Raigad Khalapur Irshalgad Irshalwadi Landslide: रायगडच्या खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावात दरड कोसळल्याची घटना समोर आली आहे. माळीण आणि तळीये दुर्घटनेची आठवण करून देणाऱ्या या घटनेने राज्य हादरलंय. रात्री ११-१२ च्या सुमारास इर्शाळवाडीत दरड कोसळून १०० हून अधिक लोक बेपत्ता झाले आहेत. एनडीआरएफची बचाव पथकं याठिकाणी युद्धपातळीवर कार्यरत आहेत. अशाप्रकारच्या सर्व दुर्घटनांच्या वेळी ‘एनडीआरएफ’ हे चार अक्षरी नाव पटकन चर्चेत येतं. पण मुळात एनडीआरएफ म्हणजे काय? कुठल्याही आपत्तीच्या वेळी वाऱ्याच्या वेगाने ही टीम कशी पोहोचते? महाराष्ट्रात एनडीआरएफचे कार्यालय आहे का? एनडीआरएफचे नेमके काम तरी काय असते? या सगळ्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत.
NDRF म्हणजे काय?
NDRF चे पूर्ण नाव ‘राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल’ (National Disaster Response Force) आहे. यामध्ये तीन बीएसएफ, दोन सीआरपीएफ, दोन सीआयएसएफ, दोन आयटीबीपी आणि दोन एसएसबी जवानांचा समावेश असतो. कोणत्याही प्रकारची नैसर्गिक आपत्ती आल्यास संबंधित ठिकाणी बचावकार्य राबवण्यासाठी आणि लोकांच्या मदतीसाठी ही टीम रुजू होते. NDRF हे १२ बटालियनचे एक दल आहे.
NDRF ची स्थापना कधी झाली?
देशातील आपत्तींचा सामना करण्यासाठी भारत सरकारने २००५ साली आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला. याअंतर्गत एखाद्या नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीच्या वेळी होणारी हानी टाळण्यासाठी पथक स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले. यानुसार, २००६ मध्ये NDRF ची स्थापना करण्यात आली. या टीमचे नियोजन हे गृह मंत्रालयाच्या अधिकारकक्षेत येते. कोणतीही दुर्घटना घडल्यानंतर तातडीने बचावकार्य करण्याची जबाबदारी NDRFकडे असते.
NDRF च्या टीममध्ये कोणते तज्ज्ञ असतात?
भारताच्या निमलष्करी दलातील प्रतिनियुक्तीवरील व्यक्तींद्वारे हे काम चालते. स्थापनेच्या वेळी NDRFचे देशभरात आठ बटालियन होते. सध्या बटालियनची संख्या वाढवून ती १२ करण्यात आली आहे. प्रत्येक बटालियनमध्ये सुमारे १,१४९ अधिकारी आणि जवान कार्यरत असतात. प्रत्येक बटालियनमध्ये ठराविक तुकड्या असतात. प्रत्येक तुकडीत ४५ जवान असतात, ज्यात अभियंता, इलेक्ट्रिशियन, तंत्रज्ञ, डॉग स्क्वाड आणि आरोग्यसेवेसाठी विशेषरीत्या प्रशिक्षित जवान असतात.
कोल्हापूर- मुंब्रा- माळीण- इर्शाळगड NDRF ची टीम लगेच कशी पोहोचते?
NDRF चे महासंचालक सत्यनारायण प्रधान व महाराष्ट्र NDRF चे प्रमुख हे अनुपम श्रीवास्तव यांच्या अधिकारकक्षेत महाराष्ट्र आणि गोवा ही राज्य पाचव्या बटालियनच्या कार्यक्षेत्रात येतात. पाचव्या बटालियनमध्ये एकूण १८ तुकड्या आहेत – तीन तुकड्या मुंबईत कार्यरत आहेत, पुण्यातील मुख्यालयात १४ तुकड्या तैनात असतात तर नागपूरमध्ये एक तुकडी नेहमी सज्ज असते. यामुळेच तिन्ही क्षेत्रातील आपत्कालीन परिस्थितीत NDRF ची टीम सर्वात आधी घटनास्थळी मदतीसाठी पोहोचू शकते.