रविवारी दि. २१ जून रोजी होणारे सूर्यग्रहण भारतातून दिसणार आहे. देशातील काही भागांतून कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे, तर काही भागांतून खंडग्रास दिसणार आहे. संपूर्ण आयुष्यात क्वचितच कंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्याची संधी मिळते. पण खंडग्रास आणि कंकणाकृती ग्रहण म्हणजे काय?
सूर्यग्रहण म्हणजे काय?
सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये जेव्हा चंद्र येतो तेव्हा पृथ्वीवर चंद्राची सावली पडते. या सावलीतून दिसणाऱ्या स्थितीला सूर्यग्रहण असे म्हणतात.
खग्रास सूर्यग्रहण –
जेव्हा सूर्य पूर्णपणे चंद्राच्या मागे लपला जातो, तेव्हा दिसणाऱ्या स्थितीला खग्रास सूर्यग्रहण म्हणतात.
खंडग्रास सूर्यग्रहण –
जेव्हा सूर्याचा काही भागच चंद्राच्या मागे जातो, तेव्हा दिसणाऱ्या स्थितीला खंडग्रास सूर्यग्रहण म्हणतात.
कंकणाकृती सूर्यग्रहण –
या सूर्यग्रहणाविषयी अधिक माहिती देताना खगोल अभ्यासक पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले की ,खग्रास सूर्यग्रहणाच्यावेळी जर चंद्र पृथ्वीपासून दूर असेल तर चंद्रबिंब लहान दिसत असल्याने सूर्यबिंबाला पूर्णपणे झाकून टाकू शकत नाही. सूर्याची प्रकाशित गोलाकार कडा दिसत असते. त्यालाच ‘ कंकणाकृती ‘ अवस्था म्हणतात. तशी कंकणाकृती अवस्था राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि उत्तराखंड राज्यातील काही प्रदेशातून दिसणार आहे. विशेष म्हणजे जिथे महाभारत युद्ध झाले त्या हरियाणामधील कुरुक्षेत्रावरून या सूर्यग्रहणाची कंकणाकृती दिसणार आहे.
तुमच्या डोळ्यांचे संरक्षण करा –
सूर्यग्रहण असो वा नसो, सूर्याकडे थेट उघडय़ा डोळ्यांनी पाहणे हानिकारक आहे. सूर्यग्रहण पाहू इच्छिणाऱ्या प्रत्येकाला सुरक्षित सोलर फिल्टर्स असलेले चष्मे घालण्याचा किंवा प्रोजेक्शन पद्धत वापरून सूर्यग्रहण पाहण्याचा आग्रह धरा. सुरक्षित सौर चष्मे किंवा तज्ज्ञांनी सुचवलेल्या सुरक्षित पद्धतीनेच कुणीही, कोणत्याही ठिकाणावरून सूर्यग्रहणाचा आनंद लुटू शकतो, यात शंका नाही.