Chhatrapati Shivaji Maharaj Garad : महाराष्ट्रासह देशभरात सध्या विकी कौशलचा ‘छावा’ चित्रपट तुफान हिट होताना दिसतोय. केवळ भारतातच नाही तर परदेशातील प्रेक्षकांनीही या चित्रपटाला अक्षरश: डोक्यावर घेतलंय. छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा ‘छावा’ चित्रपटात दाखवण्यात आली आहे. दरम्यान, ‘छावा’ चित्रपटाचे चित्रपटगृहातील काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतायत, ज्यात हा चित्रपट पाहून झाल्यानंतर अनेक जण भावूक होताना दिसतायत; तर काही जण चित्रपटगृहातच ‘गारद’ म्हणजे ‘शिवगर्जना’ देताना पाहायला मिळतात. पण, ‘गारद’ म्हणजे नेमकं काय? ती कुठे आणि केव्हा दिली जाते? याविषयी सविस्तर जाणून घेऊ…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, शालिवाहन शके १५९६, इंग्रजी दिनांक ६ जून १६७४ रोजी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. यावेळी महाराजांची स्वारी हत्तीवरून दरबाराकडे आली. नगारखान्याजवळ पोहोचताच द्वारपालांनी एकमेकांना इशारा दिला. यानंतर गारदी किंवा चोपदार पुढे आले आणि त्यांनी महाराजांची गारद दिली. एकंदरीत तुम्हाला कळलंच असेल की, महाराज दरबारात प्रवेश करत असताना जी घोषणा किंवा ललकारी दिली जात होती, तिला मराठीत “गारद” असे म्हटले जाते. संस्कृतमध्ये याला “बिरुद” किंवा “बिरुदावली” म्हणतात, तर उर्दू भाषेत याला “अल्काब” असे म्हणतात. प्राचीन काळापासून राजा जेव्हा आपल्या सिंहासनावर आसनस्थ व्हायला येतात, तेव्हा ही गारद दिली जाते.

सहसा ही गारद शिवजयंती किंवा शिवरायांशी संबंधित एखाद्या कार्यक्रमात, व्याख्यानातही दिली जाते. त्यावेळी शिवरायांची मूर्ती किंवा प्रतिमा समोर असते. त्या प्रतिमेला नमन करून ही ‘गारद’ देण्यात येते. आता आपण या गारदेमध्ये शिवरायांचा गौरव करणाऱ्या कोणकोणत्या गोष्टी आहेत, त्या जाणून घेऊया…

गारदेमधील प्रत्येक शब्दाचा अर्थ काय? (Meaning Behind Every Word Of Chhatrapati Shivaji Maharaj Garad)

गडपती : गडकोटांचे अधिपती, राज्यातील गडकोटांवर ज्यांचे आधिपत्य (राज्य) आहे असा राजा.

गजअश्वपती : ज्यांच्याकडे स्वतःच्या मालकीचे हत्ती व घोडदळ आहे असे महाराज.

भूपती प्रजापती : राज्यातील भूमीचे व प्रजेचा पती, अर्थात रक्षणकर्ते.

सुवर्णरत्नश्रीपती : राज्याच्या खजिन्यातील वेगवेगळे हिरे, माणिक, मोती आणि सोने यावर ज्यांचे आधिपत्य आहे असे महाराज.

अष्टावधानजागृत : आठही प्रहर जागृत राहून राज्याच्या आठही दिशांवर लक्ष असणारे महाराज.

अष्टप्रधानवेष्टीत : ज्यांच्या पदरी प्रत्येक शास्त्रात निपुण असलेले आठ प्रधान आहेत आणि राज्यकारभारात जे त्यांचा सल्ला घेतात असे महाराज. शिवरायांनी राज्य चालवण्यासाठी अष्टप्रधान मंडळ स्थापन केले होते.

न्यायालंकारमंडीत : कर्तव्य आणि न्यायकठोर राहून सत्याच्या बाजूने व न्यायाच्या बाजूने निकाल देणारे महाराज.

शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत : सर्व प्रकारच्या शस्त्रविद्या व शास्त्रात पारंगत असलेले महाराज.

राजनितीधुरंधर : राजकारणाच्या डावपेचांमध्ये तरबेज असलेले महाराज.

प्रौढप्रतापपुरंदर : मोठे शौर्य गाजवून ज्यांनी आपल्या पराक्रमाचा ठसा उमटवला असे महाराज.

क्षत्रियकुलावतंस : क्षत्रिय कुळात जन्म घेऊन त्या कुळातील सर्वात मोठा पराक्रम गाजवलेले महाराज.

सिंहासनाधिश्वर : ३२ मण सुवर्णसिंहासनावर शोभून दिसणारे सिंहासनाचे अधिश्वर असे महाराज.

महाराजाधिराज : विद्यमान सर्व राजांमध्ये जो सर्वात मोठा आहे आणि साऱ्या राजांनी ज्यांच्या अधिपत्याखाली राहण्याचे स्वीकारले असे महाराज.

राजा शिवछत्रपती : प्रजेने छत्र धरून ज्यांना आपला अधिपती म्हणून स्वीकारले आहे, असे छत्रपती शिवाजी महाराज.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान कीर्तीचे वर्णन करणारा एक जयघोष म्हणजे महाराजांची ‘गारद’. जी आजही प्रत्येक शिवप्रेमीच्या मनात कोरली आहे. महाराजांची ‘गारद’ ऐकताच प्रत्येकाची छाती अभिमानाने भरुन येते.