आठवड्यात एकूण किती तास काम करावे याविषयी अनेकदा भारतात चर्चा झाली आहे आणि यावर लोकांची मतमतांतरे पाहायला मिळाली आहेत. सात ते आठ तास दिवसाला काम केल्याने मानसिक, शारीरिक आरोग्यावर परिणाम होत असल्याचे अनेक अहवालही समोर आले आहेत. त्यानंतर कंपन्यांनी चार दिवसीय कामाचा आठवडा लागू करावा, अशीही चर्चा होऊ लागली.

मुख्य म्हणजे जर्मनीसारख्या काही देशांनी याचा अवलंबही केला. परंतु, जगात एक असाही देश आहे, जेथील नागरिकांना आठवड्यात केवळ २४ तास काम करावे लागते. होय, हे अगदी खरे आहे. हा देश कोणता आहे? आणि २४ तासांच्या कामाच्या आठवड्यामागील त्यांचा उद्देश काय? त्याविषयी जाणून घेऊ.

कोणत्या देशात २४ तास कामांचा आठवडा?

पॅसिफिक महासागरातील वानुआटु हा देश सुंदर समुद्रकिनारे आणि समृद्ध सांस्कृतिक वारशासाठी प्रसिद्ध आहे. परंतु, हा देश पुन्हा चर्चेत असण्याचे कारण म्हणजे या देशात एका आठवड्यात केवळ २४.७ तासच काम केले जाते. जगातील सर्वात कमी सरासरी कामाचा आठवडा असणारा वानुआटु हा देश आहे. या बेटाच्या संस्कृतीत कामापेक्षा आणि ऑफिसमध्ये अधिक वेळ घालवण्यापेक्षा कुटुंब, समुदाय आणि वैयक्तिक कल्याणाला प्राधान्य दिले जाते.

अनेक देश काम आणि जीवन यांच्यात योग्य संतुलन शोधण्याचा प्रयत्न आजही करत आहेत. कामाचे तास नक्की किती असावे, यावर अजूनही वाद सुरू आहे. परंतु, या सर्व देशांसाठी वानुआटु बेट आदर्श आहे. गेल्या वर्षभरात काम-जीवन संतुलनाचा विषय अनेक वेळा चर्चेत आला आहे, आता ईवाय कर्मचारी अण्णा पेरायल यांच्या मृत्यूनंतर याविषयावर आणखी जोर दिला जात आहे.

आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या अहवालात असे दिसून आले आहे की, भारत आणि अनेक दक्षिण आशियाई देशांमध्ये जास्त तास काम करणाऱ्या कामगारांची संख्या अधिक आहे. यात भूतान देश जगात आघाडीवर आहे. भुतानमधील ६१ टक्के कामगार आठवड्यात ४९ तासांपेक्षा जास्त काम करतात. बांगलादेशमध्ये कामगारांचे प्रमाण ४७ टक्के आणि पाकिस्तानमध्ये हे प्रमाण ४० टक्के आहे, यात भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. कामगारांपैकी सुमारे ५१ टक्के लोक आठवड्यातून ४९ तासांपेक्षा जास्त काम करतात.

जास्त तास काम करणाऱ्या कामगारांचे प्रमाण असलेल्या इतर देशांमध्ये संयुक्त अरब अमिराती आणि लेसोथो या देशांचा समावेश आहे. कामाचा जास्त ताण असल्याने कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर, कल्याणावर आणि उत्पादन क्षमतेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्यावरही त्याचा परिणाम होतो. आता देशांसाठी हा एक महत्त्वाचा मुद्दा झाला आहे. देश कामाच्या तासांवर पुनर्विचार करत आहेत.

आइसलँड या देशाने अलीकडेच चार दिवसांच्या कामाच्या आठवड्याचा प्रयोग केला. त्यांच्या प्रयोगातून असे दिसून आले की, कामाचे तास कमी केल्याने कर्मचाऱ्यांची उत्पादकता कायम राहिली, कर्मचाऱ्यांच्या कल्याणात सुधारणा झाली आणि त्यांच्या आरोग्यालाही फायदा झाला. स्पेन आणि न्यूझीलंडनेही अशाच प्रकारचे प्रयोग केले आहे, त्यामुळे प्रत्येक देश आता कामाचे तास कमी करण्याविषयी आवश्यक पावले उचलताना दिसत आहेत.