ओडिशातील बालासोर येथे तीन रेल्वेगाड्यांचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात आतापर्यंत २४० पेक्षा जास्त प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर ९०० प्रवाशी जखमी झाले आहेत. या अपघाताचे हृदय पिळवटून टाकणारे अनेक फोटो आणि व्हिडीओ समोर येत आहेत. शिवाय या अपघातानंतर अनेकांनी रेल्वे यंत्रणेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. दरम्यान, या अपघाताबद्दल देशभरातील अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील घटनास्थळाला भेट देत जखमींची भेट घेतली आहे.
जगभरात कोणतीही मोठी घटना घडल्यानंतर लोकांना त्या संबंधिची माहिती जाणून घेण्याची इच्छा असते. नुकतेच झालेल्या रेल्वे अपघातामुळे लोकांना रेल्वेशी संबंधित माहिती देणारा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये रेल्वे रुळावरुन खाली घसरल्यानंतर ती पुन्हा रुळावार कशी आणली जाते हे दाखवण्यात आलं आहे.
रेल्वे रुळावर कशी आणली जाते?
रेल्वे ही बाईकसारखी नसते जी कोणीही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज नेऊ शकतो. तसेच ती कारसारखीही नसते, जी मोठ्या मशीनला बांधून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येईल किंवा उचलून ठेवता येईल. रेल्वेला अनेक डबे असतात, ते सर्व डबे रुळावर नेण्यासाठी एक युक्ती वापरली जाते. यासाठी ना अनेक लोकांच्या बळाची गरज लागते ना, कोणत्याही मोठ्या यंत्राची. हो कदाचित यावर तुमचा विश्वास बसणार नाही, पण आज आम्ही तुम्हाला असा व्हिडिओ दाखवणार आहोत, ज्यामध्ये रेल्वे सहजपणे रुळावर कशी चढवली जाते, हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे.
प्लास्टिकचे दोन मोठे प्लॅटफॉर्म वापरले जातात –
या व्हिडिओत तुम्ही रेल्वे रुळावरून घसरल्याचे पाहू शकता त्यानंतर खाली घसलेली रेल्वे रुळावर आणली जात आहे. त्यासाठी रुळावर प्लास्टिकचे दोन मोठे फलाट ठेवल्याचंही व्हिडीओ दिसत आहे. या प्लॅटफॉर्मच्या मदतीने, प्रथम इंजिन रुळावर चढवले जाते. त्यानंतर रेल्वेचे डबे इंजिनच्या मागे बांधले जातात, जे एक एक करून रुळावर चढवले जातात. अशा प्रकारे एक एक करून सर्व डबे रुळावर चढवल्याचं व्हिडीओत दिसत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, रेल्वेचे डबे रुळाच्या बरोबरीचे आहेत. त्यानंतर डब्यांची चाके प्लास्टिकवर चढताच तसे डबे रुळावर येतात. त्यामुळे फक्त दोन प्लास्टिकच्या तुकड्यांच्या आधारे पूर्ण रेल्वे रुळावर आणल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे.