RBI अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आज नव्वद वर्षांची झाली आहे. या बँकेचा इतिहास, या बँकेचं चिन्ह ही सगळीच माहिती आणि हा इतिहास मोठा रंजक आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही सगळ्या बँकांची आई आहे असं म्हटलं तर मुळीच वावगं ठरणार नाही. घरात ज्याप्रमाणे आई सांगते, नियम घालून देते त्याचप्रमाणे या आरबीआयचं कार्य चालतं. इतर सगळ्या बँकाची नियमावली कशी असली पाहिजे हे ठरवण्याचा अधिकार आरबीआयला आहे. आपण जाणून घेऊ या बँकेचा इतिहास आणि महत्त्व.
जगात मध्यवर्ती बँक कधी सुरु झाली?
जगभरात सतराव्या शतकापासून मध्यवर्ती बँकांचा उदय होण्यास सुरुवात झाली. रिक्स बँक ऑफ स्वीडन ही जगातली पहिली मध्यवर्ती बँक. ही बँक १६५६ ला स्थापन झाली होती. १६९४ मध्ये बँक ऑफ इंग्लंड ही बँक अस्तित्वात आली. भारतात मध्यवर्ती बँकेचं अस्तित्व विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापासून उदयाला आलं. १९१३-१४ मध्ये ऑस्टिन चेंबरलीन यांच्या अध्यक्षतेखाली चेंबरलीन आयोग स्थापन करण्यात आला. या आयोगाने भारतात स्वतंत्र मध्यवर्ती बँक हवी अशी शिफारस केली. या आयोगामधील एका सदस्याने बँक ऑफ बंगाल, बँक ऑफ बॉम्बे व बँक ऑफ मद्रास या तीनही बँकांना एकत्रित करून एक बँक स्थापन करावी आणि तिला मध्यवर्ती बँकेचा दर्जा देण्यात यावा, अशी शिफारस केली. या शिफारशीला अनुसरून १९२१ मध्ये या बँकेच्या एकत्रीकरणातून इम्पीरियल बँक अस्तित्वात आली; परंतु त्या बँकेला मध्यवर्ती बँकेचे काम देण्यात आले नाही.
ब्रिटिशांतर्फे भारतात १९२५-२६ मध्ये यंग हिल्टन यांच्या अध्यक्षतेखाली हिल्टन आयोग (रॉयल कमिशन ऑन इंडियन करन्सी अँड फायनान्स)ची स्थापना करण्यात आली. या आयोगानेसुद्धा आपल्या अहवालामध्ये मध्यवर्ती बँकेच्या स्थापनेची शिफारस केली होती. या आयोगाच्या शिफारसींना अनुसरून जानेवारी १९२७ मध्ये रिझर्व्ह बँक विधेयकसुद्धा कायदे मंडळामध्ये मांडण्यात आले; परंतु ते विधेयक संमत झाले नाही. त्यानंतर १९३३ मध्ये भारताच्या घटनात्मक सुधारणांबाबत गोलमेज परिषदांच्या शिफारसींचा आधार घेऊन एक श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्यात आली. या श्वेतपत्रिकेला अनुसरून त्या आशयाचे विधेयक सप्टेंबर १९३३ मध्ये कायदे मंडळामध्ये मांडण्यात आले . त्या विधेयकाला अंतिम संमती मिळून रिझर्व्ह बँक कायदा, १९३४ अस्तित्वात आला. या कायद्याची अंमलबजावणी ६ मार्च १९३४ पासून झाली.
१ एप्रिल १९३५ ला कलकत्ता येथे रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आली आणि ती कार्यरत झाली. पुढे १९३७ मध्ये रिझर्व्ह बँकेचे स्थलांतर मुंबईला करण्यात आले. १५ ऑगस्ट १९४७ पासून ३० जून १९४८ पर्यंत पाकिस्तानची मध्यवर्ती बँक म्हणूनदेखील रिझर्व्ह बँकच कार्यरत होती.
दोन्ही देशांची मध्यवर्ती बँक म्हणून कार्यरत असताना रिझव्र्ह बँकेने समन्वयाची भूमिका चोखपणे बजावली होती. पहिले काही महिने उभय देशांमध्ये ठरल्यानुसार अटी व शर्तीची अंमलबजावणी व्यवस्थित होत होती. देशाची फाळणी होत असताना देशातील संस्थानिकांना भारत अथवा पाकिस्तान या दोन्हींपैकी कोणत्या राष्ट्रांमध्ये आपल्या संस्थांचे विलीनीकरण करावयाचे याबाबत निर्णय घेण्याची मुभा देण्यात आली होती.
आरबीआयचा इतिहास रंजक
भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या ‘रिझव्र्ह बँक ऑफ इंडिया’चा इतिहास हा जसा मनोरंजक आहे, तसाच तो देशाच्या आर्थिक इतिहासाचा एक भाग आहे. भारताच्या आर्थिक व्यवस्थेची सर्वोच्च संस्था म्हणून रिझव्र्ह बँक भारतीय अर्थव्यवस्थेच्या व्यवस्थापनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. त्यामुळे हा केवळ एखाद्या संस्थेचा इतिहास नसून देशाच्या अर्थव्यवस्थेला प्रभावित करणाऱ्या धोरणांचा इतिहास आहे. रिझव्र्ह बँकेच्या आजपर्यंतच्या विविध धोरणांनुसारच गेली अनेक वर्षे अर्थव्यवस्थेत अनेक घटना घडल्या आहेत. या घटना घडविण्यात रिझव्र्ह बँकेची भूमिका किती प्रभावशाली ठरली, हेदेखील या संस्थेच्या इतिहासावरूनच समजून येते.
रिझर्व्ह बँकेच्या बोधचिन्हाचा इतिहास
रिझव्र्ह बँकेसाठी निश्चित करण्यात आलेल्या बोधचिन्हाचा इतिहास पाहणे मनोरंजक ठरेल. सर्वात गमतीची बाब म्हणजे ज्या ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापार व राजकारण या दुहेरी नियंत्रणामुळे भारतीय जनतेला लुटले गेले त्याच ईस्ट इंडिया कंपनीच्या सोन्याच्या दुहेरी मोहोर वरील ताडाच्या झाडासमोर उभा असलेला सिंह हे बोधचिन्ह प्रथम निवडण्यात आले. त्यावेळी या सर्व घडामोडी कलकत्त्यामध्ये सुरू होत्या. ईस्ट इंडिया कंपनीने आपला भारतातील कारभार कलकत्त्यापासूनच सुरू केला असल्याने तत्कालीन बंगालच्या सुभ्याची राजधानी असलेल्या कलकत्त्यामध्ये सर्वत्र ईस्ट इंडिया कंपनीच्या संस्कृतीनुसारच स्मारके उभी राहिली होती. त्यामुळे चलनासाठी वापरण्यात येणाऱ्या सोनेरी मोहरांवर ईस्ट इंडिया कंपनीच्या बोधचिन्हातील सिंह व भारतासारख्या अनेक वसाहतींमध्ये त्यांचा व्यापार पसरला असल्याने त्याचे प्रतीक म्हणून भक्कम मूळ व त्यावर अनेक फांद्या असलेले ताडाचे/ खजुराचे झाड हे प्रतीक बोधचिन्ह म्हणून समितीला योग्य वाटले. परंतु बोधचिन्हामध्ये भारतीयत्व दिसावे म्हणून त्या काळी भारताचा राष्ट्रीय प्राणी असलेल्या वाघाची निवड सिंहाच्या जागी करण्यात आली. म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीच्या चलनावरील ताडाच्या झाडासमोरील सिंह जाऊन रिझव्र्ह बँकेच्या बोधचिन्हात ताडाच्या झाडासमोर उभा असलेला वाघ इतकाच बदल करण्यात आला. या बोधचिन्हाखाली देवनागरी लिपीत ‘भारतीय रिझव्र्ह बँक’ असे लिहिण्यात आले. कालांतराने हे नाव वर्तुळाच्या आतील बाजूस देवनागरी व इंग्रजी भाषेत वर्तुळाकार लिहिण्यात आले.
(बातमीसाठी विद्याधर अनास्कर यांच्या लेखमालेचा आधार घेण्यात आला आहे.लेखक बँकिंग विषयातील तज्ज्ञ आहेत. )