कोणत्याही मोबाइलमध्ये असणाऱ्या बॅटरीमधील रासायनिक गुणधर्मामुळे तिचं कामकाज चालतं. नेमकी हीच रसायनं बॅटरीच्या स्फोटासाठी कारणीभूत असतात. मोबाइलची बॅटरी नेमकं कसं काम करते आणि एखाद्या मोबाइलमधील बॅटरीचा स्फोट होतो म्हणजे काय होतं याबद्दलचा हा लेख…
वाढती स्पर्धा, फोनचे मोठे होत जाणारे स्क्रिन्स आणि त्यासोबत वाढत जाणारा स्मार्टनेस आणि मल्टिटास्किंग, या साऱ्यासाठी लागते बॅटरी. बॅटरीही जास्त खर्च होऊ न देता या सगळ्या गोष्टी सहज सुरू ठेवणं काळाची गरज आहे. पुन्हा बॅटरी चार्जिगसाठी लागणारा वेळही महत्त्वाचा घटक आहे. सध्याच्या घडीला बहुतांश स्मार्टफोन्समध्ये लिथियम आयन बॅटरीज वापरली जाते. ही बॅटरी वजनाला हलकी आणि जास्त प्रमाणात एनर्जी धरून ठेवते. बॅटरीजचा स्फोट का होतो हे कळण्याआधी त्यांचं काम कसं चालतं हे जाणून घेणं गरजेचं आहे. बॅटरीमध्ये विरुद्ध बाजूंना दोन इलेक्ट्रोड असतात. एका इलेक्ट्रोडमध्ये पॉझिटिव्ह चार्ज असतो ज्याला कॅथोड म्हटलं जातं. कॅथोड लिथियमने भरलेला असतो आणि तिथेच फोनसाठीचं सारं इंधन भरलेलं असतं. विरुद्ध बाजूच्या इलेक्ट्रोडमध्ये निगेटिव्ह चार्ज असतो ज्याला अॅनोड म्हटलं जातं.
जेव्हा बॅटरी चार्ज होत असते तेव्हा लिथियम आयन्स कॅथोडकडून अॅनोडकडे जातात. आणि जेव्हा बॅटरीचा वापर होत असतो तेव्हा हेच आयन्स अॅनोडकडून कॅथोडकडे जातात. ह्य़ा दोन इलेक्ट्रोड्सच्या मध्ये रसायनं असतात ज्यांना इलेक्ट्रोलाइट्स म्हणतात. ह्य़ा रसायनांमधून करंट वाहत असतो. आयन्स एका इलेक्ट्रोडकडून दुसऱ्याकडे जाणं हे बॅटरीच्या कामकाजासाठी सर्वात महत्त्वाचं असतं. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं असतं ते म्हणजे कॅथोड आणि अॅनोड एकमेकांपासून वेगळे राहणं. त्यांना वेगळं ठेवण्यासाठी बॅटरीजमध्ये सेपरेटर्स असतात. अनेक फोनच्या बाबतीत नेमका हाच घोळ होता. बॅटरीमध्ये असणारे सेपरेटर्स सदोष होते. कुठल्याही कंपनीसाठी हा दोष मोठा समजला जातो, कारण यामुळे उपकरणाला आग लागण्याची शक्यता असते. किंवा त्याहून वाईट म्हणजे स्फोट होण्याची शक्यता असते.
जेव्हा इलेक्ट्रोड एकमेकांना जोडले जातात तेव्हा सगळी ऊर्जा ही इलेक्ट्रोलाइट्समध्ये जाते. मुळातच इलेक्ट्रोलाइट्स फारसे स्टेबल नसतात. इलेक्ट्रोड्सच्या जोडण्यामुळे जेव्हा उष्णता वाढते तेव्हा इलेक्ट्रोलाइट्सची इतर रसायनांसोबत रासायनिक प्रक्रिया होऊ लागते. या प्रक्रियेतून
गॅसेस निर्माण होतात ज्यातूनही उष्णता बाहेर सोडली जाते. प्रत्येक रासायनिक प्रक्रियेगणिक तयार होणारे गॅसेस अधिकाधिक उष्णता सोडतात. तांत्रिक भाषेत याला थर्मल रनअवे म्हणतात ज्याची परिणती आगीमध्ये होते. त्यामुळेच बहुतांश फोन्स गरम झाले की आपोआप बंद होतात. पण त्याबरोबरच बॅटरीचा स्फोट होण्यामागे आणखी एक कारण आहे आणि ते म्हणजे ओव्हरचार्जिग आणि फास्टचार्जिग.
ओव्हरचार्जिग हे पाण्याची बादली भरण्यासारखं आहे. बादली भरल्यानंतरही पाणी चालू असेल तर ती ओव्हरफ्लो व्हायला लागते. बॅटरीच्या बाबतीत जेव्हा ओव्हरचार्जिग होतं तेव्हा मोठय़ा प्रमाणात लिथियम अॅनोडकडे जातं. त्यामुळेच रात्रभर बॅटरी चार्जिगला लावून ठेवणं अयोग्य असतं. आणि याच कारणास्तव ऑटोमॅटिकली ओव्हरचार्जिग थांबणाऱ्या बॅटरीजची निर्मिती कंपन्यांनी केलेली आहे. ओव्हरचार्जिगसोबतच दुसरं कारण म्हणजे फास्टचार्जिग.
फास्टचार्जिगमुळे प्लेटिंगचा प्रॉब्लेम होऊ शकतो. दुसऱ्या उपकरणाचा चार्जर वापरणं किंवा चार्जिगसाठी इतर उपकरणं वापरणं हे फास्टचार्जिगमागचं महत्त्वाचं कारण आहे.
एकूणच बॅटरी हा स्मार्टफोन्सचा प्राण आहे. नवीन इलेक्ट्रोलाइट्सचा शोध लागेल तेव्हा लागेल, पण तोपर्यंत उत्पादक आणि वापरकर्त्यांनी सद्य:स्थितीत असलेल्या बॅटरीज व्यवस्थित वापरणंच योग्य.