Snakes Honeymoon Destination : तुम्ही हनिमून डेस्टिनेशन हा शब्द ऐकलाच असेल. यात नवीन लग्न झालेलं जोडपं देशात किंवा परदेशातील वेगवेगळ्या ठिकाणी फिरण्यासाठी आणि एकमेकांसह क्वालिटी टाईम स्पेंड करण्यासाठी जातात. पण, तुम्हाला कोणी सांगितलं की, सापदेखील हनिमूनला जातात, तर तुम्हाला विश्वास बसेल का? अर्थात, तुम्हाला हे वाचून हसायला येईल, पण खरंच असा एक देश आहे, जिथे दरवर्षी हजारो साप प्रजननासाठी एकत्र जमतात.

त्यामुळे ही जागा सापांसाठी हनिमून डेस्टिनेशन म्हणून प्रसिद्ध झाली आहे. दरवर्षी येथे ७५,००० हून अधिक साप एकत्र जमा होतात. इतक्या सापांना एकत्र पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल. पण, हे भयभीत करणारे अद्भुत दृश्य पाहण्यासाठी, आपल्या कॅमेऱ्यात साठवण्यासाठी लोक दूरवरून तिथे पोहोचतात. हे साप जोडीदाराच्या शोधात या ठिकाणी जमा होतात.

‘या’ देशात आहे सापांचे हनिमून डेस्टिनेशन

कॅनडातील नार्सिसे या ठिकाणी सापांचे हे हनिमून डेस्टिनेशन आहे. हे जगातील सर्वात अद्वितीय नैसर्गिक दृश्यांपैकी एक आहे. दरवर्षी ईस्टर्न गार्टन प्रजातीचे हजारो साप या ठिकाणी जमा होतात. हिवाळ्यानंतर ते त्यांच्या बिळातून बाहेर पडतात. कधी कधी त्यांची संख्या १.५ लाखांपेक्षाही जास्त असते.

मादी सापांच्या शोधात अनेक साप होतात जमा

हिवाळा संपताच उन्हाळ्यात हे साप जोडीदाराच्या शोधात त्यांच्या बिळातून बाहेर पडतात. हे साप वास देत मादी सापांचा शोध घेतात. सापांच्या प्रजननाचा हा काळ पाहण्यासाठी अनेक वन्यजीवप्रेमी आणि शास्त्रज्ञ मोठ्या संख्येने येथे पोहचतात. या प्रजनन काळात नर साप मादी सापांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात.

हिवाळ्याच्या काळात हे साप चुनखडीच्या भेगांमध्ये लपून स्वतःचे रक्षण करतात. पण, वसंत ऋतू सुरू होताच नर साप प्रथम बाहेर येतात आणि त्यांच्या जोडीदाराचा शोध घेऊ लागतात. हे सर्व साप एका गटात मादी सापाभोवती फिरतात आणि तिला प्रभावित करण्याचा प्रयत्न करतात. मादी साप ज्या सापापासून प्रभावित होते, त्याला ती तिचा जोडीदार म्हणून निवडते. या प्रक्रियेला मेटिंग बॉल असे म्हणतात. तसे पाहिले गेल्यास हा खूप गर्दी असलेला परिसर आहे, त्यामुळे येथे सापांचे असे दृश्य पाहायला मिळणे दुर्मीळ आहे.

सापांच्या संरक्षणासाठी उचलली पावलं

सापांचे हे आश्चर्यकारक दृश्य जिथे पाहता येते त्या ठिकाणाहून महामार्ग जवळ आहे, त्यामुळे अनेक साप सरपटत जात-येत असताना वाहनांमुळे जखमी होतात किंवा मरण पावतात, त्यामुळे त्यांची संख्या लक्षणीयरीत्या कमी होत होती. यावर उपाय म्हणून, महामार्गाखाली विशेष बोगदे बांधण्यात आले आहेत आणि बर्फापासून वाचण्यासाठी कुंपण बसवण्यात आले. या प्रयत्नांमुळे सापांचे मृत्यू होण्याचे प्रमाण कमी झाले असून त्यांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे.

या ठिकाणी दिसणारे हे दृश्य केवळ दुर्मीळच नाही तर तो एक नैसर्गिक परिसंस्थेचा महत्त्वाचा भाग आहे, यामुळे शास्त्रज्ञांना सापांच्या वर्तनाबद्दल आणि त्यांच्या जीवनशैलीबद्दल अधिक माहिती मिळते. तसेच हे ठिकाण आता पर्यटकांसाठीही एक आकर्षणाचे केंद्र बनले आहे.