No river in these countries: प्रत्येक सजीव प्राण्यासाठी पाणी अत्यंत महत्त्वाचे आहे, त्यामुळे पाण्याला जीवन म्हटलं जातं. भारत देशात १०० हून अधिक मुख्य नद्या तसेच त्याहून अधिक उपनद्या आहेत. ज्या शहरात किंवा गावात नदी असते, तेव्हा नदीच्या आसपासचा परिसरही खूप समृद्ध आणि सुंदर असतो असं म्हटलं जातं. पण, तुम्हाला माहितेय का? जगामध्ये असे काही देश आहेत, जिथे एकही नदी नाही. आपण भारतीय नदी नसलेल्या गावांची कल्पनाही करू शकत नाही. पण, ही गोष्ट खरी आहे. नदी नसल्यामुळे हे देश पाण्याच्या पर्यायी स्त्रोतांवर अवलंबून आहेत. जवळपास जगातील २० देश आणि २२ प्रदेशांमध्ये नदी वाहत नाही. आज आम्ही तुम्हाला त्यातीलच काही नदी नसलेले देश जलस्रोतांचे व्यवस्थापन कसे करतात, हे सांगणार आहोत.
या देशांमध्ये वाहत नाही नदी
कतार
अरबी द्विपकल्पातील कतार या लहान श्रीमंत देशातही नदी वाहत नाही. देशाचा पाणीपुरवठा जवळजवळ संपूर्णपणे डिसेलिनेशन प्लांट्समधून होतो, जे ९९% पेक्षा जास्त पिण्यायोग्य पाणी पुरवतात.
युएई
युएई हा देश दुबई आणि अबू धाबीसारख्या समृद्ध शहरांमुळे ओळखला जातो. हा अरबी द्विपकल्पातील आणखी एक नदी नसलेला देश आहे. हा देश सिंचन आणि औद्योगिक उद्देशांसाठी प्रक्रिया केलेले सांडपाणी वापरतो, ज्यामुळे गोड्या पाण्याच्या स्त्रोतांचे संरक्षण करण्यात मदत होते. युएई त्याच्या पाण्याच्या गरजांसाठी प्रामुख्याने विलवणीकरणावर अवलंबून आहे, या पद्धतीद्वारे त्याच्या पिण्यायोग्य पाण्यापैकी ८०% उत्पादन करते.
मालदीव
अनेकांसाठी पर्यटनाचे आकर्षण असलेल्या मालदीवमध्येही एकही नदी वाहत नाही. मालदीव हिंद महासागरातील एक द्विपसमूह आहे, त्याच्या सखल भूगोलमुळे येथे नद्या नाहीत. येथील समुद्राच्या पातळीमुळे गोड्या पाण्याच्या लेन्सला धोका निर्माण झाला आहे. मालदीव आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी पावसाच्या पाण्याचे संचयन, निर्जलीकरण आणि बाटलीबंद पाण्याची आयात यावर अवलंबून आहे.
बहरीन
पर्शियन गल्फमधील बेट राष्ट्र असलेल्या बहरीनमध्येही एकही नदी वाहत नाही. परंतु, या देशात अनेक झरे आणि भूजल संसाधने आहेत. मात्र, देशाच्या गरजा भागवण्यासाठी ते पुरेसे नाहीत. परिणामी, बहरीन मोठ्या प्रमाणात विलवणीकरणावर अवलंबून आहे, जे त्याच्या ६०% पेक्षा जास्त गोड्या पाण्याचा पुरवठा करते. देश पाणी बचत तंत्र आणि कार्यक्षम पाणी वापर पद्धतींना प्रोत्साहन देतो.
कुवेत
कुवेत, अरबी आखाताच्या उत्तरेकडील टोकाला वसलेले आहे. कुवेतमध्येही एकही नदी वाहत नाही. त्यामुळे येथील नागरिकांना पाण्याच्या आव्हानांना तोंड द्यावे लागते. हा देश निर्जलीकरण संयंत्रांवर अवलंबून आहे, जे बहुतेक गोड्या पाण्याचा पुरवठा करतात.