Pune Video : पुणे हे ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते. या शहराला छत्रपती शिवाजी महाराजांपासून पेशव्यांपर्यंतचा इतिहास लाभला आहे. तुम्हाला माहिती आहे, पुण्यामध्ये पांडवांचं वास्तव्य होतं ते? तुम्हाला वाटेल ते कसं शक्य आहे? पण, हे खरंय. पुण्यातील अशाच बाणेरसारख्या वेल डेव्हलप भागात एक पांडवकालीन लेणी आहे आणि हाच एक मोठा पुरावा आहे.
लोकसत्ताच्या ‘गोष्ट पुण्याची’च्या भागात बाणेरमधील बाणेश्र्वर मंदिर आणि तिथल्या याच पांडवकालीन लेणींविषयी सविस्तर माहिती सांगितली आहे .
पुण्याच्या पश्चिमेकडील भाग म्हणून बाणेरला ओळखले जाते. पूर्वी हा भाग पुण्याच्या उपनगरात होता. असं म्हणतात की, प्रभू श्रीरामांनी बाणासुराचा वध याच गावामध्ये केला होता, म्हणून या गावाला बाणेर असे नाव पडले. यालाच पुष्टी देणारी गोष्ट म्हणजे बाणेरमधून वाहणारी ‘राम’ नावाची नदी आहे.
जसा बाणेरचा रामायणाशी संबंध येतो, तसाच पांडव काळाशीही येतो. आज आपण याविषयीच जाणून घेणार आहोत.
बाणेश्वर लेणी
बाणेरमधील या भैरवनाथ मंदिराच्या आवारात एक समाधी शिळा आणि एक वीरगळ आपल्याला पाहायला मिळतात. तसेच तेथे एक दगडी सुंदर दीपमाळदेखील आपल्याला पाहायला मिळते. पण, येथील बाणेश्वर लेणी सर्वांचे लक्ष वेधून घेते.
लेणींमध्ये प्रवेश केल्यावर आपल्याला इंग्रजी V अक्षराच्या खडकातून प्रवेश करावा लागतो. या ‘बाणेश्वर लेणींमध्ये’ तीन गुहा कोरलेल्या असून या गुहा सहा खांबांवर आधारलेल्या आहेत. यापैकी डाव्या बाजूच्या गुहेमध्ये आपल्याला पाण्याचे कुंड दिसून येते. हे पाण्याचे कुंड अर्जुनाने बाण मारून निर्माण केले आहे अशी आख्यायिका आहे. मधल्या गुहेमध्ये भगवान शंकराची पिंड आपल्याला पाहायला मिळते. यावरून हे या लेणींमधील गर्भगृह आहे, असं आपण म्हणू शकतो. पण, यातील तिसरी गुहा मात्र बंद अवस्थेत पाहायला मिळते.
हेही वाचा : VIDEO : पानिपतच्या युद्धानंतर नानासाहेब पेशव्यांनी तातडीने ‘लकडी पूल’ का बांधून घेतला? वाचा रंजक गोष्ट
पाहा व्हिडीओ
जेव्हा पांडव १२ वर्ष वनवास आणि एक वर्ष अज्ञातवासात होते, तेव्हा त्यातील काही काळ त्यांनी इथेसुद्धा व्यतीत केला. त्यामुळे ही लेणी द्वापारयुगात बांधली गेली आहे.
बाणेर हा पुण्यातील गजबजलेला परिसर असला तरी या जागेने येथील शांतता अबाधित ठेवली आहे. सुट्टीच्या दिवशी तुम्ही या बाणेश्वर लेणीला नक्की भेट देऊ शकता.