Chandrayaan 3 Moon Mission Launch : भारताची तिसऱ्या चांद्रयान मोहिमेकडे वाटचाल सुरु झाली असून संपूर्ण जगाचे लक्ष यावर लागले आहे. चांद्रयान-३ असं या मिशनचं नाव आहे. इस्त्रोकडून लॉन्च करण्यात येणाऱ्या या मिशनला पाहण्यासाठी जगभरातील नागरिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आंध्र प्रदेशच्या श्रीहरिकोटा येथील अंतराळ केंद्रातून १४ जुलैला दुपारी २.३५ वाजता चांद्रयान-३ लॉन्च केलं जाणार आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लॅंडिंग करून इतिहास रचण्याचं या मिशनचं मुख्य उद्दीष्ट आहे. ज्यामुळे चंद्रावर सॉफ्ट लॅंडिंग करणारा भारत जगभरात चौथा देश बनेल. आतापर्यंत रशिया, अमेरिका आणि चीन या देशांनीचा अशी मोहिम राबवली आहे.
हे होते आतापर्यंतचे सर्वात मोठे मून मिशन
अशाप्रकारचं मून मिशन पहिल्यांदाच केलं जात नाहीय. याआधी अनेक देशांनी चंद्रावर जाण्याची मोहिम राबवली आहे. भारतानेही याआधी दोनवेळा मून मिशन केलं आहे. जगातील आतापर्यंतच्या १० मुख्य ‘मून मिशन’बाबत जाणून घेऊयात. जे अंतराळातील संशोधनासाठी महत्वाचा भाग आहेत.
१) लूना २ : १९५९ मध्ये लॉन्च झालं होतं. चंद्राच्या कक्षेत पोहोचणारा हा पहिला कृत्रिम ग्रह होता. या मोहिमेने चंद्राच्या वरच्या भागातील महत्वाची माहिती प्राप्त केली. या माहितीच्या आधारे त्या ठिकाणी कोणतंही चुंबकीय क्षेत्र नाही, हे लक्षात आलं.
२) लूना ३ : जेव्हा लूना २ यशस्वी होत होता, तेव्हा सोवियत संघाने १९५९ मध्येच या मिशनलाही लॉन्च केलं. या मिशनमुळे चंद्राचे अनेक फोटो काढण्यात यश आलं. चंद्राच्या वरच्या भागात मोठे मोठे खड्डे आहेत, हे मिशनमुळं माहित झालं.
३) सर्वेयर प्रोग्राम : नासाने १९६६ ते १९६८ पर्यंत एक सर्वेयर प्रोग्राम चालवलं. ज्यामध्ये सात मानव-रहित वाहने चंद्रावर पाठवण्यात आले होते. या वाहनांमुळे चंद्रावर यशस्वीपणे सॉफ्ट लॅंडिंग करता आलं आणि चंद्रावर असलेल्या मातीबद्दल महत्वाची माहिती गोळा केली.
४) अपोलो ८ : १९६८ मध्ये लॉंच झालं. या मिशनच्या माध्यमातून पहिल्यांदाच माणसाला चंद्राच्या कक्षेत जाता आलं. या मिशनच्या आधारे इतर सर्व मिशन पार पडले.
५) अपोलो ११ : १९६९ मध्ये लॉंच झालं. हे अमेरिकेचं पहिलं अंतराळ मिशन होतं. ज्यामध्ये माणसांनी चंद्राच्या वरच्या भागात पाय ठेवला. या मिशनमध्ये नील आर्मस्ट्रांग आणि बज एल्ड्रिन यांचा सहभागी झाले होते.
६) अपोलो १३ : या मिशनचं आयोजन १९७० मध्ये झालं होतं. परंतु, हे मिशन अयशस्वी झालं होतं. रॉकेट चंद्राजवळ जात असताना ऑक्सिजन टाकीत स्फोट झाला होता. ज्यामुळे या मिशनला रद्द केलं होतं.
७) अपोलो १५ : हे नासाचं विशेष मिशन होतं आणि १९७१ मध्ये लॉन्च करण्यात आलं होतं. या मिशनच्या माध्यमातून नासाने त्यांचं लूनर रोवर चंद्रावर उतरवलं. ज्यामुळे शास्त्रज्ञांना चंद्राच्या वरच्या भागाबाबत माहित मिळवणं शक्य झालं.
८) अपोलो १७ : हे नासाचच मिशन होतं आणि १९७२ मध्ये लॉन्च करण्यात आलं. हे अपोलो मोहिमेचं शेवटचं मिशन होतं. विशेष म्हणजे चंद्रावर जाणारं हे सर्वात मोठं मिशन होतं. यामुळे चंद्राचे अनेक नमुने गोळा करण्यास मदत झाली.
९) चांगए ४ : चीनने २०१९ मध्ये या मिशनला लॉन्च केलं. हे मिशन चंद्रावर यशस्वी झालं. या मिशनमुळे चंद्रावरील भू-विज्ञान आणि त्याची संरचना याबद्दल माहिती मिळाली.
१०) चांद्रयान-२ : भारताने २०१९ मध्ये चांद्रयान-२ लॉन्च केलं. यामध्ये ऑर्बिटर, विक्रम लॅंडर आणि प्रज्ञान रोवर यांचा समावेश होता. या मिशनचं लक्ष्य चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लॅंडिंग करणं होतं. परंतु, लॅंडरमध्ये बिघाड झाल्याने लॅंडिंग करणं कठीण झालं. मात्र, आता चांद्रयान-३ मिशनच्या माध्यमातून भारत या महत्वाच्या प्रोजेक्टला पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे.