तमाशा हा शब्द आपल्या कानावर कायमच पडत आला आहे. तमाशा म्हणजे फक्त शृंगार केलेल्या युवतींचा नाच नाही तर बऱ्याचदा काय तमाशा लावला आहे? असंही म्हटलं आहे. तमाशा, लावणी या विषयावर लोककलावंत गणेश चंदनशिवेंनी सखोल अभ्यास केला आहे. इतकंच नाही तर त्यांनी हा शब्द मराठी भाषेतला नाही असंही म्हटलंय.
पेशवाईत तमाशा खूप वेगळा होता
पेशवाईच्या आधी तमाशा वेगळा होता आणि पेशवाईतला तमाशा वेगळा होता. पेशवाईच्या आधी त्याला अख्यायिकेचं स्वरुप होतं. पेशवाईत शाहीर होनाजी बाळा, राम जोशी, शाहीर परसराम, सगनभाऊ या शाहिरांना पेशवाईत राजाश्रय मिळाला होता. हे सगळे किर्तनकार शाहीर होते. या सगळ्यांनी अख्यानक स्वरुपातल्या लावणीला शृंगाराचा बाज दिला. त्यानंतर शाहिरांची मोठी पिढी उदयाला आली. काळू-बाळूचा तमाशा, पठ्ठे बापूराव या आणि यांच्यासारख्या अनेक शाहिरांनी स्वातंत्र्यपूर्व काळात तमाशाला उर्जित अवस्था आणली. या लोकांचं चरित्र किंवा काम खूप मोठं होतं. भारतीय स्वातंत्र्य लढा, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ यांमध्ये तमाशाचं मोठं योगदान होतं. असं गणेश चंदनशिवेंनी सांगितलं.
हे पण वाचा- लोककलावंत गणेश चंदनशिवेंची खंत, “लावणी गौतमी पाटीलमुळे भ्रष्ट झाली, नखशिखांत शृंगाराने…”
तमाशा मराठी शब्द नाही तो अरबी भाषेतून आलेला शब्द आहे
तमाशा हा शब्द मराठी नाही. तमाशा हा अरबी भाषेतला आहे. तो शब्द अरबीतून फारसीत आणि मग उर्दूत आला. त्यानंतर मराठीत येऊन स्थिरावला. तमाशा हा शब्द ‘तमासा’ या अरबी शब्दावरुन आला आहे. मोगल उत्तरेतून जेव्हा दक्षिणेकडे आले तेव्हा ते पेशे वगैरे पाहात होते. इकडे म्हणजेच दक्षिणेतही हे असलं पाहिजे असं त्यांना वाटायचं. इकडे तोपर्यंत गंमत किंवा खेळ हे शब्द रुढ होते. मोगलांनी तमाशा करो म्हटलं. लोकांनी त्याचे वेगळे अर्थ घेतले. तमाशाचा अर्थ असा की तमो गुणाचा नाश करणारा खेळ म्हणजे तमाशा. तमो गुणाचा नाश का? कारण तमाशाचा जन्मच मनोरंजनासाठी झाला आहे. शेतीत काम करणारा माणूस, मजूर, कष्टकरी यांच्याकडे मनोरंजनाचं साधनच नव्हतं. त्यामुळे तो संध्याकाळी तमाशाला बघायला जात असे. तमाशाचा अभ्यास केल्यावर ही गोष्ट कळते.
रजतपटांमध्ये जो तमाशा आहे तो मूळ तमाशा नाही
रजतपटांमध्ये जो तमाशा पाहतो तो मूळ तमाशाच नाही. तमाशाची धाटणी अशी आहे की ज्यात गण आहे, गवळण आहे बतावणी आहे, लावण्या आहेत, कटाव आहेत, सवाल-जवाब आहेत अशा सगळ्या पद्धतीचा तमाशा वगाने संपतो. एक होता विदूषक या चित्रपटात काही अवशेष पाहण्यास मिळतात. बाकी एकाही तमाशापटात खराखुरा तमाशा हा दिसलेलाच नाही. नटरंगमध्ये ज्या लावण्या आहेत त्या लावण्यांना जो ढोलकीचा बाज आहे तो बाज दिलेला नाही. काही बारकावे आहेत आहेत. मध्यंतरी चंद्रमुखी सिनेमा आला होता, कादंबरी वेगळी आणि चित्रपट वेगळा असंच होतं. असं गणेश चंदनशिवे म्हणाले. कॅच अप नावाच्या युट्यूब चॅनलवर गणेश चंदनशिवे यांनी अमोल परचुरेंना मुलाखत दिली. त्या मुलाखतीत त्यांनी हे स्पष्ट केलं.