Country where divorce is illegal : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. दोन व्यक्ती जेव्हा विवाह करतात तेव्हा ते नवीन आयुष्याची सुरुवात करतात. लग्नानंतरच्या या प्रवासात अनेकदा चढ-उतार येतात. अशा वेळी जोडीदाराने एकमेकांना समजून घेणे अपेक्षित असते; पण काही वेळा मतभेद इतके वाढतात की, अनेक जोडपी विभक्त होतात. सोशल मीडियावर अनेकदा सेलेब्रिटींच्या घटस्फोटांच्या चर्चा रंगतात.
सध्या भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज माजी खेळाडू वीरेंद्र सेहवाग लग्नानंतरच्या २० वर्षांनंतर पत्नी आरती अहलावतपासून विभक्त होत असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. घटस्फोटाद्वारे पती-पत्नीचे वैध वैवाहिक संबंध कारदेशीररीत्या तोडले जातात. भारतात घटस्फोटाची प्रक्रिया याचिका दाखल करण्यापासून सुरू होते आणि पुढे सर्व प्रक्रियांचे पालन केले जाते. त्यानंतर अंतिम घटस्फोटाचा निर्णय दिला जातो.
खरं तर भारतात घटस्फोट घेणे ही तशी खूप सोपी बाब आहे; पण असा एक देश आहे की, जिथे घटस्फोट घेणे बेकायदा मानले जाते. म्हणजेच या देशात घटस्फोटाला मान्यता नाही. तुम्हाला वाटेल की, असा कोणता देश आहे? आज आपण त्या देशाविषयी आणि तेथील या कायद्याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.
‘या’ देशात घटस्फोट बेकायदा मानला जातो
जगातील सर्वांत लहान स्वतंत्र शहर म्हणून ‘व्हॅटिकन सिटी’ची ओळख आहे. येथे घटस्फोटाला मान्यता नाही. पण, त्याशिवाय फिलिपिन्स असा एकमेव देश आहे, जिथे घटस्फोट बेकायदा मानला जातो. फिलिपिन्स देशात १९३० मध्ये घटस्फोटाला विरोध करणारा पहिला कायदा मंजूर करण्यात आला; पण त्यापूर्वी धार्मिक आधारावर येथे घटस्फोटाला विरोध होता. २०२० मध्ये झालेल्या जनगणनेनुसार, येथील कॅथॉलिक लोकसंख्या ७९ टक्के आहे. कोणत्याही इतर ख्रिश्चन देशांमध्ये कॅथॉलिक लोकसंख्या एवढी नाही. फिलिपिन्समध्ये मुस्लीम इस्लामिक कायद्यानुसार घटस्फोट घेऊ शकतात; पण कॅथलिक धर्माचे पालन करणार्यांना याची परवानगी नाही.
घटस्फोटावरील कट्टरता
ख्रिश्चन धर्मामध्ये विवाहाला अत्यंत पवित्र बंधन मानले जाते. विवाहित जोडपे काही प्रकरणांत वेगळे राहू शकते; पण चर्चमध्ये पुन्हा लग्न करू शकत नाही. घटस्फोटाबाबतच्या या कट्टरतेमुळे १६ व्या शतकात इंग्लंडच्या आठव्या हेन्रीने कॅथलिक चर्चशी संबंध तोडले होते. कारण- त्यांना त्यावेळी त्यांच्या वर्तमान पत्नीला घटस्फोट देऊन दुसरे लग्न करायचे होते.
काळानुसार चर्चने या प्रकरणामध्ये उदारता दाखवली. पुढे ८०-९० च्या दशकात स्पेन, अर्जेंटिना व आयर्लंडमध्ये घटस्फोट घेण्यास परवानगी मिळाली; पण फिलिपिन्समध्ये मात्र घटस्फोटावरील बंदी कायम राहिली.
फिलिपिन्सचे लोक वेगळे राहण्यासाठी काय करतात?
हा कायदा चुकीच्या नात्यात अडकलेल्या लोकांसाठी एक मोठी समस्या आहे. त्याबाबत सरकारवर वारंवार कायदा बदलण्याचा दबाव टाकला गेला आणि मध्यस्थी करीत लग्न रद्द करण्याचा (एनलमेंट घेण्याचा) मार्ग काढण्यात आला. एनलमेंट घेणे म्हणजे घटस्फोट नाही; पण जोडप्यांना वेगळे राहण्याची परवानगी देते.
हे घटस्फोटापेक्षा वेगळे आहे. एखादी व्यक्ती एनलमेंट तेव्हा घेऊ शकते जेव्हा नातं टिकवण्यासाठी गरजेच्या गोष्टींची पूर्तता होत नाही. जसे की, जोडीदार शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या निरोगी नाही. तसेच, एखादी महत्त्वाची गोष्ट लपवणे, इच्छेविरुद्ध लग्न होणे इत्यादी; पण एनलमेंटमध्ये एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षाला मोठा मोबदला द्यावा लागतो. श्रीमंतांना याचा त्रास होत नाही; पण मध्यम वर्गातील लोकांना पैशांच्या कमतरतेमुळे चुकीच्या नात्यामध्ये राहावे लागते.
मीडिया रिपोर्टनुसार, फिलिपिन्स लोक याच कारणाने कॅथलिक धर्म सोडून इस्लाम धर्म स्वीकारत आहेत. कारण- येथे इस्लामिक कायद्यानुसार घटस्फोटाला परवानगी आहे.