आपल्या देशात शिक्षणाला एक वेगळं महत्व आहे. काळानुसार देशाची शिक्षण पद्धती बदलत आहे. खेड्यापासून शहरापर्यंत प्रत्येकाला शिक्षणाचे महत्व समजत आहे. यामुळे आई-वडील शिकले नाहीत तरी ते आपल्या मुलांना उच्च शिक्षण देण्याचा प्रयत्न करतात. परंतु शहराच्या तुलनेत आजही खेड्यात शिक्षणासाठी म्हणाव्या तश्या सोयी-सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, आपल्या देशात असं गाव आहे, जेथील सर्वाधिक लोक प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, टीजीटी शिक्षक, पीजीटी शिक्षण, विशेष शिक्षण आणि शाळा निरीक्षक बनले आहेत, आहे ना एक कौतुकाची गोष्टी. तुमच्यात जर काहीतरी बनण्याची जिद्द असेल ना तर तुम्ही कोणत्याही ध्येयापर्यंत पोहचू शकता. पण त्यासाठी कठोर परिश्रम आणि समर्पणाची गरज असते. याच संघर्षातून भारतात असं एक गाव तयार झालं, जिथे प्रत्येक कुटुंबातील एकतरी व्यक्ती तुम्हाला शिक्षकी पेशात दिसेल. पण हे गाव नेमकं आहे कुठे आणि त्या गावाला शिक्षकांचे गाव म्हणून कशी ओळख मिळाली जाणून घेऊ…
उत्तरप्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्याजवळील सांखनी या गावाला शिक्षकांचे गाव म्हणून ओळखले जाते. हे गाव जहांगीराबादपासून सुमारे ३ किमी अंतरावर आहे.
गावातील पहिले सरकारी शिक्षण कोण होते?
पेशाने शिक्षक असलेले हुसेन अब्बास हे सांखनी गावाचे रहिवासी आहेत. त्यांनी सांखनी गावाच्या इतिहासावर ‘तहकीकी दस्तवेज’ नावाचे एक पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकातील माहितीनुसार, आत्तापर्यंत या गावातून सुमारे ३५० रहिवासी कायमस्वरुपी सरकारी शिक्षक झाले आहेत. या गावचे पहिले शिक्षक तुफैल अहमद होते. ज्यांनी १८८० ते १९४० या काळात अनुदानित शाळेत शिक्षक म्हणून काम केले. तर या गावातील पहिले सरकारी शिक्षक बकर हुसेन होते. ज्यांनी १९०५ मध्ये उत्तर प्रदेश जिल्ह्यातील अलीगढजवळील शेखूपूर जुदेंरा नावाच्या गावातील सरकारी शाळेत शिक्षक होते. यानंतर १९१४ मध्ये ते दिल्लीतील पुल बंगशजवळ बांधलेल्या सरकारी मिशनरी स्कूलमध्ये गेले. यानंतर गावात पीएच.डी करणारे पहिले शिक्षक अली रझा होते, ज्यांनी १९९६ मध्ये पीएचडी केली. सध्या मोहम्मद युसूफ रझा हे जामियामधून पीएच.डीचे शिक्षण घेत आहेत.
१८५९ च्या नोंदणीनुसार, या गावाचे एकूण क्षेत्रफळ १२७१ एकर आहे. यात सध्या ६००-७०० घरे असून लोकसंख्या १५ ते १८ हजारांच्या आसपास आहे. या गावातील ३०० ते ३५० रहिवासी कायमस्वरुपी शासकीय शिक्षक म्हणून काम करत असल्याचे ‘तहकीकी दस्तवेज’ पुस्तकात आढळून आले आहे. उत्तर प्रदेश, दिल्ली व इतर राज्यांतील विविध जिल्ह्यांत या गावातील शिक्षक कार्यरत आहेत. विशेष म्हणजे गावात ट्यूटर, गेस्ट टिचर, विशेष शिक्षकांची संख्या ६० वरून ७० वर पोहोचली आहे. तसेच महिला शिक्षकांच्या संख्येतही लक्षणीय वाढ होत आहे.
गावातील फक्त शिक्षकचं आहेत का?
या गावात १८७६ साली पहिला शाळा बांधण्यात आली, जी फक्त तिसरीपर्यंत होती. यानंतर १९०३ मध्ये ४ खाजगी आणि सरकारी शाळा सुरु झाली. सध्या गावात सरकारी आणि खाजगी मिळून ७ शाळा आहेत. या गावातील सर्वाधिक लोक केवळ शिक्षक होण्यावर भर देतात असे नाहीतर ते इतरही क्षेत्रातही काम करत आहेत. जसे की, डॉक्टर, इंजिनियर, फोटोग्राफर, जर्नलिस्ट, एअर होस्टेस, लॉयर,पोलीस. या गावातील अकबर हुसेन हे पहिले सिव्हिल इंजिनियर होते, पण भारत – पाकिस्तान फाळणीदरम्यान ते पाकिस्तानात गेले. पाकिस्तानातही त्यांनी १९५२ च्या सुमारास इंजिनियर म्हणून काम केले. हुसैन अब्बास यांच्या पुस्तकातील माहितीनुसार या गावातील सुमारे ५० लोक सध्या इंजिनियर आहेत.
या गावातील मुलांना एंट्रेन्स परीक्षेच्या तयारीसाठी मोफत कोचिंग दिले जाते. सांखनी लायब्ररी अँड कोचिंग सेंटर असे या मोफत कोचिंग सेंटरचे नाव आहे. याठिकाणी २०१९ पासून मोफत शिक्षण दिले जाते. याठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे पैसे किंवा शिकवणाऱ्या शिक्षकांना मानधन दिले जात आहे. पण काही शिक्षक मानधनावर आहेत. यात कोचिंग सेंटरमध्ये सुमारे १२ शिक्षक आहेत. ‘तहकीकी दस्तावेज’ पुस्तकानुसार हे गाव पाचशे वर्षांहून अधिक जुने असून इतिहासात पानात १६११ पासून या गावाचा उल्लेख आढळतो.