२०१९ हे वर्षे वाहन उद्योगासाठी चिंताजनक गेले. आर्थिक मंदीमुळे नवीन वाहनांच्या विक्रीत मोठय़ा प्रमाणात घट झाली. मात्र वापरलेल्या कारला मागणी वाढल्याचे दिसले. या गाडय़ा खरेदी करताना मोठी फसगत होण्याची शक्यता असते. त्यामुळे हे वाहन खरेदी करताना काय काळजी घ्यावी याविषयी..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चकचकीत गाडी म्हणजेच दोषविरहित गाडी/ झिरो डिफेक्ट गाडी असे कदापि समजू नये. इथेदेखील (सेकंड गाडी घेताना) संत चोखामेळा यांची ओवी लक्षात घ्यावी.

ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा!

काय भुललासी वरलिया रंगा!!

‘अरे एक सेकंड हॅण्ड गाडी घेतली आहे, म्हटले नवीन घेण्याआधी या गाडीवर हात साफ करून घेऊ,’ अशा प्रस्तावनेसह बरेच जण कार विक्री-दुरुस्ती करणाऱ्यांकडे येतात. विकत घेतलेली सेकंड हॅण्ड गाडी एकदा चेक करून द्या असे सांगतात. दुर्दैवाने त्यात जास्त खर्च निघाला की निराश होतात. तेव्हा आपली फसगत होऊ  नये यासाठी सेकंड हॅण्ड गाडी घेताना ती काळजीपूर्वक तपासून घेणे आवश्यक ठरते.

सर्वप्रथम मोटारकारचा इंजिन क्रमांक व चासिस क्रमांक व संबंधित नोंदणीपत्रातील इंजिन व चासिस क्रमांक एकच असल्याची खात्री करून घ्यावी. सर्वसाधारणपणे इंजिन ब्लॉक व मेनफ्रे मवर हे क्रमांक कोरलेले असतात. यांपैकी कुठल्याही क्रमांकात त्यातील कुठल्याही अंकात बदल करण्याचा प्रयत्न झालेला नसल्याची खात्री करून घ्यावी.

सेकंड हॅण्ड गाडीवर एकदा नीट नजर टाकावी. म्हणजे नव्याने रंगरंगोटी केली असल्यास खरेदीदाराने जास्त दक्ष राहावे. तळाशी अंथरलेले जाजम ते जुनेपुराणे असले तरी उचलून वाहनाचा तळपत्रा तपासून घ्यावा. तळ गंजविरहित असावा. वाहनाच्या चाकांना असलेल्या रिम्स, आसने गंजविरहित व सुस्थितीत असावीत. आसनावरील आच्छादने काढून ती तपासून पाहवीत. आतला व बाहेरचा रंग तपासून घ्यावा. बाहेरचा ब्रेक (हॅण्ड ब्रेक), ब्रेक पॅडेल, क्लच पॅडेल, वेगवर्धिका (एक्सिलेटर) व त्यावरील रबरी आच्छादने नीट तपासून घ्यावीत.

मोटारकार सुरू करून ती रेस करावी व एक्झॉस्ट पाइपमधून बाहेर पडणाऱ्या धुराचे निरीक्षण करावे. हा पाइप नेहमी कोरडा व गंजविरहित असावा. तो साधारण राखाडी रंगाचा असावा. जर तो बदललेला असल्यास त्याचे कारण जाणून घ्यावे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे माईलेज मीटर. मात्र त्यावर डोळे बंद करून विश्वास न ठेवता आधीच्या वाहनचालकाने वाहन वापरासंबंधी त्याचे माईलेज, वेळोवेळी भरलेले इंधन, वेळोवेळी केलेली दुरुस्ती, रंगरंगोटी इत्यादीविषयी लॉगबुक लिहिले असल्यास त्यातील नोंदीनुसार माईलेज व मीटरवरचे माईलेज जुळत असेल तरच आपण विश्वास ठेवू शकतो.

बऱ्याचदा वापरलेले वाहन बाजारात आणण्यापूर्वी ते तांत्रिकदृष्टय़ा दुरुस्त केलेले असते. त्यामुळे वरवर दिसणाऱ्या रंगरंगोटीपेक्षा इंजिन, क्लच, ब्रेक्स, चासिस, वाहनाचा आतील, बाहेरील व खालचा पत्रा इत्यादी गोष्टी तज्ज्ञ (मेकॅनिक)कडून तपासून घ्यावे. याचे कारण वाहनाचा अपघात झाला असण्याची शक्यता पडताळता येते. वाहनातील विजेवर किंवा बॅटरीवर चालणारी साधने व उपकरणे व्यवस्थित व क्षमतेने काम करणारी आहेत का? तसेच फ्यूजबॉक्स तपासून घ्यावा. वापरलेल्या वाहनाचे सर्व टायर्स व टय़ूब्ज (असल्यास) अतिरिक्त चाकासह टायरवाल्याकडून तपासून घ्यावेत. रिट्रिडिंग व रिग्रूव्ह केलेले टायर्स तुमच्याकडून जास्त किंमत उकळण्याची एक युक्ती असते हे लक्षात घ्यावे.

वरील बाबी तपासल्यावर वाहन चाचणीसाठी तयार आहे असे गृहीत धरावे. ते बाहेर काढल्यावर आपल्या जबाबदारीवर टायरवाल्याकडून टायर्समधील हवेचा दाब योग्य असल्याचे तपासून घ्यावे. चाकात कमी हवा भरून वाहनाचे सस्पेन्शन चांगले असल्याचा भास होतो. त्यामुळे वाहनातील होणारा आवाज दाबला जातो. आणि जर चाकात जास्त हवा भरली असल्यास इंजिनची स्थिती उत्तम असल्याचा भास निर्माण होतो. त्यामुळे बेसावध ग्राहक सहज फसतो. चाचणी फेरफटका मारण्यापूर्वी इंजिन ऑइल तपासून घ्यावे. ते जरुरीपेक्षा घट्ट असल्यास इंजिन स्मूथ असल्याचा भास होतो. मात्र ही बाब तज्ज्ञ मेकॅनिकच सांगू शकतो.

इंजिन सुरू झाल्यावर त्याचा आवाज नीट ऐकावा. तो एकसुरी असावा. ब्रेक जर अडकून बसत असतील तर किंवा थबकत थबकत पूर्वस्थितीत येत असतील तर किंवा पूर्वस्थितीत येण्यासाठी वेळ घेत असतील तर कुठे तरी ऑइल लिक होत आहे असे समजावे. इंजिन बरेच गरम झाले असताना वाहन थांबवावे. इंजिन चालू स्थितीत ठेवून बॉनेट उघडावे. ऑइल फिलर कॅप उघडावी. त्यातून धूर बाहेर पडत असल्यास इंजिनात गडबड असल्याचे समजावे. फिलर कॅपमधून ऑइलचे तुषार उडत असल्यास विशेष काळजी करण्याची बाब नाही. बॉनेट उघडलेले असतानाच आपणास रेडिएटर, बॅटरी, फॅन बेल्ट, इलेक्ट्रिकल वायिरग, अ‍ॅक्सलचे रबर बुट्स आदी गोष्टी तपासता येतील.

एकंदरीत वाहनाच्या कागदपत्रांची पाहणी, पडताळणी व तांत्रिकदृष्टय़ा वाहनाच्या स्थितीची तपासणी व चाचणी केल्यावर समाधानकारक असल्यास सुज्ञपणे व चतुराईने वाहनाच्या किमतीविषयी बोलणी करावी. व्यवहार ठरल्यावर मोटारकारच्या खरेदी-विक्रीशी संबंधित कागदपत्रांवर वाहनाचा प्रत्यक्ष ताबा घेतल्याची वेळ, दिनांक व स्थळ नोंदविण्यास विसरू नये.

हे लक्षात ठेवा

* गाडी एखाद्या डीलरकडून घेत असाल तर तो अधिकृत आहे का ते पाहा.

* गाडी स्वत: चालवून पाहा.

* गाडी किती अंतर चालली आहे ते बघा.

* गाडीची नोंदणी कोणत्या वर्षांची आहे याकडे लक्ष द्या. यावरून गाडीची योग्य किंमत ठरते.

* गाडीची हेडलाइट, टेललाइट, इंडिकेटर, वातानुकूलन यंत्रणा सुरळीत काम करते आहे का हे तपासा.

तज्ज्ञ मेकॅनिककडून खालील गोष्टी तपासून घ्या

* गाडीची बॅटरी

* इंजिन ऑइल

* गिअर ऑइल

* कूलण्ट

* स्टीअरिंग फ्लुइड

* ब्रेक फ्लुइड

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Things to check before buying a used second hand car scsg
Show comments