भारतात राहणाऱ्या प्रत्येक हिंदूं धर्मियांसाठी गाय ही एक पवित्र प्राणी आहे. गाईला एका मातेचा दर्जा दिला जातो. पण आपण आज पृथ्वीवर राहणाऱ्या अशा गायीबद्दल जाणून घेणार आहेत जी जमिनीवर नाही तर समुद्राच्या आत राहाते, म्हणून त्या गायीला ‘सागरी गाय’ म्हणून ओळखले जाते. ही गाय समुद्रातील सर्वात सभ्य प्राणी मानली जाते, तसेच की कधीही कोणावर हल्ला करत नाही. पण तरीही या प्राण्याची झपाट्याने शिकार केली जात आहे. तर अनेकदा मानवी प्रदुषणामुळेही या गायींचा झपाट्याने मृत्यू होत आहे.
ही गाय नेमकी कशी आहे?
ही गाय जर समुद्री सीलसारखी दिसत असली तरी ती त्याच्यापेक्षा बरीच वेगळी आहे. ५० ते ६० वर्षे जगणारी ही गाय शाकाहरी असून ती समुद्राच्या पृष्ठभागावर उगवलेले गवत खाऊन जगते. विज्ञानाच्या भाषेत त्याला मॅनाटी असे म्हणतात. ही गाय १२ ते १४ महिने आईच्या गर्भाशयात राहते आणि नंतर पाण्याखाली जन्म घेते. या प्राण्यांच्या गळ्यात एकूण ६ हाडे असून मान संपूर्ण शरीरापेक्षा लहान आहे. जर या प्राण्याला डावीकडे किंवा उजवीकडे पहायचे असेल तर त्यासाठी त्यांचे संपूर्ण शरीर फिरवावे लागते.
एका अहवालानुसार, समुद्रातील गायी सुमारे ५५ दशलक्ष वर्षांपूर्वी जमिनीवर राहत होत्या. यासोबत या प्राण्याविषयी एक कथाही सांगितली जाते ती म्हणजे, या प्राण्याला समुद्री गाय म्हटले जात असले तरी तिचा डीएनए हत्तीशी मिळता-जुळता आहे. जेव्हा ती जमिनीवर राहत होती तेव्हा तिला चार पाय होते. तसेच ती सामान्य गायीप्रमाणेच गवत खात होती, पण पृथ्वीवर जेव्हा नैसर्गिक बदल झाले आणि सर्वत्र पाणीच पाणी झाले, तेव्हा या गायींनी पाण्यात राहण्यासाठी अशाप्रकारे स्वत:चा विकास करावा लागला.
पण पृथ्वीवरील शांत प्राण्यांची सर्वाधिक शिकार केली जाते. सागरी गाईबाबतही तेच होत आहे. त्यांच्या शरीरात भरपूर मांस उपलब्ध आहे, त्यामुळे त्यांची शिकारही भरपूर आहे. केवळ मांस आणि चरबीसाठी त्यांची शिकार होत नाही, तर मानवाने पसरवलेल्या प्रदूषणामुळे त्या मृत्यूमुखी पडत आहेत. वास्तविक या गायी ज्या गवतावर जगतात ते प्रदूषणामुळे निर्माण होत नसल्याने त्यांचा उपासमारीने मृत्यू होत आहे.