शिकरण हा शब्द आत्तापर्यंत आपल्या कानांवरुन अनेकदा गेला असेल. शिकरण आत्तापर्यंत आपण सगळ्यांनी अनेकदा खाल्लंही असेल. मात्र या शिकरणाचा आणि महाभारताचा खूप गहिरा संबंध आहे हे तुम्हाला माहीत आहे का? आज आपण जाणून घेणार आहोत केळीचं शिकरण आणि महाभारत यांचा नेमका काय संबंध आहे? महाभारतातला सर्वात शक्तिशाली गदायोद्धा म्हणजे भीम. भीमाची आवडती गोष्ट काय होती तर विविध पदार्थ खाणं. कुंती पाच पांडवांना जेव्हा जेवण करायची तेव्हा ती भीमासाठी आणखी एक वाटा काढून ठेवायची असंही सांगितलं जातं. याच भीमाने शिकरण हा पदार्थ शोधला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिकरीन या संस्कृत शब्दापासून शिकरण शब्द झाला तयार

शिकरीन या संस्कृत भाषेतील शब्दापासून शिकरण हा शब्द तयार झाला आहे. शिकरीन म्हणजे दही आणि साखर यांच्या मिश्रणात फळं मिसळून केला जाणारा पदार्थ. शिकरीन तयार करण्यासाठी दही वापरलं जात होतं. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून शिकरण तयार करण्यासाठी दूध वापरलं जातं. पाच पांडवांपैकी भीमाने शिकरण हा पदार्थ शोधला आहे.

भीमाने शोधलंय शिकरण

भीम हा उत्तम गदायोद्धा आणि बलशाली होताच. पण तो स्वयंपाकातही निपुण होता. १२ वर्षांचा वनवास आणि एक वर्षाचा अज्ञातवास असा काळ पांडव हस्तिनापुरातून बाहेर होते. ज्यावेळी पांडवांचा अज्ञातवास सुरु झाला तेव्हा ते विराट राजाकडे राहिले होते. अर्जुन बृहंनडा म्हणून, द्रौपदी सैरंध्री म्हणून, नकुल आणि सहदेव अश्वशाळेत काम करणारे कामगार म्हणून तर भीम बल्लवाचार्य म्हणजेच मुख्य स्वयंपाकी म्हणून काम करत होता. भीमाला उत्तम स्वयंपाक येत असे. भीमानेच शिकरण हा पदार्थ शोधला आहे. तसंच श्रीखंड हा पदार्थही भीमानेच शोधला आहे. राजा विराटाच्या स्वयंपाकगृहाचा आणि पाकशाळेचा प्रमुख म्हणून भीम राहिला. त्यावेळी त्याने बल्लवाचार्य हे नाव धारण केलं. त्यामुळेच आजही कुशल आचाऱ्याला बल्लवाचार्य ही उपमा दिली जाते.

सदानंद कदम यांनी लिहिलेल्या कहाणी शब्दांची या पुस्तकात भीम आणि शिकरण यांचं हे अनोखं नातं सांगण्यात आलं आहे. भीमाला विविध पदार्थ जसे खायला आवडत तसेच तो विविध पदार्थ तयार करण्यातही तरबेज होता. भीमाने तयार केलेला हा पदार्थ महाभारत काळापासून आपल्याकडे आहे. शिकरण म्हणजे केळीचे काप, दूध, साखर आणि वेलची पावडर यांचं मिश्रण. मात्र हा पदार्थ आजही अनेक घरांमध्ये तयार केला जातो.

भीम हा जेव्हा अज्ञातवासात असताना बल्लवाचार्य म्हणून राजा विराटाच्या सेवेत होता तेव्हा विविध फळांचे तुकडे एकत्र करुन त्यात दही घालत असे. त्याला शिखरणी असेही म्हटले गेले. त्याचा अपभ्रंश होऊन शिकरण तयार झालं. भीमाची शिखरणी म्हणजे एक प्रकारे आत्ता मिळणारं फ्रूट सॅलेडच होतं. अज्ञातवासात असताना तो हा पदार्थ तयार करत असे. आपल्या देशात हा पदार्थ महाभारत काळापासून प्रचलित आहे यात शंकाच नाही. डॉ. वर्षा जोशी यांनी महाभारत काळातली खाद्यसंस्कृती हा लेख लिहिला होता त्यामध्ये हा उल्लेख आढळतो.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shikran is as old as mahabharata what is the connection between bheem and mahabharata scj