Mahathma Phule Mandai : पुणे हे महाराष्ट्रातील ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते. येथील शनिवार वाडा, लाल महाल, विश्रामबाग वाडा अशा अनेक ऐतिहासिक वास्तू पुण्याची ओळख सांगतात. पुण्याच्या वास्तुवैभवात भर घालणारी एक वास्तू म्हणजे महात्मा फुले मंडई. पुण्याच्या दीडशे वर्षांच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासाची साक्षीदार असलेल्या या इमारतीच्या बांधकामाला एकेकाळी पुणेकरांचा विरोध होता. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल असे का? आणि ही इमारत कोणी बांधली? आज आपण याच इमारतीविषयी जाणून घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पूर्वी भाजी मंडई कुठे भरत असे?

एकेकाळी पुण्यात शनिवारवाड्याच्या समोरील मोकळ्या पटांगणात भाजी मंडई भरत असे. १८२८ मध्ये शनिवारवाडा जळून खाक झाल्यानंतर हे पटांगण मोकळेच होते. पुढे १८४० च्या सुमारास ब्रिटिशांनी फळे, भाज्या यांचा बाजार लावण्यास परवानगी दिली. पुणे व त्याच्या आसपासच्या खेड्यातून येणारा ताजा भाजीपाला शेतकरी तेव्हा स्वतः विकायला बसत. बटाट्यांच्या व्यापारामुळेच शनिवार वाड्याजवळील मंदिराला बटाट्या मारुती हे नाव पडले, अशी नोंद आहे. त्यावेळी पुण्यात राहणारा स्थानिक नोकरदार वर्ग हा या भाजी बाजाराचा प्रमुख ग्राहकवर्ग होता. पुढे पुण्याचा विस्तार जसा वाढत गेला, तशी अडचण येऊ लागली.

ही इमारत कोणी बांधली?

त्यावेळी एका स्वतंत्र, मध्यवर्ती जागेत एक मंडईची इमारत असावी आणि त्यात सर्व विक्रेते यांना एकत्रित जागा असावी अशी कल्पना पुढे आली. त्यानुसार सरदार खासगीवाल्यांची जागा विकत घेऊन ब्रिटिशांनी मंडईचे बांधकाम सुरू केले. त्यामुळे सुरुवातीला पुणेकरांचा या मंडईच्या बांधकामाला विरोध होता, पण नंतर तो कमी होत गेला. या इमारतीचे ५ ऑक्टोबर १८८५ रोजी लॉर्ड रे आणि ड्युक ऑफ कनॉट यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

हेही वाचा : अमेरिकेतील निवडणूक नोव्हेंबरच्या पहिल्या सोमवारनंतर येणाऱ्या पहिल्या मंगळवारीच का असते? जाणून घ्या

इमारतीचे नाव बदलले

या मंडईचे तेव्हाचं नाव ‘रे मार्केट’असं होतं. ही नवी मंडई १४०० गाड्यांची होती. मंडई स्थापन तर झाली, पण जुन्या मंडईतील व्यापारी इथे यायला तयार नव्हते, त्यामुळे त्यांना इथे सक्तीने हलवावे लागले असंदेखील म्हटलं जात होतं. २२ जुलै १९२४ ला मोतीलाल नेहरू यांच्या हस्ते मंडईच्या समोरील लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आणि १९३८ मध्ये या इमारतीचे ‘रे मार्केट’ असे नाव बदलून ‘महात्मा फुले मंडई’ असे नामकरण करण्यात आले.

हेही वाचा : Dadasaheb Phalke Award : दादासाहेब फाळके पुरस्काराची परंपरा कधी सुरु झाली? काय असतं पुरस्काराचं स्वरुप? कोण कोण आहेत मानकरी?

इमारतीची रचना

मंडईची इमारत ही बेसाल्ट दगडापासून बांधली असून, इमारतीचे बांधकाम प्रसिद्ध वास्तूरचनाकर वासुदेव बापूजी कानिटकर यांनी केले. ही इमारत निओ गॉथिक शैलीतील असून मध्यभागी असलेल्या शिखराखालील खोल्यांमध्ये पूर्वी नगरपालिकेचे कार्यालय आणि लॉर्ड रे इंडस्ट्रीयल म्युझियम होते. मुख्य इमारतीच्या भिंतीवर आपण पहिलंत तर जागोजागी फुले, पाने, प्राणी अशी नक्षी आपल्याला दिसून येते.

सध्याच्या घडीला महात्मा फुले मंडई हा पुण्याचा मध्यवर्ती आणि गजबजलेला भाग आहे. विविध जातीधर्माचे लोक इथे वर्षानुवर्षे गुण्यागोविंदाने व्यवसाय करतात. रोजीरोटी, व्यवसाय यांच्या पलीकडे जाऊन एकात्मतेचे प्रतीक म्हणजे महात्मा फुले मंडई आजही ओळखली जाते.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune video why were the people of pune opposed to the construction of mahathma phule mandai the biggest retail vegetable market in pune ndj
Show comments