व्याघ्र कुळातील प्रत्येक प्राणी अत्यंत चपळ आणि सावध असतो. हे प्राणी मुळात मांसाहारी असल्याने त्यांचा स्वभाव हिंस्र असतो. जंगलात स्वत:ला जिवंत ठेवण्यासाठी हे प्राणी दुसऱ्या प्राण्यांची शिकार करतात. व्याघ्र कुळातील सर्वच प्राणी दबा धरून शिकार करतात. पण अनेकदा त्यांना आपल्या भक्ष्याचा पाठलाग करावा लागतो. अशावेळी वाघ किंवा सिंहाच्या पंजामध्ये सहज काटा मोडण्याची किंवा काटा बोचण्याची शक्यता असते. पण बहुतांशी वेळा तसं घडत नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्यामुळे वाघ किंवा सिंहांच्या पंजाला जंगलात पळताना काटे टोचत नसतील का? पंजात काटा टोचू नये म्हणून वाघ किंवा सिंहांचं नैसर्गिकदृष्ट्या संरक्षण कसं होतं? असे प्रश्न अनेकांना पडले असतील. याचा आढावा आपण या लेखातून घेणार आहोत.

भक्ष्याचा पाठलाग करताना वाघ किंवा सिंहांना काटा का टोचत नाही? याबाबत विचारलं वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयाचे जीवशास्त्रज्ञ डॉ. अभिषेक साटम यांनी सांगितलं की, वाघाच्या किंवा सिंहाच्या पंजावर काटेरी, जाड त्वचा असते. पंजावरील पॅड्समुळे वाघांना काटेरी किंवा धारदार वस्तूंपासून नैसर्गिकदृष्ट्या संरक्षण मिळतं. पॅड्समुळे काटे सहजपणे आत घुसू शकत नाहीत. विविध भूभागांना तोंड देण्यासाठी पंजा पॅडची त्याप्रकारे रचना केलेली असते. यामुळे संभाव्य जखमांपासून व्याघ्र प्राण्यांना संरक्षण मिळतं.

विशेष म्हणजे वाघ किंवा सिंह स्वत: त्यांच्या पंजांचे काटेरी झुडूप आणि इतर धोक्यांपासून संरक्षण करत असतात. त्यांच्या पंजावरील कडक, जाड त्वचा आणि टिकाऊ पॅड काट्यांसारख्या तीक्ष्ण वस्तूंविरूद्ध नैसर्गिक अडथळा म्हणून काम करतात. वाघ त्यांच्या वातावरणात नेव्हिगेट करतानादेखील चपळ आणि सावध असतात. ज्यामुळे त्यांच्या पंजांना इजा होऊ शकणारे संभाव्य धोके टाळता येतात. याव्यतिरिक्त, त्यांच्या तीव्र संवेदना आणि तीक्ष्ण दृष्टीमुळे त्यांना अडथळे शोधण्यात आणि त्याभोवती नेव्हिगेट करण्यात मदत करतात. ज्यामुळे काटे बोचण्याचा धोका कमी होतो, अशी माहितीही डॉ. अभिषेक साटम यांनी दिली.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tigers or lions prick their thorn while chasing prey how claws protect rmm