महेंद्रसिंह धोनी कर्णधारपदावरुन पायउतार झाल्यानंतर, विराट कोहलीकडे भारतीय संघाचं नेतृत्व आलं. गेल्या काही वर्षांमध्ये विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. आजच्या घडीला जगभरात विराटचे कोट्यवधी चाहते आहेत. सोशल मीडियावरही विराटचाच बोलबाला आपल्याला पहायला मिळतो. त्याच्या एका फेसबुक पोस्टला, ट्विटला नेटकऱ्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळतो. मात्र एका ट्विटमागे विराट कोहली किती कमावतो तुम्हाला माहिती आहे का??
क्रीडापटूंची सोशल मीडिया अकाऊंट सांभाळणाऱ्या Opendorse या कंपनीने दिलेल्या आकडेवारीनुसार, विराट एका ट्विटमागे अंदाजे अडीच कोटी रुपये कमावतो. ट्विटरवर विराट हा most-valuable athlete च्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. फुटबॉलपटू रोनाल्डो हा यादीत पहिल्या क्रमांकावर येत असून त्याचं एक ट्विट हे अंदाजे ६ कोटींपेक्षा जास्त रुपये कमावतं. बार्सिलोना फुटबॉल क्लबकडून खेळणारा स्पेनचा माजी फुटबॉलपटू आंद्रे इनेस्टा हा या यादीमध्ये दुसऱ्या स्थानावर असून त्याच्या एका ट्विटची किंमत ४ कोटींपेक्षा जास्त आहे.
यानंतर ब्राझिलचा फुटबॉलपटू नेमार हा तिसऱ्या स्थानावर तर बास्केटबॉलपटू लेब्रॉन जेम्स हा चौथ्या स्थानावर आहे. काही दिवसांपूर्वीच विराच कोहलीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ५ कोटी फॉलोअर्सचा पल्ला गाठला आहे. भारतात अशी कामगिरी करणारा विराट हा पहिलाच व्यक्ती ठरला आहे. Duff and Phelps या जागतिक जाहीरत कंपनीने दिलेल्या माहितीनुसार विराट कोहलीच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत असून, २०१९ मध्ये विराटला जाहीरातीमधून मिळणाऱ्या मानधनात ३९ टक्क्यांची वाढ झाली होती.