Sobhita Dhulipala Pelli Kuthuru Ceremony : सोभिता धुलीपाला आणि नागा चैतन्य यांचा लग्नसोहळा ४ डिसेंबरला थाटामाटात पार पडणार आहे. हैदराबाद येथील अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये या दोघांच्या विवाहसोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. सध्या या दोघांच्याही घरात लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झालेली आहे. सोभिताने नुकतेच ‘पेल्ली कुथुरु’ ( Pelli Kuthuru ) समारंभाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. तेलुगू संस्कृतीत कन्येचा विवाह पार पडण्यापूर्वी काही दिवस आधी हा समारंभ घरगुती पद्धतीने साजरा केला जातो.
‘पेल्ली कुथुरु’ समारंभासाठी सोभिताने लाल रंगाची सोनेरी जर असलेली साडी, भरजरी दागिने असा पारंपरिक तेलुगू लूक केला होता. तर, अभिनेत्रीने कपाळावर तेलुगू स्टाइलनुसार बट्टू (बिंदी/ टिकली) लावली होती. यामध्ये तिचं औक्षण केल्याचं आणि घरातल्या वडिलधाऱ्या मंडळींनी सोभिताच्या पायाला हळद लावल्याचं पाहायला मिळत आहे. हा समारंभ लाडकी लेक आता सासरी जाण्यासाठी सज्ज असल्याचं प्रतीक दर्शवतो.
हेही वाचा : ईमेलमध्ये वापरत असलेल्या CC आणि BCC चा फूल फॉर्म माहितीये का? जाणून घ्या महत्त्व
पेल्ली कुथुरु ( Pelli Kuthuru ) समारंभ म्हणजे काय?
तेलुगू संस्कृतीत विवाहसोहळा पार पडण्याआधी हा विधी केला जातो. नवरी मुलगी आता वैवाहिक जीवनात, नव्या कुटुंबात प्रवेश करणार असल्याने हा समारंभ साजरा केला जातो. शुद्धता, आशीर्वाद अशी धारणा ठेवून ‘पेल्ली कुथुरु’ समारंभ साजरा केला जात असल्याने यात मुख्यत्वे हळदीचा समावेश केला जातो.
‘इंडियन एक्स्प्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, हैदराबाद येथील तेलुगू कुटुंबात जन्मलेल्या उषा श्री यांनी ‘पेल्ली कुथुरू’ समारंभ हा लग्न लागण्याआधीचा शेवटचा सोहळा असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्या सांगतात, वर किंवा वधुच्या घरी ‘पेल्ली कुथुरु’ समारंभ पार पडला असेल, तर त्यांनी लग्नगाठ बांधण्यापूर्वी घराबाहेर जायचं नसतं, अशी धारणा आहे”
‘पेल्ली कुथुरु’ समारंभात वधुचे नातेवाईक तिला नवीन कपडे, मिठाई, सोन्याचे दागिने या भेटवस्तू देतात. यावेळी नववधूला हळद देखील लावली जाते. पण, याला तेलुगू संस्कृतीत हळद म्हणत नाहीत. याला ‘मंगलस्नानम्’ म्हणतात असं वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.
हेही वाचा : River of Death: ‘या’ नदीला ‘मृत्यूची नदी’ का म्हणतात?
सोभिताने आजच्या काळातील प्री-वेडिंगच्या ट्रेंडमध्ये देखील परंपरेनुसार लग्न करण्यास प्राधान्य दिलं आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीला, सोभिताच्या घरी लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली होती. त्यांच्याकडे गोदुमा रायी पळसुपू डंचदम (हळद कुटणे) समारंभ आयोजित केला होता. यानंतर हळुहळू सगळे विधी पार पडून सोभिताच्या घरात लग्नाआधीचा शेवटचा ‘पेल्ली कुथुरु’ समारंभ पार पडला आहे.