पुण्यात गेल्यावर ‘शनिवार वाडा’ पाहणार नाही, असा एकही पर्यटक तुम्हाला शोधून सापडणार नाही. शनिवार वाडा म्हणजेच पेशव्यांच्या यशाचा पुरावा, असे म्हणायला हरकत नाही. पण, पुण्याच्या शनिवार वाड्याचे वैभव असणाऱ्या पेशव्यांचा अंत कसा झाला? पेशव्यांनंतर शनिवार वाड्याची नेमकी काय परिस्थिती होती? याबद्दल तुम्हाला माहीत आहे का? नाही… तर आज आपण त्याबद्दल अधिक जाणून घेऊ या… लोकसत्ता डॉट कॉमने ‘गोष्ट पुण्याची’ या मालिकेच्या शूटदरम्यान शनिवार वाड्याला भेट दिली आणि तेथील काही गोष्टी जाणून घेतल्या…
नारायणराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर रघुनाथरावांनी स्वतः पेशवेपदी विराजमान होऊन पेशवाईची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली; मात्र, पेशवाईतील काही जणांना हे मंजूर नव्हते. त्यामुळे नारायणरावांचे सुपुत्र सवाई माधवरावांकडे पेशवाई सुपूर्द करण्यात आली होती. २७ ऑक्टोबर १७९५ ला माधवराव पेशवे यांचे निधन झाले. नानासाहेब पेशव्यांनी बांधलेल्या ‘हजारी कारंजावर’ उडी घेऊन त्यांनी आत्महत्या केली होती. त्यानंतर पेशवाईच्या अस्ताला सुरुवात होऊन पेशवाईला उतरती कळा लागली.
रघुनाथरावांचे पुत्र म्हणजे दुसरे बाजीराव हे अगदी विलासी वृत्तीचे होते. ते पेशवाईकडे थोडे दुर्लक्षच करायचे. त्यामुळे दुसऱ्या बाजीरावांनी पुढील काही काळात इंग्रज जनरल मॅल्कम यांच्याकडे पेशवाई सोपवली. त्याचबरोबर इंग्रजांनी घातलेल्या अटीदेखील दुसऱ्या बाजीरावांनी मान्य केल्या. मॅल्कम यांनी कानपूरपासून सुमारे पाच कोसांवर असणाऱ्या बिठूर गावात दुसऱ्या बाजीरावांची राहण्याची सोय केली. दुसरे बाजीराव यांनी मॅल्कम यांच्याकडे पेशवाई सोपवून, आपले राज्य, समाधान, रयत, पुण्याचा वाडा, सगळे मागे सोडून ते बिठूरच्या दिशेने निघाले. त्यामुळे पेशवे हे महाराष्ट्रातले राहिले नव्हते. १०० वर्षांची पेशवाई मावळली आणि पेशवाईसारख्या सोनेरी किरणांचा तेथेच अस्त झाला होता.
नंतर पुण्यनगरीचा मानबिंदू असलेल्या पेशव्यांच्या या शनिवार वाड्यावर १७ नोव्हेंबर १८१८ रोजी इंग्रजांनी त्यांचा झेंडा फडकवला आणि त्यानंतर या शनिवार वाड्याने अनेक अपमानित दिवस बघितले. पेशवाईचा अंत झाल्यानंतर पुण्याचा जिल्हाधिकारी रॉबर्ट सन हा काही काळासाठी पेशव्यांच्या या वाड्यात वास्तव्यास होता. त्यादरम्यान म्हणजेच १८२५ मध्ये एक प्रवासी पुण्यात आला होता आणि त्याने पुण्याची स्थिती लिखित स्वरूपात नोंदवून ठेवली होती. त्याच्या नोंदी बघितल्यावर असे लक्षात येते की, त्यावेळी पेशव्यांच्या या वाड्यामध्ये तळमजल्यावर एक तुरुंग बांधण्यात आला होता आणि पहिल्या मजल्यावर मागच्या बाजूला एक वेड्यांचे रुग्णालयदेखील सुरू करण्यात आले होते. अखेर ज्या वाड्याने पेशव्यांचा राजेशाही थाट, पेशवाईचे वैभव बघितले त्याच वाड्यावर हे कटू दिवस पाहण्याची वेळ आली. ही खरे तर खूप मोठी शोकांतिका आहे.
काळ मागे सरत होता आणि एक दिवस २१ फेब्रुवारी १८२८ रोजी शनिवार वाड्याला आग लागली. या आगीची तीव्रता इतकी होती की, १५ दिवस हा वाडा या आगीत धगधगत होता. वाडा लाकडी असल्याकारणाने सगळेच या आगीत भस्म झाले. पण, या वाड्याला आग कशी लागली हे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. या दुर्घटनेनंतर इंग्रजांनी पुणे विभागातील राखीव पोलिसांचे कार्यालय या वाड्यामध्ये बांधले, असा उल्लेख तत्कालीन कागदपत्रांमधून समोर येतोय. ज्या वेळी या वाड्याला आग लागली त्यावेळी सुमारे ४५० लोक, अगणित कागदपत्रे; जी पेशवेकालीन होती ती या वाड्यात होती. तर ही बाब लक्षात घेऊन इंग्रजांनी वेळ वाया न घालवता, ही कागदपत्रे सुरक्षित ठिकाणी पोहोचवली. १८४० ते १८८५ या कालावधीनंतर शनिवार वाड्याच्या समोरच्या पटांगणात एक मंडई भरायची; मात्र त्यानंतर ती रे मार्केटमध्ये स्थलांतरीत करण्यात आली. पूर्वीचे रे मार्केट म्हणजे आताची महात्मा फुले मंडई होय. तर असा झाला होता पेशवाईचा अंत आणि पेशव्यानंतर अशी झाली होती शनिवार वाड्याची स्थिती; जी आज आपण या लेखातून जाणून घेतली.