आपल्या चेहऱ्यावरील त्वचेमध्ये ‘सिबम’ हा एक प्रकारचा स्राव तयार करणाऱ्या तैलग्रंथी असतात. कपाळ आणि नाकावर या ग्रंथींचे प्रमाण सर्वाधिक असते. त्वचेला स्निग्धता देण्यासाठी हा स्राव आवश्यक असतो. त्याची कमतरता झाल्यास त्वचा रूक्ष आणि कोरडी होते.
मुले-मुली वयात येताना, म्हणजे १२ ते १४ वयाच्या सुमाराला अँड्रोजेनसारख्या काही हॉर्मोन्सचे प्रमाण वाढू लागते. या हॉर्मोन्सच्या प्रभावामुळे सिबम तयार करणाऱ्या ग्रंथी जास्त प्रमाणात सिबम तयार करतात. त्यामुळे या वयात त्वचा विशेषत: कपाळ आणि नाकावर तेलकट होऊ लागते. काही वेळा हा स्राव बाहेर पडण्याच्या मार्गात अडथळा येतो. असे झाले तर स्राव आत साठून राहून तिथल्या ग्रंथीला सूज येते. त्यात काही जंतूंची वाढ होते, पू होतो आणि ‘पिंपल’ तयार होतो. चेहऱ्यावर, पाठीवर आणि अगदी खांद्यावरही असे पिंपल्स येऊ शकतात.
यामुळे पिंपल्स वाढू शकतात-
* मुली आणि स्त्रियांमध्ये मासिक पाळीतील अनियमितता. ओव्हरीजमध्ये ‘सिस्ट’ निर्माण होण्याच्या ‘पीसीओडी’ या विकारात अनियमित पाळीबरोबरच पिंपल्स आणि चेहऱ्यावर केसांची लव वाढणे अशीही लक्षणे दिसतात.
* चेहऱ्यावर लावण्यात येणारी निरनिराळी क्रीम्स. मेकअपचा सतत वापर, सतत फेशियल करण्यामुळेही त्वचेची छिद्रे बंद होऊन पिंपल्स वाढतात.
* सध्या गोरेपणाचे फॅड वाढत आहे. त्यासाठी वेगवेगळी फेअरनेस क्रीम आणि स्टिरॉईड्स असलेली क्रीम चेहऱ्यावर लावली जातात. या स्टिरॉईड औषधांचा एक परिणाम म्हणून त्वचा पांढरी पडते. तो गोरेपणा नसतो. या क्रीममुळे पिंपल्स वाढतात.
* डोक्यातील कोंडय़ामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येतात का? तर मुळीच नाही. डोक्यात होणारा कोंडा म्हणजे आपल्या त्वचेच्या वरचा निघून जाणारा थर असतो. हा कोंडा चेहऱ्यावर, पाठीवर पडल्यामुळे पिंपल्स येत नाहीत.
पिंपल्समुळे त्वचेवर काय दुष्परिणाम होतात?
चेहऱ्यावरील पिंपल्सबद्दल बहुतेक मंडळी खूप निष्काळजीपणा करतात. काही दिवसांनी पिंपल्स बरे होतील म्हणून काही जण काहीच उपचार करत नाहीत, तर काही जण जाहिराती पाहून किंवा आपल्याच मनाने पिंपल्स घालवण्यासाठीच्या ना-ना गोष्टी वापरून पाहतात. सतत पिंपल्स येत राहिले तर त्वचेवर कायमचे खड्डे, काळसर डाग पडू शकतात. ते नष्ट करणे अवघड आणि खर्चिकही असते. पिंपल्सवर योग्य वेळी योग्य उपचार घेतले तर हे टाळता येते.
उपाय काय?
* पिंपल्सवर क्रीम औषधांबरोबरच काही पोटात घेण्याची औषधेही आहेत. मात्र ही औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्यावीत.
* स्त्रियांच्यात अनियमित मासिक पाळीमुळे पिंपल्स येण्याचा त्रास असेल तर पाळी नियमित येण्यासाठी वेगळे उपचार घेणे गरजेचे ठरते.
*‘केमिकल पिलिंग’ ही पिंपल्सवरील एक नवीन उपचारपद्धती आहे. यात चेहऱ्यावरील मृत त्वचा निघून जाण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या रासायनिक द्रावणाचा वापर केला जातो. पिंपल्सवरील उपचारांमध्ये इतर औषधांबरोबरच ही पद्धत वापरता येते. पिंपल्सचे खड्डे कमी करण्यासाठीही ती उपयुक्त ठरते.
* पिंपल्सच्या खड्डय़ांवर उपाय म्हणून ‘डर्मारोलर’ आणि ‘लेझर’ या उपचारपद्धतीही वापरतात.