी सांगतात, “नाना पेठेतील या मंदिराच्या इथे पूर्वी निवडुंगाचे रान माजलेले होते. विठ्ठलाच्या एका भक्ताला येथे एक काळी पाषाण मूर्ती स्वप्नात आली आणि ती येथील निवडुंगात सापडली, म्हणून या दंतकथेवरून याचे नाव ‘निवडुंग्या विठोबा’ असे रूढ झाले. या भागात पूर्वी अनेक गोसावी राहत असत. हे मंदिर त्यापैकी एका गोसाव्याने बांधले असून इ.स. १८३० मध्ये पुरुषोत्तम अंबादास नावाच्या सधन गुजराती गृहस्थाने ३० हजार रुपये खर्च करून या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता.”

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune news why nivdunga temple in pune called punes pandharpur know its history ndj