डेटिंग ही आजच्या काळातील सामान्य गोष्ट आहे. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे डेटिंग करण्यासाठी अनेक सोपे पर्याय मिळाले आहेत. त्याचबरोबर आजकाल नवीन डेटिंग ट्रेंड्सदेखील समोर येत आहेत. त्यापैकी काही डेटिंग ट्रेंड्स कोणत्याही व्यक्ती आणि नातेसंबंधांसाठी हानिकारक आणि टॉक्सिक असू शकतात. या टॉक्सिक डेटिंग ट्रेंड्सबद्दल जागरूक असणे आवश्यक आहे.
टॉक्सिक डेटिंग ट्रेंड म्हणजे काय?
एक टॉक्सिक डेटिंग ट्रेंड म्हणजे असे नातेसंबंध; ज्यात तुमच्या भावना दुखावल्या जातात, तुमचा आदर केला जात नाही किंवा असे नाते, जे तुमचे मानसिक आणि भावनिक आरोग्य बिघडवू शकते. कोणत्याही नातेसंबंधांमध्ये निरोगी संवाद, आदर व परस्पर सामंजस्य या गोष्टींना प्राधान्य असणे महत्त्वाचे आहे. टॉक्सिक डेटिंगमुळे एखाद्या व्यक्तीच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात, स्वाभिमान दुखावला जातो. म्हणून हे टॉक्सिक डेटिंग ट्रेंड्स समजून घेतलेत, मग तुम्ही विचार करून नातेसंबंधांबाबत योग्य ते निर्णय घेऊ शकता आणि एकमेकांचा आदर व सामंजस्यावर आधारित निरोगी, चांगले नाते तयार करू शकता.
HTच्या वृत्तानुसार, जिंजर डीन (परवानाधारक मानसोपचार तज्ज्ञ) यांनी इन्स्टाग्रामवर या टॉक्सिक डेटिंग ट्रेंड्सबद्दलची माहिती शेअर केली आहे.
तुम्हाला माहीत असायलाच हवेत असे टॉक्सिक डेटिंग ट्रेंड्स खालीलप्रमाणे :
झोम्बिईंग (Zombieing) : ज्या व्यक्तीने तुमच्याबरोबर असलेले नाते अचानक तोडले आहे आणि ती व्यक्ती तुमच्या आयुष्यातून गायब झाली आहे किंवा कोणत्याही कारणाशिवाय तुमच्याशी बोलणे थांबवले आहे अशी व्यक्ती जर कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण किंवा माफी न मागता, तुमच्याशी पुन्हा संवाद साधण्यास सुरुवात करते तेव्हा त्याला झोम्बिईंग, असे म्हटले जाते.
ऑर्बिटिंग (Orbiting) : जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्याशी बोलणे बंद केल्यानंतर किंवा नातेसंबंधात स्वारस्य नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर सोशल मीडियावर तुमच्या पोस्ट लाइक करते किंवा तुमच्याशी संवाद साधते तेव्हा त्याला ऑर्बिटिंग (Orbiting), असे म्हणतात.
पॉकेटिंग (Pocketing) : पॉकेटिंग हा एक टॉक्सिक डेटिंगचा ट्रेंड आहे. जिथे एक जोडीदार काही काळ नातेसंबंधात राहिल्यानंतरही आपल्या जोडीदाराची इतरांशी (कुटुंब, मित्र-मैत्रिणींसह) ओळख करून देणे टाळतो. त्याला ‘स्टॅशिंग’, असेही संबोधले जाऊ शकते
फायरडोअरिंग (Firedooring) : फायरडोअरिंग हाही एक टॉक्सिक डेटिंगचा ट्रेंड आहे. अशा नातेसंबंधात एक व्यक्ती नाते टिकविण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करते; तर दुसरी व्यक्ती परिस्थितीचा गैरफायदा घेते. उदाहरणार्थ- एखादा नेहमी काही ना काही प्लॅन करतो; तर त्याचा जोडीदार फक्त त्याच्याशी तेव्हाच संपर्क साधतो जेव्हा त्याच्याबरोबर कोणीही नसते.
स्लो फेडिंग (Slow fading) : अशा नात्यामध्ये एक जोडीदार दुसऱ्यांबरोबर जोपर्यंत नाते पूर्णपण तुटत नाही तोपर्यंत कमी आणि मोजक्या शब्दांत बोलतो, कमी वेळ एकत्र घालवतो. जेव्हा नाते संपविण्याचा (BreakUp) निर्णय एकतर्फी असतो तेव्हा असे लोक स्लो फेडिंग पद्धतीने ब्रेकअप करतात. अशा लोकांनाअसे वाटते की, एखाद्याला अचानक धक्का न देता, हळूहळू हे नाते संपवून समोरच्या व्यक्तीवर दया करीत आहे.
फबिंग (Phubbing) : अशा नातेसंबंधात जेव्हा जोडीदार प्रत्यक्षात भेटतात, तेव्हा एकमेकांबरोबर चांगला वेळ घालविण्याऐवजी पूर्ण वेळ मोबाईल पाहण्यात घालवतात तेव्हा त्याला ‘फबिंग’, असे म्हणतात.
हेही वाचा – Viral Video : धक्कादायक! एकटी महिला पाहून मद्यपीचा कारमध्ये घुसण्याचा प्रयत्न, काचेवर मारत होता बुक्क्या
किटनफिशिंग (Kittenfishing) : जेव्हा एखादी व्यक्ती त्यांच्या डेटिंग प्रोफाईलमध्ये चुकीची माहिती देते. जसे की ती व्यक्ती जुने फोटो वापरते आणि खोटी माहिती लिहिते, तेव्हा त्याला ‘किटनफिशिंग’ असे म्हणतात.
क्लॉकिंग (Cloaking) : जेव्हा एखादी व्यक्ती अचानक तुम्हाला सर्व ठिकाणी ब्लॉक करते, तेव्हा नक्की काय झाले हे जाणून घेण्यासाठी तुमच्याकडे त्याच्याशी संपर्क साधण्याचा कोणताही मार्ग नसतो तेव्हा त्याला ‘क्लॉकिंग’, असे म्हणतात.
घोस्टिंग (Ghosting) : जेव्हा एखादी व्यक्ती अचानक तुमच्याशी बोलणे बंद करते, कोणतेच कारण न देता, नाते संपवते तेव्हा त्याला ‘घोस्टिंग’, असे म्हणतात.
कुशनिंग (Cushioning) : नातेसंबंधात असूनही जेव्हा एखादी व्यक्ती दुसर्याबरोबर फ्लर्ट करीत असेल; जेणेकरून ब्रेकअप झाल्यावर त्यांच्याकडे नातेसंबंधाचा पुन्हा नवीन पर्याय कायम उपलब्ध असेल.
हेही वाचा – जन्माचा दाखला घसबसल्या कसा काढायचा? आवश्यक कागदपत्रे कोणती? जाणून घ्या
अलमोस्ट (Almosts) : जेव्हा एखादी व्यक्ती असे दाखवते की, तिला तुम्ही आवडला आहात, तुमच्याबरोबर नातेसंबंधात असल्यासारखे वागते पण प्रत्यक्षात या नात्याला कोणतेही नाव देत नाही.
बेंचिंग / ब्रेडक्रम्बिंग (Benching / Breadcrumbing) : जेव्हा एखादी व्यक्ती डेटिंग करण्याचा कोणताही हेतू नसतानाही तुम्हाला त्यांच्याकडून मेसेज करते, कॉल करते आणि सतत संपर्कात राहते, तेव्हा त्याला बेंचिंग किंवा ब्रेडक्रम्बिंग, असे म्हणतात.
नेगिंग (Negging) : नेगिंगमध्ये एखाद्याचा आत्मविश्वास कमी करण्यासाठी प्रशंसा करीत असल्याचा आव आणतात; पण प्रत्यक्षात ते तुमच्यावर टीका करीत असतात. उदा. “मी तुझ्यासारख्या मुलीला डेट करीत नाही; पण तू थोडी वेगळी आहेस.”