Ambil odha History : पावसाळा सुरू झाला की पुण्यातील मुळा-मुठा नद्यांना पूर येतो, त्यामुळे पुण्यातील या मुळा-मुठा नद्या सर्वांना माहिती आहेत; पण तुम्हाला पुण्यातील आंबिल ओढाविषयी माहिती आहे का? आंबिल ओढा हा पूर्वी पेठामधून वाहायचा, पण अशी एक घटना घडली आणि हा ओढा पुण्याबाहेर गेला? तुम्हाला वाटेल हे कसं शक्य आहे? पाण्याचा ओढा कसा गावाबाहेर जाणार आणि का?

डॉ. अविनाश सोवनी यांच्या ‘हरवलेले पुणे’ या पुस्तकात आंबिल ओढा गावाबाहेर कसा गेला याचा उल्लेख केला आहे. त्याचबरोबर ‘गोष्ट पुण्याची’ या लोकसत्ता विशेष मालिकेतसुद्धा याविषयी माहिती सांगितली आहे. आज आपण त्या विषयीच जाणून घेणार आहोत.

आंबिल ओढा

असं म्हणतात, प्राचीन काळापासून पुण्यात दोन ओढे होते. एक होता नागझरी ओढा आणि दुसरा आंबिल ओढा. तीनशे वर्षांपूर्वी हा आंबिल ओढा बुधवार पेठेतून वाहायचा. जिलब्या मारुतीजवळ या आंबिल ओढ्याकाठी स्मशानभूमीही होती. पुढे अमृतेश्वर मंदिरापाशी हा ओढा मुठा नदीला जाऊन मिळायचा.

आंबिल ओढ्याची सुरुवात ही कात्रज तलावापासून होते. पेशव्यांच्या काळात आंबिल ओढा ही पुण्याची पश्चिम सीमा समजली जायची. कात्रजहून वाहत येणारा आंबिल ओढा हा पर्वतीच्या पायथ्यावरून पुणे गावात जायचा. अनेकदा पावसाळ्यात पूर यायचा आणि गावातील लोकांचं नुकसान व्हायचं.

हेही वाचा : रेल्वे तिकीट असतानाही प्रवाशाला टीटी रेल्वेतून उतरवणार, कारण काय? रेल्वेचा ‘हा’ नियम तुम्हाला माहिती आहे का?

पूर्वी गावातून वाहणारा हा आंबिल ओढा गावाबाहेर कसा गेला ?

पेशव्यांच्या काळात १७५२ साली आंबिल ओढ्याला अचानक मोठा पूर आला. त्यात ४०-५० माणसे पुरात अक्षरशः वाहून गेली. तेव्हा गादीवर असलेल्या नानासाहेब पेशव्यांनी आंबिल ओढ्याचा प्रवाह बदलायचे ठरवले. त्यांनी सारसबाग येथे असलेल्या तळ्याला व ओढ्याच्या पाण्याला अडवण्यासाठी छोटे धरण बांधले. यामुळे ओढ्याचा प्रवाह पर्वतीच्या खालच्या बाजूने थेट नदीला मिळाला, यामुळे महत्त्वाची समस्या तर दूर झाली; पण त्याचबरोबर एकेकाळी गावातून जाणारा आंबिल ओढा गावाबाहेर गेला.

पुण्याच्या शहराच्या विकासात आंबिल ओढ्याचा मोठा वाटा

ओढ्याच्या पलीकडे वस्ती वाढेल हा नानासाहेबांचा अंदाज अचूक ठरला आणि ओढा बुजल्याचा खेद वाटेनासा झाला. पुढच्या काही वर्षांत आंबिल ओढ्याचा रिकामा खड्डा बुजला आणि त्यावर रस्ते, घरे बांधली गेली. थोरल्या माधवराव पेशव्यांनी त्या काळात सदाशिव पेठ आणि नारायण पेठ वसवली. आज वाढलेल्या डेक्कन, कोथरूडमुळे पुणे महानगर जे निर्माण झाले आहे, त्या विकासात या आंबिल ओढ्याचा मोठा वाटा आहे.