भारतीय संस्कृतीत प्रसादाला विशेष महत्त्व आहे. देवाचा प्रसाद ग्रहण करणे म्हणजे देवाचा आशीर्वाद घेणे, असे अनेक जण मानतात. देवाचा प्रसाद हा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा असतो. आजवर तु्म्ही प्रसादाचे अनेक प्रकार पाहिले असतील, पण तुम्ही कधी असं वाचलं का किंवा ऐकलं का, की गांजा म्हणून प्रसाद दिला जातो. तुम्हाला वाटेल हे कसं शक्य आहे, पण हे खरंय. ‘द टाइम्स ऑफ इंडिया’च्या एका वृत्तामध्ये याविषयी सांगितले आहे.
तुम्हाला माहिती असेलच, आपल्या देशात एनडीपीएस कायद्यानुसार गांजावर प्रतिबंध आहे. एनडीपीएस कायद्याच्या कलम २० प्रमाणे गांजाचं उत्पादन, विक्री, खरेदी, निर्यात, आंतरराज्य व्यापार या सर्व कृती कायद्याने गुन्हा आहे; पण उत्तर कर्नाटकातील काही मंदिरांमध्ये गांजा प्रसाद म्हणून दिला जातो. आज आपण याविषयीच सविस्तर जाणून घेऊ या.
शरणा, अरुदा, शपथा आणि अवधुता या संप्रदायामध्ये भाविक गांजाचे सेवन करतात. त्यांच्या मते असे करणे ज्ञानप्राप्ती असते.
उत्तर कर्नाटकातील यादगीर जिल्ह्यात टिनथिनी येथे असलेल्या मौनेश्वर मंदिरात दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक जानेवारी महिन्यात वार्षिक संमेलनला येतात. जे भाविक-भक्त येतात ते प्रसाद म्हणून गांजा घेतात आणि प्रार्थनेनंतर त्याचे सेवन करतात.
हेही वाचा : एमी अवॉर्ड नेमका काय? कुणाला दिला जातो अन् याचे प्रकार कोणते? जाणून घ्या सविस्तर
या मंदिर समितीचे सदस्य गंगाधर नायक हे टाइम्स ऑफ इंडियाच्या एका वृत्तात सांगतात, “या मंदिरात गांजाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. गांजा ध्यान करायला सोपा जातो. या ठिकाणी गांजाला एक वेगळा शब्द आहे. गांजाला ते मारिजुआना म्हणून संबोधतात. मारिजुआना पवित्र असून अध्यात्माचे ज्ञान वाढवण्यास मार्ग दाखवतो, असे येथील संत आणि भक्तदेखील मानतात.”
पण नायक पुढे सांगतात, “येथील गांजा बाहेर कुठेही कोणत्याही कारणांसाठी विकला जात नाही. जेव्हा येथे जत्रा भरते, तेव्हा येथे कोणीही येऊन गांजाचे सेवन करू शकतात.”
शरणा संप्रदायातील महंतेश के यांनी रायचूर आणि यादगीरमधील अनेक मंदिरांना आणि मठांना भेट दिली. ते टाइम्स ऑफ इंडियाला सांगतात, “रायचूर जिल्ह्यातील सिंधानूर तालुक्यात असलेल्या अंबा मठामध्ये ही परंपरा दिसून आली.” महंतेश के पुढे सांगतात, “गांजा आनंदी राहण्यास मदत करतो. गांजा हा व्यसन जडवणारा नाही. अनेक लोक दिवसातून किंवा आठवड्यातून एकदा गांजाचे सेवन करतात आणि ध्यान करतात. काही लोक यामध्ये औषधी गुणधर्म असल्याचे मानत याला आरोग्यदायी समजतात.
हेही वाचा : वर्षातून फक्त एकाच आठवड्यासाठी उघडते हे मंदिर! वर्षभर पेटत असतो दिवा; माहीत आहे का या रहस्यमय मंदिराविषयी….
यादगीर जिल्ह्यातील शोरापूर तालुक्यात असलेल्या शिवयोगी आश्रमात सिद्धरामेश्वर शिवयोगी दिवसातून एकदा गांजाचे सेवन करतात. ते गांजाला पवित्र मानतात. ते ध्यान करताना परिसर शांत ठेवण्यासाठी गांजाचे सेवन करतात. गांजा ध्यान करण्यास मदत करतो, असे त्यांना वाटते.
मंदिरामध्ये गांजाचे सेवन करणारे हे लोक व्यसनी नसतात, असा शरणा संप्रदायावर संशोधन करणाऱ्या प्राध्यापिका मीनाक्षी बाले यांचा विश्वास आहे.
ज्या देशात एनडीपीएस कायद्यानुसार गांजावर प्रतिबंध आहे, त्या देशातील काही मंदिरांमध्ये गांजा प्रसाद म्हणून दिला जात असेल तर कुणालाही यावर विश्वास बसणार नाही. या प्रकरणामध्ये पोलिसांची भूमिका काय असा प्रश्न तुम्हाला पडला असावा.
या परंपरेचा मान राखून पोलिस अशा मंदिरापासून स्वत:ला दूर ठेवतात. रायचूरचे पोलिस अधीक्षक यांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले होते, “आम्ही आता जिथे दिसेल तिथे कारवाई सुरू केली आहे. मला मंदिराविषयी किंवा मठांविषयी माहिती नाही, पण आम्हाला माहिती मिळाली तर आम्ही छापेमारी करू.”