Rahul Gandhi Flying Kiss History: किस हे प्रेम व्यक्त करण्याचं एक माध्यम मानलं जातं. पाश्चिमात्य देशांमध्ये तर किस हे आदर, माया, आपुलकीचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. पण एखाद्याच्या परवानगीशिवाय आणि चुकीच्या पद्धतीने चुकीच्या वेळी किस किंवा किस केल्याचे हावभाव करणं हे सुद्धा अनैतिक मानलं जातं. अलीकडेच, संसदेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘फ्लाइंग किस’ मुळे वादाला तोंड फुटले आहे. संसदेतून बाहेर पडताना त्यांनी ‘फ्लाइंग किस’ दिल्याचा आरोप भाजपच्या खासदारांनी केला. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांच्या या कृतीवर कडाडून टीका केली होती, “हा महिलांचा अपमान आहे, राहुल गांधी हे स्त्रीद्वेष्टे आहेत” असेही त्या म्हणाल्या. ज्या फ्लाईंग किसवरून हा सगळा गोंधळ सुरु झाला आहे त्याचे नेमके मूळ काय आणि जगात ही संकल्पना व संज्ञा आली कुठून हे तुम्हाला माहित आहे का? चला जाणून घेऊया…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘फ्लाइंग किस’ या शब्दाचा खरा अर्थ काय?

‘फ्लाइंग किस’, ज्याला ‘ब्लोन किस’ असेही म्हणतात, हा एक हावभाव आहे ज्यात व्यक्ती हाताच्या बोटांना किस करून एखाद्याच्या दिशेने फुंकर मारते. मित्र मैत्रिणी, नातेवाईक, यांना अशा प्रकारे किस करण्याची पद्धत आहे. तुम्ही पाहिले असेल अनेक सेलिब्रिटी त्यांच्या फॅन्सना फ्लाईंग किस देतात. यामध्ये किस इतकी शारीरिक जवळीक नसल्याने त्या नात्याची आब सुद्धा राखून ठेवता येते व प्रेम सुद्धा व्यक्त करणे शक्य होते. ही पद्धत साधारण १६०० च्या आसपास अस्तित्वात आल्याचे दाखले दिले जातात. ‘फ्लाईंग किस’ चे मूळ नाव ‘ब्लोन किस’ होते जे जुनी इंग्रजी संज्ञा ‘ब्लावान’ याचा अपभ्रंश होऊन पडले आहे. ब्लावान या शब्दाचा अर्थ होतो फुंकर मारणे.

किसिंग वरून ठरायचं समाजातील स्थान?

मार्सेल दानेसी यांनी त्यांच्या ‘द हिस्ट्री ऑफ द किस’ या पुस्तकात लिहिले आहे की, “पर्शियामध्ये, एखाद्या व्यक्तीच्या सामाजिक स्थितीनुसार, चुंबन घेण्यास परवानगी दिली जात होती. सम्राटाच्या समान दर्जाच्या माणसाचे ओठांवर चुंबन घेऊन स्वागत केले जात होते तर कमी दर्जाच्या व्यक्तीस गालावर किस केले जायचे. पायाला स्पर्श करून किस करणे हे त्याहून कमी दर्जाचे म्हणून ओळखले जात होते.”

मध्ययुगात, प्रोटेस्टंट रिफॉर्मेशनने चुंबन घेण्यास “एक घृणास्पद दैहिक कृत्य” म्हणून घोषित करून यावर बंदी घातली होती. लिप-किसबद्दल बोलताना, डॅन्सी यांनी लिहिले की ते ११ व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि १२ व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात लिहिलेल्या कथा आणि कादंबऱ्यांमध्ये ओठांवर किस करण्याच्या कृतीवर प्रकाश टाकण्यात आला. Commedia dell’Arte म्हणून ओळखल्या जाणार्‍या नाटकातून यावर भर देण्यात आला आणि मग तिथून ओठावरील किस हा रोमान्सचा एक भाग म्हणून पाहिला जाऊ लागला.

किस करणं हे संस्कृतीचा भाग कधी बनलं?

शेक्सपियरने ‘रोमिओ अँड ज्युलिएट’मध्ये ‘चुंबन’ हे सांस्कृतिक परंपरा म्हणून समाजात रुजल्याचे दर्शन घडवले. चुंबनला प्राप्त झालेल्या नवीन महत्त्वामुळे इटलीमध्ये एक नवीन कायदा मंजूर झाला होता, ज्यानुसार, “लग्नाच्या दिवशी चुंबनापूर्वी वधू किंवा वर यांचा मृत्यू झाल्यास, लग्नात मिळालेली प्रत्येक भेटवस्तू परत द्यावी लागणार होती.”

मध्ययुगीन काळापासून आधुनिक काळापर्यंत, चुंबन हा लोकप्रिय संस्कृतीचा प्रमुख पैलू बनला नाही, परंतु समाजाने ओठ आणि हृदय यांच्यातील संबंध स्वीकारल्यानंतर पॉप संस्कृती स्वतःच अस्तित्वात आली, असे दानेसी म्हणतात.

“मध्ययुगीन युरोपमधील प्रचलित धार्मिक आणि पितृसत्ताक व्यवस्था मोडीत काढण्याची गरज म्हणून चुंबनाचा उगम झाल्यामुळे, कथन, कविता आणि व्हिज्युअल आर्टद्वारे जिथेही त्याची ओळख झाली तिथे त्याला खूप महत्त्व प्राप्त झाले.”

हे ही वाचा<< मुंबईत मध्य रेल्वेची ‘ही’ १५ स्थानकं जागतिक दर्जाची होणार; अमृत भारत स्टेशन योजनेतुन होणाऱ्या बदलांची यादी पाहा

दरम्यान, राहुल गांधी यांच्या कृतीवरून काल संसदेत मात्र गदारोळ माजला होता. याविरुद्ध अध्यक्ष ओम बिर्ला यांना एनडीएच्या महिला खासदारांनी स्वाक्षरी केलेले पत्र पाठवले आहे.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi flying kiss made smriti irani angry did you know how kissing used to decide social status first flying kiss history svs