कोणत्याही व्यक्तीला स्वत:चे हक्काचे घर घेण्यासाठी आयुष्यातील अनेक वर्षे खस्ता खाव्या लागतात. तरी अनेकांना संपूर्ण आयुष्यात हक्काचे घर विकत घेता येत नाही. अनेकदा गृहकर्ज घेऊन कुणी आपले घर उभे करण्याचा प्रयत्न केला तरी त्यांचे संपूर्ण आयुष्य कर्ज परतफेड करण्यात जाते. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला जगातील अशा काही खास ठिकाणांबद्दल सांगणार आहोत. जिथे राहण्यासाठी अर्थात स्थायिक होण्यासाठी एक रुपयाही खर्च करण्याची गरज भासत नाही. तुम्हाला फक्त तिथे जावे लागते ज्यानंतर तिकडचे सरकार तुम्हाला मोफत घर, गाडीसह लाखो रुपये खर्चाला देते तेही फक्त स्थायिक होण्यासाठी. वाचताना हे खूप मजेशीर वाटते ना. त्यामुळे हे देश नेमके कोणते आहेत जाणून घेऊ…
स्वित्झर्लंड
अनेकांनी स्वित्झर्लंडबद्दल ऐकलेच असेल, त्याला पृथ्वीवरील स्वर्ग असेही म्हटले जाते. पण इथे अल्बिनेन नावाचे एक छोटेसे गाव आहे. या गावात स्थायिक होण्यासाठी तेथील सरकारकडून पैसे दिले जातात. ४५ वर्षांपेक्षा कमी वयाचे लोक तिथे जाऊन स्थायिक झाले तर त्यांना सुमारे २० लाख रुपये दिले जातात. तर जोडप्यांना सरकार ४० लाख रुपये देते. याशिवाय जर तुम्हालाही मुलं असतील तर सरकार त्यांनाही प्रत्येक मुलामागे ८ लाख रुपये देते. पण येथे स्थायिक होणाऱ्यांसाठी एक अट आहे, ती म्हणजे पैसे घेतल्यानंतर, तुम्ही ती जागा १० वर्षे सोडू शकत नाही.
ग्रीक आयर्लंड
ग्रीक बेटाचे नावही आपण कधी ना कधी ऐकलेच असेल. जर एखाद्याला ग्रीक आयर्लंडच्या अँटिकिथेरा येथे स्थायिक व्हायचे असेल, तर येथील सरकार त्या व्यक्तीला पुढील ३ वर्षांपर्यंत दर महिन्याला ५० हजार रुपये देते. पण या बेटावर आता फक्त ५० लोकचं राहतात.
अमेरिका
अमेरिकेच्या अखत्यारीतील अलास्का या ठिकाणी राहण्यासाठी लोकांना पैसेही दिले जातात. या मागचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे, हा बर्फाळ प्रदेश असल्याने तिथे फार थंडी असते, त्यामुळे फार कमी लोक इथे राहतात, परंतु येथे राहणाऱ्या व्यक्तीला सरकारकडून दरवर्षी दीड लाख रुपये दिले जातात. मात्र या ठिकाणी राहण्यासाठी एक अट आहे, ती म्हणजे तुम्हाला किमान १ वर्ष इथे राहावे लागते.
इटली
इटली या युरोपातील देशाबद्दलही तुम्ही अनेकदा ऐकले असेल. येथे एक प्रेसिक नावाची एक जागा आहे, जिथे राहण्यासाठी सरकार लोकांना २५ लाख रुपये देते. या मागचे कारण म्हणजे याठिकाणी बहुतांश लोक वृद्ध आहेत त्यामुळे तिथे लोकसंख्या वाढत नाहीये.
स्पेन
स्पेनमधील पोंगा हे एक गाव आहे. ज्या गावाची लोकसंख्या खूपच कमी आहे. अशा परिस्थितीत येथील अर्थव्यवस्था वाढावी आणि तरुणांना आकर्षित करण्यासाठी स्थानिक अधिकारी येथे स्थायिक होण्यासाठी प्रत्येक जोडप्याला दीड लाख रुपये देतात. दुसरीकडे ज्या जोडप्यांनी याठिकाणी बाळाला जन्म दिला त्यांना सरकारकडून २ लाख रुपये दिले जातात.