Sunita Williams 9-Month Space Mission : नऊ महिन्यांहून अधिक काळ अंतराळात राहिल्यानंतर नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (NASA)च्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर अखेर मंगळवारी पृथ्वीवर परतले. नासाच्या क्रू-९ अंतराळवीर मिशनचा भाग असलेले चौघे जण मंगळवारी ५:५७ वाजता फ्लोरिडाच्या किनारपट्टीवर उतरले. आठ दिवसांच्या मोहिमेवर गेलेले हे दोघेही नऊ महिन्यांपासून इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर अडकून पडले होते. आता अखेर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर मंगळवारी फ्लोरिडा पॅनहँडलजवळ मेक्सिकोच्या आखातात उतरून पृथ्वीवर परतले. यावेळी त्यांना पहिल्यांदा गुरुत्वाकर्षण जाणवले. दरम्यान सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात सुमारे नऊ महिने राहिले, त्या काळात त्यांनी तिथे काय केले?, याबाबत नासाने माहिती दिली आहे.
विल्यम्स आणि विल्मोर ५ जून २०२४ रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचले. ८ दिवसांच्या मोहिमेचे उद्दिष्ट अनपेक्षित तांत्रिक बिघाडांमुळे नऊ महिन्यांच्या मुक्कामात वाढले. परंतु वाढलेल्या वेळेनंतरही नासाच्या म्हणण्यानुसार, या मोहिमेदरम्यान, सुनीता विल्यम्स वेगवेगळ्या कामांमध्ये व्यग्र राहिल्या.
सुनीता विल्यम्स यांनी अंतराळात नऊ महिने काय काय केले?
अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या (ISS) देखभाल आणि स्वच्छतेमध्ये भूमिका बजावली. या स्थानकाला सतत देखभालीची आवश्यकता असते. असे म्हटले जाते की, या स्थानकाचे क्षेत्रफळ जवळजवळ फुटबॉल मैदानाइतके आहे. सुनीता विल्यम्स यांनी जुन्या उपकरणांमध्येही बदल केले आणि काही प्रयोग केले. सुनीता विल्यम्स यांनी अंतराळ स्थानकाबाहेर तब्बल ६२ तास नऊ मिनिटे व्यतीत केली. अर्थात, नऊ वेळा अंतराळात चालणे (स्पेसवॉक) अनुभवले. सुनीता विल्यम्स आणि त्यांच्या पथकाने ९०० तास संशोधन केले. दरम्यान, त्यांनी १५० हून अधिक प्रयोगही केले. सुनीता विल्यम्स यांनी अंतराळ स्थानकात अनेक महत्त्वपूर्ण अशा संशोधन प्रकल्पांमध्ये काम केले.
भविष्यातील मोहिमांसाठी महत्त्वाचे संशोधन
सुनीता विल्यम्स यांनी अनेक उच्च प्रभावी संशोधन प्रकल्पांमध्ये योगदान दिले आहे. त्यामध्ये सूक्ष्म गुरुत्वाकर्षण अंतराळातील द्रव प्रणालींवर कसा परिणाम करते यावरील अभ्यासाचा समावेश आहे. नासाच्या म्हणण्यानुसार, भविष्यातील दीर्घकालीन मोहिमांसाठी हे तंत्रज्ञान महत्त्वपूर्ण ठरू शकते. सुनीता विल्यम्स यांनी ज्या सर्वांत महत्त्वाच्या प्रयोगांवर काम केले त्यापैकी एक म्हणजे बायोन्यूट्रिएंट्स प्रकल्प. हे संशोधन अंतराळवीरांसाठी ताजे पोषक घटक तयार करण्यासाठी कसे वापरले जाऊ शकतात याचा शोध घेते. पृथ्वीपासून लांब राहिल्यावर अंतराळवीरांना आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे कशी मिळू शकतात यावरही अभ्यास करण्यात आला.
नासाने पुष्टी केली की, दोन्ही अंतराळवीर पृथ्वीवर परतल्यानंतर पूर्णपणे सुरक्षित आहेत. त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे आणि अंतराळवीरांच्या पथकातील व्यक्तींची प्रकृती चांगली असली तरी त्यांना पृथ्वीवरील सामान्य जीवनाशी पूर्णपणे जुळवून घेण्यासाठी थोडा वेळ लागेल. खबरदारी म्हणून पुढील काही आठवडे नासाचे वैद्यकीय पथक त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवेल.