प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा अयोध्येतल्या मंदिरात पार पडली. एका ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार आपला देश ठरला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभाग होता. राम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा हा सोहळा अत्यंत उत्साहाच्या वातावरणात पार पडला. आज मंदिरात ज्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली ती मूर्ती कृष्ण शिळेपासून तयार करण्यात आली आहे. कृष्ण शिळा म्हणजे नेमकं काय ते आपण जाणून घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कृष्ण शिळा दगड नेमका कसा सापडला?

अयोध्येतील राम मंदिरात ज्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली ती मूर्ती प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी घडवली आहे. मूर्तीचं स्मित हास्य लक्ष वेधून घेणारं ठरतं आहे. प्रभू रामाची मूर्ती तयार करण्यात आली आहे ती कृष्ण शिळेपासून. कृष्ण शिळा नावाचा हा दगड कर्नाटकाताल्या मैसूर या ठिकाणी असलेल्या हेग्गाडादेवनकोटे या ठिकाणी सापडतो. या जागेला एचडी कोटे तालुका असंही म्हणतात. शिल्पकार अरुण योगीराज यांचे भाऊ सूर्यप्रकाश यांनी याविषयी ‘ईटीव्ही भारत’ला माहिती देताना सांगितलं की एच. डी. कोटे तालुक्यातल्या गुज्जेगौदनपुरा या ठिकाणी शेतजमिनीत हा दगड आढळून आला. या दगडातच प्रभू रामाची मूर्ती कोरण्यात आली आहे. फेब्रुवारी २०२३ मध्ये कृष्ण शिळा हा दुर्मिळ दगड सापडला. अरुण योगीराज आणि त्यांची टीम रामाची मूर्ती घडवण्यासाठी दगड शोधत होते.

राम मंदिरात स्थापन करण्यात आलेली रामाची मूर्ती (फोटो-ANI)

कृष्ण शिळा कशी निवडली गेली?

जमिनीचे मालक रामदास यांनी अरुण योगीराज यांच्या वडिलांना कृष्ण शिळा सापडल्याचे सांगितले. अरुण योगीराज यांनी याबाबत सुरेंद्र शर्मा आणि मनैय्या बडिगर या शिल्पकारांना याविषयी सांगितलं. त्यांनी त्या ठिकाणी जाऊन दगड तपासला असता तो दगड मूर्ती बनवण्यासाठी योग्य असल्याचं समजलं. त्यानंतर ९ फेब्रुवारी २०२३ या दिवशी काही टन वजनाच्या पाच कृष्ण शिळा या अयोध्येला पाठवण्यात आल्या. अशा पद्धतीने कृष्ण शिळेची निवड ही रामाच्या मूर्तीसाठी करण्यात आली.

कृष्ण शिळेची वैशिष्ट्यं काय?

कृष्ण शिळा हा दगड निळा किंवा काळ्या रंगात आढळतो. त्यामुळे त्याला कृष्ण शिळा असं म्हटलं जातं. हा दगड अत्यंत गुळगुळीत असतो. तसंच कृष्ण शिळा या दगडावर अॅसिड, आग, धूळ यांचा काहीही परीणाम होत नाही. हा दगड वजनाला जड असतो आणि लोखंडाहून अधिक मजबूत असतो. उन, वारा, पाऊस, दूध, तूप, ज्वाला यांचा या दगडावर काहीही परिणाम होत नाही. हा दगड १ हजारांहून अधिक वर्षे जसाच्या तसा राहतो. त्यामुळे हा दगड मूर्तीसाठी अत्यंत उत्तम मानला जातो. या दगडाला बोलीभाषेत कल्लू असंही म्हटलं जातं.

रामलल्लाच्या मूर्तीची वैशिष्ट्ये काय?

रामलल्लाच्या मूर्तीच्या सर्वात वरच्या भागात स्वस्तिक, ओम, चक्र, गदा आणि सूर्याची आकृती कोरण्यात आली आहे.

मूर्तीच्या डाव्या हातात सोन्याचं धनुष्य आणि उजव्या हातात सोन्याचा बाण आहे.

याशिवाय रामलल्लाच्या मूर्तीच्या बाजूला विष्णूचे दशावतार आहेत. मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध आणि कल्कि यांच्या आकृत्या कोरण्यात आल्या आहेत.

कमळ, हनुमान आणि गरुडही या मूर्तीवर आहेत.

रामाच्या या मूर्तीचं वजन २०० किलो आहे. तर उंची ५१ इंची आहे.

रामलल्लाची मूर्ती ५१ इंची का?

रामलल्लाची मूर्ती ५१ इंची उंचीची ठेवण्यात आली आहे. कारण भारतात सर्वसाधारणपणे पाच वर्षांच्या मुलाची उंची ही तितकीच असते. तसंच ५१ हा शुभ अंक मानला गेला आहे. त्यामुळे मंदिराच्या गाभाऱ्यात प्राणप्रतिष्ठा करुन स्थापन करण्यात येणारी मूर्ती ५१ इंची आहे. या मूर्तीची निर्मिती कृष्ण शिळा या दगडात कोरीव काम करुन करण्यात आली आहे. हिंदू देव-देवतांच्या मूर्ती या खासकरुन कृष्ण शिळा दगडापासूनच तयार केल्या जातात.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The idol of lord rama is carved in krishna shila what is black rock what are the features scj