Gauri Sawant Interview: सुश्मिता सेन हिच्या अप्रतिम अभिनयाने नटलेला ‘ताली’ हा सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे. तृतीयपंथींच्या आयुष्याच्या खाचखळग्यांची माहिती देणारा हा सिनेमा तृतीयपंथी समुदायाचे नेतृत्व करणाऱ्या गौरी सावंत यांच्या आयुष्यावर आधारित आहे. कित्येक वर्ष समाजात तृतीयपंथींना मानाचं तर सोडाच पण हक्काचं स्थानही मिळत नव्हता. अशावेळी गौरी सावंत यांच्यासारख्या अनेक नेतृत्वांनी लढून आपले हक्क मिळवले आहेत. ज्यांना समाजाचा भागच मानलं जात नव्हतं त्यांच्याविषयी अनेक सांगोपांगी गोष्टी चर्चेत येणं हे साहजिक आहे. अशाच कित्येक गैरसमजुतींचा पडदा हा तृतीयपंथींच्या आयुष्यावर सुद्धा होता. ताली या सिनेमाच्या काही महिन्यांपूर्वी झी मराठीवरील बस बाई बस या शोमध्ये गौरी सावंत यांनी हाच गैरसमजुतींचा पडदा बाजूला सारण्याचं काम केलं आहे.
आजच्या या लेखातून आपण तृतीयपंथींसंबंधित सर्वाधिक ऐकल्या- विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेणार आहोत. आणि हा प्रश्न म्हणजे ‘तृतीयपंथींच्या मृतदेहाला चपलांनी मारतात का?’
बस बाई बस कार्यक्रमात जेव्हा तृतीयपंथींच्या मृतदेहाचा व प्रेतयात्रेचा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा स्वतः गौरी सावंत यांनीही आपला अनुभव शेअर केला होता. त्या म्हणतात, मला रिक्षाने येता जाता पण कित्येकदा रिक्षावाल्यांनी विचारलं आहे की तुमच्यात मृतदेहांना चपलेने मारतात का? तुमच्या समुदायातील मृताची प्रेतयात्रा पाहिली तर माणूस श्रीमंत होतो का? अशावेळी मी एकच उत्तर देऊ इच्छिते की, आम्ही पण माणसं आहोत आणि आम्हालाही मृत्यू तेवढाच दुःखद आहे, चपलेने मारणं या निव्वळ अफवा आहेत. एखाद्याच्या निधनानंतर जसे शेजारपाजारचे चार खांदेकरी त्या मृतदेहाला घेऊन जातात, जसं त्याच कुटुंब त्याला अग्नी देतं, अंत्यसंस्कार करतं तशाच पद्धतीने आमच्यातही अंत्ययात्रा पार पडते.
राहिला प्रश्न आमच्यापैकी कोणाची अंत्ययात्रा पाहिल्यावर श्रीमंत होता येतं का? तर मी आयुष्यात एवढ्या जणांचे मृत्यू पाहिले मी काय श्रीमंत झाले का असाही प्रश्न गौरी सावंत यांनी विचारला.
हे ही वाचा<< तृतीयपंथींचे लग्न लावून दुसऱ्याच दिवशी केलं जातं विधवा; भारतातील ‘या’ गावाची परंपरा काय आहे?
दरम्यान, आपणही जर कधी तृतीयपंथींच्या मृतदेहाला चपला मारण्याची चर्चा ऐकली असेल तर त्याच्या जोडीने एक लॉजिक सुद्धा चर्चेत असतं ते म्हणजे, ज्या जीवाचा जन्म हा असा एक ठोस ओळख नसताना झाला आहे, त्याला या जन्मात प्रचंड यातना सहन कराव्या लागल्या आहेत. त्याला पुन्हा हा जन्म मिळू नये याचा संदेश देण्यासाठी त्यांना चपलेने मारलं जातं. पण या चर्चांवर गौरी सावंत यांनी सांगितलं की, “जर मला पुढचे कितीही जन्म मिळाले तर मी पुन्हा हाच जन्म घेईन”.