Asia Most Literate Village : शिक्षण हे माणसाच्या मूलभूत गरजांपैकी एक आहे. देश साक्षर अन् सुशिक्षित व्हावा यासाठी आपल्या देशात कित्येक वर्षांपासून शिक्षणासंदर्भात अनेक मोहिमा राबवल्या जात आहेत. सध्या एका सर्वेक्षणातून एक थक्क करणारी बाब समोर आली आहे. ती म्हणजे आशियातील सर्वांत जास्त सुशिक्षित गाव हे भारतात आहे. विश्वास बसणार नाही; पण हे खरं आहे. उत्तर प्रदेशच्या अलीगढ जिल्ह्यातील धोर्रा माफी नावाचं हे गाव आहे.
धोर्रा माफी या गावात जवळपास १० ते ११ हजार लोक राहतात. विशेष म्हणजे या गावातील ९० टक्के लोक सुशिक्षित आहेत. २०२२ मध्ये धोर्रा माफी या गावाने ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये आपले नाव दिले होते. या गावाचा साक्षरता दर ७५ टक्क्यांहून अधिक होता; जो एक रेकॉर्ड मानला जातो. याशिवाय हे गाव ‘गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड’ च्या सर्वेक्षणासाठी निवडले गेले आहे.
हे गाव फक्त सुशिक्षितच नाही, तर येथे शिक्षणाच्या भरपूर सुविधा आहेत. या गावात इंग्रजी माध्यमाच्या अनेक शाळा, महाविद्यालये आहेत. येथील मोठ्या प्रमाणात लोक शेतीऐवजी नोकरी करतात. त्यामुळे या गावातील ८० टक्के लोक चांगल्या पदांवर आहेत. कोणी डॉक्टर तर कोणी इंजिनीयर, कोणी प्रोफेसर, तर कोणी आयएएस अधिकारी आहेत. अनेकांना चांगल्या नोकऱ्या मिळाल्या आहेत. या गावातील अनेक लोक नोकरी आणि शिक्षणासाठी परदेशात गेले आहेत. या लोकांना शिक्षणाचे महत्त्व पटले आहे आणि त्यामुळेच ते आत्मनिर्भर व सुशिक्षित आहेत.
हेही वाचा : बिस्किटांमध्ये छोटी छोटी छिद्रे का असतात? फक्त डिझाइनसाठी नाही तर यामागे आहे हे सर्वांत मोठे कारण
‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’नुसार या गावाने आशियातील सर्वांत सुशिक्षित गाव म्हणून नाव कमावले आहे. सध्या जगभरात या गावाची जोरदार चर्चा सुरू आहे. जर देशातील प्रत्येक गावात असेच सुशिक्षित लोक दिसून आले, तर साक्षरतेमध्ये भारत लवकरच जगात अव्वल क्रमांकावर येऊ शकतो.