Expensive dog breeds: श्वान हा अनेकांचा आवडता प्राणी आहे. या पाळीव प्राण्यावर लोकांचे जीवापाड प्रेम असते. श्वानाला घरातील सदस्याएवढीच उत्तम वागणूक दिली जाते. शिवाय त्याची आवड-निवडही पूर्ण केली जाते. अलीकडे अनेक जण देशी श्वानांव्यतिरिक्त विविध जातींचे श्वान पाळण्याला पसंती देतात. दरम्यान, आज अशाच विविध जातींच्या सर्वात महागड्या आणि दुर्मीळ जातीबाबत आपण माहिती जाणून घेणार आहोत.
श्वानांच्या दुर्मीळ जाती
तिबेटी मास्टिफ
तिबेटी मास्टिफ जातीचे श्वान सर्वात शक्तिशाली असतात. हे सामान्यतः हिमालयीन प्रदेशात आढळतात. ते त्यांच्या मालकाशी खूप निष्ठावान असतात. या जातीचे श्वान त्यांच्या ताकदीसाठी, निष्ठावानपणासाठी आणि संरक्षणात्मक स्वभावासाठी ओळखले जातात. तिबेटी मास्टिफचे वजन साधारणपणे ४० ते ५० किलो दरम्यान असते. तिबेटीयन मास्टिफ जातीच्या श्वानाची किंमत ७० ते ७५ हजार रुपयांपर्यंत असते.
सेंट बर्नार्ड
सेंट बर्नार्ड जातीचे श्वान खूप मोठे असतात. त्यांचा स्वभाव खूप शांत असून ते त्यांच्या मालकाशी खूप निष्ठावान असतात. ते त्यांच्या संरक्षणात्मक क्षमतेसाठी ओळखले जातात. ही जात प्रामुख्याने स्वित्झर्लंड आणि इटलीच्या पर्वतांमध्ये आढळते. त्यांचे वजन ७० ते १२० किलोग्रॅमपर्यंत असते. हे श्वान आळशी दिसतात, पण त्यांचा स्वभाव खूपच तीक्ष्ण असतो.
बोअरबोएल
बोअरबोएल हा एक मोठा दक्षिण आफ्रिकेचा श्वान आहे, ज्याचा आकार मास्टिफसारखा आणि मजबूत स्नायूंचा आहे. या बोअरबोएल श्वानाची किंमत भारतात सुमारे १,२५,००० ते २,२५,००० रुपये आहे.
अफगाण हाउंड
हा अफगाणिस्तानातील एका शाही जातीचा श्वान आहे. हा अफगाणिस्तानाच्या थंड पर्वतांमध्ये आढळतो. हा श्वान जाड, बारीक, रेशमी आवरणाने ओळखला जातो. अफगाण हाउंडच्या शेपटीत शेवटी रिंग कर्ल असते. अफगाण हाउंड हा श्वान प्रसिद्ध शो श्वान आहे. भारतात त्यांची किंमत १,५०,००० ते ४,००,००० रुपये आहे.
इंग्रजी बुलडॉग
इंग्रजी बुलडॉग जातीला ब्रिटीश बुलडॉग असेही म्हणतात. या श्वानांना बुलडॉग असेही म्हणतात. त्यांच्या वाकलेल्या नाकामुळे, सुरकुत्या पडलेल्या चेहऱ्याने आणि रुंद शरीराने त्यांची ओळख पटते. या जातीचे श्वान त्यांच्या शांत आणि मैत्रीपूर्ण स्वभावासाठी ओळखले जातात. त्यांच्या शरीराची रचना लहान आणि जाड असते.