कुठे साप लपून बसला असे कानावर पडले तरी अंगाचं पाणी होतं. सरपडणारा हा प्राणी कुठेही जाऊन राहू शकतो, त्यामुळे मनुष्याला त्याच्यापासून अधिक धोका असतो. काही प्राणी प्रेमींना साप आवडत असले तरी अनेकांना हा एक भयानक प्राणी वाटतो. आज जगभरात सापाच्या अनेक प्रजाती आढळतात. यात काही सापाच्या प्रजाती अतिशय विषारी असतात. विषारी सापाच्या एका दंशामुळे माणसाचा मृत्यू होऊ शकतो. यामुळे लोक सापापासून अंतर ठेवून राहतात. पृथ्वीवरील धोकादायक प्राण्यांमध्ये सापाची तुलना होते, पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की, जगात असं एक गाव आहे जिथे सापाच्या विक्रीतून गावकरी लाखोंची उलाढाल करत आहेत. येथील गावकऱ्यांसाठी सापाची शेती हा उत्पन्नाचा मोठा स्त्रोत आहे.
सापांची शेती हे ऐकायला थोडं विचित्र वाटेल, पण खरचं चीनच्या झेजियांग प्रांतातील एका गावात घराघरात सापांची शेती केली जाते. या सापांमुळे येथील लोकांची घरं चालतात. या देशात आहारात साप खाल्ले जातात. त्यामुळे तिथे होणारी सापांची शेती ही सामान्य बाब आहे. परंतु ही जगण्याची पद्धत अतिशय अनोखी आणि धोकादायक आहे.
चीनच्या झेजियांग प्रांतातील जिसिकियाओ या गावात गावकरी विषारी साप पाळतात. यातून सापांची शेती केली जाते. एका वृत्तानुसार, दरवर्षी याठिकाणी ३० लाखांहून अधिक सापांचे उत्पादन घेतले जाते. गावातील लोकांसाठी साप आता उत्पन्नाचे मुख्य साधन बनले आहे.
चीनमध्ये साप पालनाची ही परंपरा सर्वात जुनी असल्याचे सांगितले जाते. १९८० मध्ये पहिल्यांचा या गावात सापांची शेती करण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून गावातील लोक साप पाळत आहेत. यात कोब्रा, अजगर, वाइपर, रॅटल यांसारख्या विषारी आणि बिनविषारी सापांचा समावेश आहे.
चीनमध्ये काही औषधांमध्ये विषारी सांपाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.
चीनच्या जिसिकियाओ गावात सुमारे १००० लोक राहतात. त्यांच्याकडे १०० अधिक साप पालनाचे फार्म आहेत. या गावात येणारे व्यापारी मोठी बोली लावून सापांची खरेदी करतात. नंतर या सापांची केवळ चीनमध्येच नाहीतर अमेरिका, जर्मनी, रशिया आणि दक्षिण कोरियामध्येही खरेदी-विक्री आणि वाहतूक केली जाते.