स्पिरीच्युअल गुरु किंवा मोटीवेशनल स्पीकर्स हे सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत असतात. या दुहेरी भूमिका बजावणारे इस्कॉनचे गुरु गौर गोपाल दास हे आपल्या सगळ्यांच्याच चांगले परिचयाचे आहेत. ते स्वतः एक संन्यासी आहेत. आध्यात्मिक आणि आधुनिक जीवनातील दरी कमी करण्याबद्दल किंवा दैनंदिन जीवनातही अध्यात्माचा किती मोठा वाटा असतो याबद्दल ते भरभरून बोलतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्वतः इंजिनियर असून कालांतराने अध्यात्माच्या वाटेवर चालणाऱ्या गौर गोपाल दास यांनी नुकतंच मॅशब्ले या युट्यूब चॅनेलवरच्या ‘द बॉम्बे जर्नी’ कार्यक्रमात हजेरी लावली. या मुलाखतीमध्ये त्यांनी वेगवेगळ्या गोष्टींविषयी गप्पा मारल्या. त्यांचं बालपण, ते अध्यामाकडे कसे वळले, या क्षेत्रात आल्यानंतर त्यांना आलेले अनुभव या सगळ्याबद्दल त्यांनी दिलखुलास गप्पा मारल्या.

आणखी वाचा : नोकराकडून एक चूक झाली अन् चहाचा ‘कडक’ शोध लागला; जाणून घ्या रंजक कथा

याच मुलाखतीदरम्यान त्यांनी महाराष्ट्रातील एका खास आणि लोकप्रिय पेयाची आठवणदेखील सांगितली. ते खास पेय म्हणजे पीयूष. या पीयूषविषयीच एक खास आठवण गौर गोपाल दास यांनी या मुलाखतीमध्ये शेअर केली. गौर गोपाल दास २७ वर्षांपूर्वी अध्यात्माच्या वाटेवरचा प्रवास सुरू करण्याचं स्वप्न घेऊन मुंबईत आले. त्या आठवणीबद्दल बोलताना गौर गोपाल दास म्हणाले, “मी तेव्हा दादरमध्ये सर्वप्रथम आलो अन् तिथे पणशीकर यांचं एक अत्यंत लोकप्रिय हॉटेल आहे तिथलं पीयूष उत्तम आहे असं मी ऐकून होतो. मी त्या दिवशी आश्रमात जाऊन दीक्षा घेऊन स्वतःला सेवेसाठी समर्पित करणार होतो. त्यावेळी माझ्या डोक्यात एक विचार आला की मी जर आता या मार्गावर आलो तर पुन्हा मला माझ्या मनासारखं वागता येणार नाही, वाटेल तेव्हा जे हवंय ते खायची संधी पुन्हा मिळणार नाही. त्यामुळे मी तेव्हा पणशीकर यांच्या त्या दुकानात गेलो, तिथे एक ग्लास पीयूष प्यायलो आणि मग मी पुढे आश्रमात गेलो.”

पीयूष म्हणजे नेमकं काय?

पीयूष हे पेय महाराष्ट्रात सर्वात प्रसिद्ध आहे. श्रीखंड अन् दही याचं घट्ट मिश्रण करून हे पेय बनवलं जातं. हे पेय घट्ट असतं शिवाय यात साखर, केशर आणि जायफळसुद्धा असतं. पिवळ्या रंगाचं हे पेय महाराष्ट्रात अन् मुंबई पुण्यासारख्या शहरात चांगलंच लोकप्रिय आहे.

‘पीयूष’ या पेयाचा शोध नेमका कुणी लावला?

कमलाबाई ओगले यांच्या ‘रुचिरा’ या पुस्तकात पीयुष तयार करण्याची पारंपारिक कृती आपल्याला वाचायला मिळते, त्यामुळे हे पेय तसे फार जुने असल्याचे स्पष्ट होते. ‘रुचिरा’ या पुस्तकात हे पे कसे बनवायचे याची पाककृती लिहून ठेवण्यात आली आहे. याबरोबरच ‘मिड-डे’च्या एका स्पेशल व्हिडीओत दिलेल्या माहितीनुसार पीयूष हे पेय सर्वप्रथम ‘तांबे आरोग्य भुवन’ या मुंबईच्या लोकप्रिय ठिकाणी तयार करण्यात आले. १९८३ मध्ये हे हॉटेल सुरू झाले. सध्या हे हॉटेल ७४ वर्षांच्या हेमा मालिनी तांबे या चालवतात. त्यांचे सासरे हे हॉटेल पहायचे आणि आता त्यांचं कुटुंब ते हॉटेल चालवतं.

आणखी वाचा : टोमॅटो सॉस आणि टोमॅटो केचअपमधील ‘हे’ फरक तुम्हाला माहीत आहे का ? जाणून घ्या…

या ७४ वर्षाच्या आजींनी दिलेल्या माहितीनुसार १९४३ पासून त्यांच्या सासऱ्यांचे काका हे पीयूष विकत आहेत. शिवाय मुंबईमध्ये पणशीकर यांच्या हॉटेलमधले पीयूषही प्रचंड लोकप्रिय आहे. अद्याप ‘पीयूष’चा शोध कसा लागला व कुणी लावला हे स्पष्ट झालेलं नसलं तरी सर्वसामान्यांप्रमाणे लाईफ कोच, गुरु म्हणून प्रसिद्ध गोपाल दास यांनाही पीयुषच्या गोडीने भुरळ घातली होती हे विशेष.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Spiritual guru gaur gopal das likes the maharashtrian beverage piyush do you know the history of piyush avn