शाळेला सुट्टी पडली की चिमुकल्यांचा माळ्यावर किंवा पिशवीत बांधून ठेवलेली खेळणी काढण्याचा आईकडे हट्ट सुरू होतो. मग सगळ्या मैत्रिणी एकत्र जमून, त्यांची मोजकी भांडी एकत्र करून भातुकलीचा खेळ खेळण्यास सुरुवात करतात. मग सकाळपासून ते रात्रीपर्यंत हा खेळ सुरूच. मातीची चूल, पानांची भाजी आणि गोल आकार देऊन केलेल्या पानांच्या पोळी, स्वयंपाकघरातील खेळण्यातील विविध भांडी व बाहुला-बाहुलीचे लग्न म्हणजेच एकंदरीत हा भातुकलीचा खेळ.
‘भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी, अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी…’ मंगेश पाडगावकर यांचे गाणं कानावर पडले की, लहानपणीचे ते सोनेरी क्षण पुन्हा एकदा आठवतात. या गाण्याने लहानपणापासून साथ दिली, तर डोळ्यात पाणीसुद्धा आणलं आहे. पण, हा भातुकलीचा खेळ म्हणजे नेमका कोणता खेळ ते मात्र तेव्हा आपल्याला माहीत नव्हतं. तर आज आपण या लेखातून भातुकली हा शब्द या खेळाला कुठून देण्यात आला? भातुकली या शब्दाचा नेमका अर्थ काय आणि या खेळाला भातुकलीचं का म्हणतात, हे आपण जाणून घेऊ…
‘कहाणी शब्दांची : मराठी भाषेच्या जडणघडणीची’ या पुस्तकात लेखक सदानंद कदम यांनी भातुकली या शब्दाचा अर्थ सांगितला आहे. लेखक सदानंद कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार मुलींचा असणारा हा खेळ म्हणजे लुटूपुटूच्या संसारातील स्वयंपाकाचा खेळ. स्वप्नातील स्वयंपाक आणि स्वप्नातील स्वयंपाकघर. या खेळात बनवला जाणारा स्वयंपाकही थोडाच. त्यामुळे या थोड्याश्या करण्यात आलेल्या स्वयंपाकाला भातुक, भातुकले, किंवा भातकूल असे म्हटले जायचे.
हेही वाचा…कागदाला पेपर का म्हणतात? जाणून घ्या ‘पेपर’ या शब्दामागील रंजक गोष्ट…
संसारात रमलेल्या त्या प्रत्येक महिलेने या खेळाची गंमत बालवयात अनुभवली आहेच आणि त्या खेळात सहभागी होणाऱ्या राजाने आजही ती मजेशीर आठवण त्याच्या मनात लपवून ठेवलेली आहे. तसेच ‘लीळाचरित्रा’तही या खेळाचा उल्लेख करण्यात आला होता. लीळाचरित्रामधल्या वेळचे जेवण किंवा खाणं म्हणजे भातुकली. म्हणून पुढे या खेळाला भातुकली असे नाव पडलं.
तर या भातुकलीच्या खेळात कोण कोणती भूमिका करणार हे भांडून का होईना, पण ठरायचं.भातुकलीच्या खेळात आई पानांचे जेवण करायची. बाबा ऑफिसला जायचे. भाऊ,बहीण शाळेत जायची. जेवणं व्हायची. सारे काही लुटूपुटूचे. पण, अगदी खऱ्यासारखे वाटायचे. आता कितीही सेलवर चालणारी डिजिटल खेळणी आली तरी स्वयंपाकातील त्या छोट्या-छोट्या भांड्यांची मजा आताच्या या नवीन खेळण्यांमध्ये नाही आणि भातुकलीचा हा खेळ मनात नेहमी एक खास जागा घेऊन राहील.